Tuesday, July 16, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखशिवसेनेचे गर्वहरण

शिवसेनेचे गर्वहरण

राज्यसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि सत्तेचा माज चढलेल्या शिवसेनेचे गर्वहरण झालेले राज्यातील जनतेला बघायला मिळाले. आपली ताकद नसताना आणि निवडून आणण्याची कुवत नसताना शिवसेनेने दुसरा उमेदवार उभा केला होता. विधानसभेत शिवसेनेचे चौपन्न आमदार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कृपेवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ते स्वत: विधानसभेवर निवडून आलेले नाहीत आणि आपल्या पक्षाचा उमेदवार राज्यसभा निवडणुकीत त्यांना निवडून आणता आला नाही. मुख्यमंत्री जर आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून आणू शकत नसेल तर तो जनतेला न्याय काय देणार असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. गेल्या अडीच वर्षांत केवळ भाषणे आणि भावनिक आवाहन करून लोकांना मूर्ख बनविण्याचे काम केले. पण निवडून आलेले आमदार वारंवार मूर्ख कसे बनतील? आमदारांना मंत्री, मुख्यमंत्र्यांच्या साध्या भेटी मिळत नाहीत, त्यांची मतदारसंघातील लहान-सहान कामेही होत नाहीत, ज्यांना सरकार दरबारी आमदार म्हणून मान मिळत नाही, ते निवडणुकीत मतदान तरी कसे करतील? अपक्ष आमदारांनी मतदारसंघातील कामे व्हावीत म्हणून महाविकास आघाडीला साथ दिली आहे, पण त्यांची कामे होत नसतील, तर अपक्ष व छोट्या पक्षांचे आमदार शिवसेनेला मतदान कशासाठी करतील? गेल्या अडीच वर्षांत विधानसभेत ठाकरे सरकार मतमोजणीला सामोरे गेले नव्हते. त्यामुळे या सरकारची परीक्षा झाली नव्हती. राज्यसभेच्या निमित्ताने महाआघाडीला पाठिंबा देणारेही आमदार सरकारबरोबर नाहीत हे दिसून आले.

राज्यसभा निवडणुकीत भाजपचे पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे, धनंजय महाडिक हे आरामात निवडून आले. महाआघाडीकडे १७० आमदार असल्याचा दावा केला जातो, भाजपचे स्वत:चे १०५ आमदार आहेत. पण भाजपला अपक्ष व छोट्या पक्षांनी या निवडणुकीत साथ दिली व भाजपचे तीनही उमेदवार राज्यसभेवर निवडून आले. शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा पराभव तर झालाच, पण भाजपचे तिसरे उमेदवार असलेल्या महाडिक यांनी शिवसेनेचे वाचाळवीर संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मते मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. शिवसेनेला फाजील आत्मविश्वास आणि सत्तेचा अहंकार नडला. त्याने पक्षाचे मोठे नुकसान केले आणि दुसरीकडे भाजपचे निवडणूक कौशल्य, डावपेच व कुटनितीने शिवसेनेवर मात केली हेच या निवडणुकीत दिसून आले. राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची रणनिती ठरवताना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सतत बैठका चालू होत्या. पण मतमोजणीच्या दिवशी शरद पवार मुंबईत न थांबता थेट पुण्याला निघून गेले, शिवसेना उमेदवाराच्या पराभवाचे संकेत त्यांना मिळाले होते का? या निवडणुकीच्या निमित्ताने एक स्पष्ट झाले की, शिवसेनेने विशेषत: अपक्ष आमदारांचा व छोट्या पक्षांचा विश्वास गमावला आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा विश्वास कमावला. भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक हे पराभूत होणार व शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार हे निवडून येणारच असे शिवसेनेचे सारे नेते ठामपणे सांगत होते. त्याला उत्तर म्हणून शिवसेनेचा संजय पराभूत होणार असे भाजपचे नेते असे म्हणत होते. एक संजय तर पराभूत झालाच पण संजय राऊत हेही कसे तरी बचावले. त्यांच्या नशिबाने शिवसेनेने राज्यसभेसाठी चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे. पण त्यांनी आपल्या उर्मट वागण्याने पक्षात व पक्षाबाहेर अनेक शत्रू निर्माण केले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या आपणच जवळचे आहोत असे त्यांनी चित्र निर्माण केले आहे, त्याचा परिणाम सेनेतील अन्य नेते हाताची घडी तोंडावर बोट ठेऊन बसले आहेत. ठाकरे यांनी आपल्याला कसेही वागण्याचे मुक्त स्वातंत्र्य दिले आहे, अशा थाटात ते वागत असतात.

शरद पवार यांचा माणूस अशी त्यांची महाआघाडीत ओळख आहे आणि राहुल गांधींचेही नाव घेऊन आपण त्यांच्या कसे जवळ आहोत, असे ते भासवत असतात. मोदी व शहांवर ऊठसूट टीका करणे व देशातील कोणत्याही विषयावर केंद्रातील भाजप सरकारला जबाबदार धरणे ही त्यांची खोड आहे. त्याचा परिणाम पक्षातील व आघाडीतील अनेक जण त्यांच्या आगाऊपणावर नाराज आहेत. त्याचाही फटका त्यांना या निवडणुकीत बसला. दिलेला शब्द कोणी फिरवला त्या आमदारांची नावे सांगून ते राजकारणात आणखी कटुता निर्माण करीत आहेत. ज्यांनी मते दिली नाहीत, त्यांनी शब्द मोडला असे ते सांगत आहेत. त्यामुळे महाआघाडीत व मित्रपक्षात चिडचिड वाढली आहे. गेल्या अडीच वर्षांत ठाकरे सरकारने ज्या सूडबुद्धीने भाजपच्या नेत्यांवर कारवाया केल्या, तेच या निवडणुकीत शिवसेनेला भोगावे लागले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नोटिसांचा भडीमार करणे, त्यांच्या परिवारातील लोकांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लावणे, हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून राणा दांपत्याला जेलमध्ये डांबणे, कोणी आव्हान दिले की, शिवसैनिकांना रस्त्यावर आणून शक्तिप्रदर्शन करणे हेच सतत चालू आहे. केंद्राने थकीत जीएसटीची रक्कम महाराष्ट्राला दिली तरी पेट्रोलवरचा कर एक रुपयाने कमी करण्याची दानत ठाकरे सरकारने दाखवली नाही. ऊठसूठ संघ -भाजपवर टीका करणे हा ठाकरे यांचा आवडीचा छंद बनला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला त्याला ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा जास्त मते मिळाली. पण शिवसेनेचा एक संजय पडतो व दुसऱ्या संजयला कोट्यापेक्षा कमी मतदान होते याचा अर्थ आता शिवसेनेची गरज आणि किंमत कमी झाली आहे. एकटा देवेंद्र महाआघाडीला लय भारी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -