लेऑन (मॅक्सिको) : गुरूनैदू सनपतीने मॅक्सिकोमधील लेऑन शहरात झालेल्या युथ वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकले. युथ वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय वेटलिफ्टर ठरला. १६ वर्षाच्या गुरूनैदूने एकूण २३० किलो (१०४ किलो, १२६ किलो) वजन उचलून मुलांच्या ५५ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले.
सनपतीने २०२० मध्ये आशियाई युवा वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक पटकावले होते. गुरूनैदूने सुवर्णपदक जिंकलेल्या मॅक्सिकोमधील युथ वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सौदी अरेबियाच्या अली माजीदने २२९ किलो वजन उचलत रौप्य तर कझाकिस्तानच्या उमरोव्हने २२४ किलो वजन उतलत कांस्य पदक पटकावले.
सनपतीबरोबरच महाराष्ट्राची महिला वेटलिफ्टर सौम्या एस. दळवीने कांस्य पदकाची कमाई केली. दळवीने खेलो इंडियामध्ये दोन वेळा सुवर्णपदक पटकावले होते. तिने या स्पर्धेत ४५ किलो वजनी गटात एकूण १४८ किलो वजन (६५ किलो आणि ८३ किलो) उचलले. याच वजनीगटात फिलिपाईन्सची रोज जे रामोसने १५५ किलो वजन (७० किलो आणि ८५ किलो) उचलून सुवर्ण तर माँटिलाने १५३ किलो (७१किलो आणि ८२किलो) वजन उचलून रौप्य पदक पटकावले.
युथ वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताची पदकसंख्या आता ४ झाली आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी आकांक्षा किशोर आणि विजय प्रजापती या दोघांनीही रौप्य पदकाची कमाई केली होती. भारत गेल्या वेळी युथ वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाला नव्हता. ही स्पर्धा सौदी अरेबियातील जेडाह येथे पार पडली होती.