Monday, April 28, 2025
Homeसाप्ताहिककोलाजउद्या शाळेची घंटा वाजणार!

उद्या शाळेची घंटा वाजणार!

रवींद्र तांबे

आपल्या राज्यात उन्हाळी सुट्टीनंतर १३ जून, २०२२ रोजी दोन वर्षांनंतर शाळेची घंटा वाजणार असली तरी कोरोनाच्या चौथ्या लाटेचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तेव्हा कोरोनाच्या नियमांचे पालन करावे लागेल. तसेच विद्यार्थ्यांना शाळेची पूर्व तयारी करून शाळेत जावे लागणार आहे. त्याबद्दल विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्षात मन:पूर्वक स्वागत.

महाराष्ट्र राज्यात ९ मार्च, २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला, तर १७ मार्च, २०२० रोजी मुंबईत पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा बंद करण्यात आल्या.

विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करून वरच्या वर्गात प्रवेश दिला गेला. शेवटी दहावीच्या भूगोल विषयाची परीक्षासुद्धा रद्द करण्यात आली. त्यानंतर नववी व अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या. अशात जवळजवळ अत्यावश्यक सेवा सोडून तीन महिने सर्व व्यवहार ठप्प होते. त्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षण सुरू केले. म्हणजे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा बंद करण्यात आल्या होत्या.

जानेवारी २०२२ पर्यंत विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ऑनलाइन शिक्षण सुरू होते. तेव्हा ‘घर’ हेच सर्व काही होते. त्यातील दुवा म्हणजे ‘मोबाइल’ होता. आता फेब्रुवारी, २०२२ पासून कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरू करण्यात आल्या. काही परीक्षा ऑफलाइनसुद्धा घेतल्या गेल्या. त्यात उन्हाळी सुट्टीतसुद्धा मुलांचे वर्ग भरणार त्यामुळे हक्काची सुट्टी जाणार म्हणून शिक्षक वर्गही चिंतेत होता. मात्र असे न होता, सन २०२२ मधील उन्हाळी सुट्टी २ मे ते १२ जून, २०२२ पर्यंत जाहीर करण्यात आली. याला विदर्भ अपवाद आहे. विदर्भात २७ जूनपासून शाळा सुरू होईल तेसुद्धा त्या ठिकाणच्या तापमानावर अवलंबून आहे.

आता जरी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उद्यापासून जरी झाली तरी कोरोना व्हायरसचे संकट पूर्णत: संपलेले नाही. सध्या कोरोना रुग्ण वाढल्याच्या बातम्या वाचायला मिळत आहेत. तेव्हा शासनाने सावधगिरीचा उपाय दिला, मास्कची सक्ती जरी केली नाही तरी गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर स्वत:हून करणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांनीही मागील दोन वर्षांचा अनुभव लक्षात घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. म्हणजे स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. मागील दोन वर्षांत विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षातील विविध सुट्ट्यांचा आस्वाद जरी घेता आला नाही तरी आपण सर्वांनी कोरोनावर मात केली, याचा सर्वांना आनंद वाटणार आहे. त्यात काहीजणांना जीवाभावाची माणसे गमवावी लागली, याचे पण त्यांना कायम दु:ख होत असणार आहे.

उद्यापासून आपण शाळेत जाणार आहोत तेसुद्धा पास होऊन वरच्या वर्गात. अर्थात एक पाऊल पुढे. काही नवीन तर काही जुने मित्र-मैत्रिणी भेटणार आहेत. भेटून एकमेकांना खूप आनंद होणार आहे. जुन्या आठवणींना उजाळा मिळणार, याचा आनंद काही निराळाच असतो. तो दोन वर्षांत विद्यार्थ्यांना घेता आला नाही. तो या वर्षी घेता येणार आहे.

शाळेतील पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात अतिशय महत्त्वाचा असतो. तो म्हणजे केव्हा एकदा शाळेची घंटा होते आणि वर्गात जाऊन बेंचवर बसतो. म्हणजे वर्षभर त्या बेंचचा मालक या नात्याने बसत असतो. बरेच विद्यार्थी शेवटची बेंच बसण्यासाठी पसंत करतात. म्हणजे आपल्याला सर प्रश्न विचारणार नाही. जे काही असेल ते पुढच्या विद्यार्थ्यांना विचारणार असा समज. ऑफ तासाला कागदाचे गोळे करून वाचन करणाऱ्या विद्यार्थ्याच्या अंगावर फेकणे, आवाज काढणे असे अनेक उपक्रम करीत असतात. यात सर्वच विद्यार्थी करतातच असे नाही. मात्र खरी सुरुवात ही पहिल्या दिवशी होत असते.

आता शाळा सुरू होणार म्हणून विद्यार्थी वर्ग आनंदित दिसत आहेत. जरी कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे आपल्या निदर्शनात येत असले तरी त्याची योग्य ती खबरदारी शासनाला घावी लागेल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी मागील कोरोना काळातील नियमांचे उल्लंघन न करता त्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -