टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, अशी एक म्हण आहे. खरं तर ही म्हण बोलायला आणि ऐकायला सोप्पी आहे. पण जो संघर्ष करतो, टाकीचे घाव सोसतो, त्या यातना भयंकर असतात. तिने असे घाव सोसले. मात्र ती या घावांना पुरून उरली. इतकंच नव्हे, तर असे घाव इतरांच्या वाटेला येऊ नये म्हणून इतरांना मदत करण्यासाठी स्वयंसेवी संस्थेची उभारणी केली. आज खऱ्या अर्थाने ती रंजल्या-गांजलेल्यांसाठी मोठा आधार आहे. ही संघर्ष नायिका म्हणजे अॅड. सुदर्शना विनोद जगदाळे.
अर्चना सोंडे
औरंगाबादचे प्रकाश जाधव म्हणजे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्त्व. सिंचन विभागात नोकरी केल्याने असंख्य शेतकऱ्यांसोबत त्यांचा स्नेह जुळला. औरंगाबाद आणि सभोवतालच्या परिसरात प्रकाश जाधव यांचा आदरयुक्त दबदबा होता. त्यांची सुविद्य पत्नी म्हणजे जनाबाई जाधव. निव्वळ आठवी शिकलेल्या जनाबाई मात्र कविता रचताना विद्यावाचस्पती पदवीधारक वाटायच्या. त्यांनी २००च्या वर कविता रचल्या. महिला आणि नातेसंबंधावर प्रकाशझोत टाकणारा ‘चोळी’ हा काव्यसंग्रह त्यांनी निर्माण केला. शेतकरी आणि सामाजिक संदेश देणारा ‘ओंजळी’ हा काव्यसंग्रह देखील प्रकाशित झाला. या जाधव दाम्पत्यास एक मुलगा आणि एक मुलगी असा छोटा परिवार. सुदर्शना ही मोठी मुलगी.
तसं पाहिलं तर सुदर्शना एकत्रित कुटुंबपद्धतीत वाढली. आजी-आजोबा, काका-काकू, आत्या, चुलत भावंडं असा मोठा परिवार. त्यामुळे नातेसंबंध कशी जपायची असतात याचं बाळकडू तिला लहानपणीच मिळालं. सुदर्शनाचं शालेय शिक्षण औरंगाबादच्या जयभवानी हायस्कूलमध्ये झालं. पुढे देवगिरी महाविद्यालयातून तिने दहावी-बारावी पूर्ण केली. खरं तर सुदर्शनाला फॅशन डिझाईनर व्हायचं होतं. मात्र ते खूपच खर्चिक होतं. कलेची आवड असल्याने ती चित्रकलेतल्या परीक्षादेखील उत्तीर्ण झाली. पुढे तिने एमपी लॉ महाविद्यालयातून लॉसाठी प्रवेश घेतला. मराठी माध्यमातून असल्याने इंग्रजीचा मोठाच अडथळा होता. त्याचा परिणाम आत्मविश्वासावर व्हायला लागला. मात्र सुदैवाने गायत्री ही मैत्रीण भेटली. गायत्री कॉन्व्हेन्टमध्ये शिकल्याने तिचं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होतं. ती सुदर्शनाला मदत करू लागली. सुदर्शनाला हळूहळू कायद्याच्या विषयात रस वाटू लागला. मात्र दुर्दैवाने तिला आजारपणामुळे सहा महिने कॉलेजपासून दूर राहावे लागले.
सगळ्यांना वाटले की सुदर्शना काही पुढे शिकणार नाही. मात्र सुदर्शनाच्या जिद्दीने लोकांच्या शंकासुराला चारीमुंड्या चित केले. दोन्ही सत्रांचे सहा पेपर्स तिने दिले. बारा पेपर्स देऊन ती निव्वळ पास झाली नाही, तर डिस्टिंक्शन तिने मिळवले. पुण्याच्या भारती विद्यापीठात सुदर्शनाने एलएलएमसाठी प्रवेश घेतला. बिझनेस लॉ आणि टॅक्सेशन विषयात तिने पदव्युत्तर पदवी मिळवली. शिक्षण सुरू असतानाच तिच्या लग्नाची बोलणी सुरू झाली. स्थळं येऊ लागली. असंच एक स्थळ आलं. सुदर्शनाचं लग्न झालं, मात्र दुर्दैवाने हा विवाह फार काळ टिकला नाही. नवरा मुलगा हा ऑटिस्टिक पर्सन निघाला. जो स्वत:च्याच भावविश्वात मग्न असतो. कुठेतरी फसगत झाल्याची भावना सुदर्शनाच्या मनात झाली, ती दु;खी राहू लागली. आपल्या मुलीची व्यथा जनाबाईंनी हेरली. त्यांनी सुदर्शनाला धीर दिला. सत्यता जाणून घेतली. पुढे फारकत घेऊन आपली वाटचाल करण्य़ाचा निर्णय सुदर्शनाने घेतला. साधी भाजी निवडतानासुद्धा आपण नीट पारखून घेतो मात्र आपल्या लेकीच्या स्थळ निवडीमध्ये आपल्याकडून एवढी मोठी चूक कशी झाली? या विचाराने सुदर्शनच्या बाबांचं मन खाऊ लागलं. एकत्र कुटुंबपद्धतीत वाढलेल्या सुदर्शनाला नातेसंबंधाची उत्तम जाण होती. आपल्या मुलीबाबत असं कसं झालं? हा प्रश्न जाधव कुटुंबीयांतील सगळ्यांनाच सतावू लागला.
सुदर्शनाला तर नैराश्याने एवढं घेरलं की, आत्महत्येसारखा टोकाचा विचारदेखील तिच्या मनात येऊ लागला. औरंगाबादमध्ये आपली लेक राहिली, तर ती मानसिकदृष्ट्या संपून जाईल, तिला पुढील करिअरसाठी पुण्याला पाठवावं, असा जाधव कुटुंबीयांनी निर्णय घेतला.
पुण्यात ती विविध संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी काम करू लागली. काही महिला हुंडाबळीच्या शिकार, तर काहींना दारुडा पती दररोज मारहाण करतोय. काही महिलांचं लैंगिक शोषण होतंय, तर काही महिलांना गुलामापेक्षासुद्धा हीन दर्जाची वागणूक मिळत आहे. अशा अनेक महिलांच्या समस्या पाहून सुदर्शनाला आपलं दु:ख कमी वाटू लागलं. आपण वकील असून आपली ही अवस्था या महिलांना तर कसलंच संरक्षण नाही, या विचाराने ती थरारली. कायद्याचे पुरेसे ज्ञान नसल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे, हे सुदर्शनाला उमजले. या महिलांना न्याय देण्यासाठी तिने ‘वसुंधरा’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. खडतर आयुष्याची ती आठ वर्षे बरीच काही शिकवून गेली. व. पु. काळेंच्या पुस्तकाने शिकवले की, ‘आयुष्य एकदाच मिळते. मग ते आयुष्य असं कुढत गंजवण्यापेक्षा इतरांचे अश्रू पुसण्यासाठी झिजवावे’ हा निश्चय पक्का झाला. स्वस्ती या स्वयंसेवी संस्थेमध्ये विधी सल्लागार म्हणून निवड झाल्यानंतर देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी कायदेशीर लढा उभारता आला. सोबतच महाराष्ट्रातील असंख्य महिलांना भेटता आलं. त्यांना कायदेशीर लढाई लढण्यासाठी बळ देता आलं. अनेक महिलांचं समुपदेशन करता आलं. त्यामुळे या वैफल्यग्रस्त झालेल्या महिलांमध्ये नवीन आत्मविश्वास निर्माण झाला. महिला दक्षता समितीवरसुद्धा निवड झाली. समुपदेशक आणि कन्सल्टंट म्हणून सुदर्शना यांचा महाराष्ट्रात नावलौकिक आहे.
लग्नसंस्थेवरचा विश्वास उडालेल्या सुदर्शना यांची भेट पत्रकार विनोद जगदाळे यांच्यासोबत झाली. दोघांमध्ये विश्वासाचे दृढ बंध निर्माण झाले. विनोद जगदाळे यांच्यासोबत सुदर्शना विवाहबद्ध झाल्या. या दाम्पत्याला गोंडस कन्यारत्न झाले. ‘जिजा’मुळे सुदर्शना आणि विनोद यांचं आयुष्यच बदलून गेले.
निव्वळ पीडित महिलाच नव्हे, तर तृतीयपंथी, देहविक्रय करणाऱ्या महिला आणि बलात्कारपीडित महिला यांच्यासाठी सुदर्शना यांचा लढा सुरूच आहे. महिलांप्रति त्यांच्या लढ्याची दखल घेऊन २०१६ साली मराठवाड्याच्या सानेगुरुजी कथामालेने घेत ‘कमी वयातील समाजसेविका’ म्हणून सन्मानित केले, तर झेप उद्योगिनीची या संस्थेने ‘आयकॉनिक वुमन अॅवॉर्ड’ पुरस्काराने सुदर्शन जगदाळे यांना या वर्षी गौरविले. ३ ते ५ हजार महिलांना विधीसाक्षर करण्याचा सुदर्शना जगदाळे यांचा मानस आहे.
“आता कुठे आयुष्याला सुरुवात झाली आहे. मात्र, आतापर्यंतचा प्रवास माझे आई-बाबा, भाऊ, पती विनोद जगदाळे यांच्यामुळेच शक्य झाला. जिजामुळे आयुष्य पूर्ण झाले. आता पीडित महिलांच्या उत्कर्षासाठी आणि न्याय्य हक्कांसाठी लढायचे,” अशा शब्दांत त्या आपले उद्दिष्ट स्पष्ट करतात. स्वसंघर्षातून उभं राहणारं नेतृत्व हे खरं नेतृत्व असतं, असं म्हटलं जातं. सुदर्शना जगदाळे म्हणूनच संघर्ष नायिका ठरतात.