मृणालिनी कुलकर्णी
जेष्ठ महिन्यात येणाऱ्या वटपौर्णिमेचा पौराणिक संदर्भ : या दिवशी सावित्रीने वडाच्या झाडाखाली ठेवलेल्या आपल्या नवऱ्याचे प्राण यमाकडून खेचून घेतले. विवाहित स्त्रिया आपल्या पतिप्रेमाचे प्रतीक म्हणून एक औपचारिक धागा वडाला गुंडाळून वडाची पूजा करतात. वटवृक्षाची पूजा करण्यामागचा हेतू, निसर्गतः दीर्घायुषी असणारा वटवृक्ष, फांद्या-पारंब्यांनी विस्तारलेला असतो. अशा वडाची पूजा करून आपल्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे, आपला प्रपंच धनधान्याने, मुला-नातवंडाने विस्तारून संपन्न होऊ दे. अशी प्रार्थना करतात.
व्हॉट्सअॅपवर वाचले, एका सावित्रीने वडाला फेऱ्या मारायला शिकवलं, तर दुसऱ्या सावित्रीने अज्ञानाच्या फेऱ्यातून बाहेर पडायला शिकविले. सत्यवानाच्या सावित्रीपेक्षा फुल्यांची सावित्री समाजाला कळाली असती, तर देशाचा इतिहास काही वेगळा असता; परंतु v सावित्री आंतरिक गुणांची पारख करून स्वतः निवडलेल्या वरास घरातील विरोध डावलून सत्यवानशी लग्न करते. v पतीचे प्राण वाचविण्यामागची सावित्रीची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि मिळालेल्या तीन वरात चातुर्याने यमाला कसे पकडले? हे दृढ न होता, लक्षात न घेता फक्त वडाला धागा गुंडाळण्यात आपण गुंतलो. सावित्रीने पती सत्यवानाला दिलेली साथ, साथसंगत महत्त्वाची.
वटपौर्णिमेच्या निमित्ताने एकमेकांना असामान्य साथसंगत करणाऱ्या परिचित जोड्या ज्यांनी, ‘मी आणि माझे कुटुंब’ एवढाच आपला परिवार न मानता, समाजाला आपला परिवार मानून, समाजातील एखादा प्रश्न हाती घेऊन, त्याच्यासाठी आपले जीवन समर्पित केले.
ती... बुद्धिमान, सोज्वळ, सुस्वरूप, रेशमी वस्त्र नसणारी, मोठ्या घरची लाडकी लेक आणि तो... इतरांपेक्षा वेगळा, क्रांतिकारी विचाराचा, मोठं घरदार सोडून भणंग संन्यासी बनून फिरणारा, आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्धार केलेला; परंतु ती भेटताच घरचा विरोध झुगारून दोघे एकमेकांचे झाले. साधनाताईने बाबा वेगळ्या भाषक संस्कृतीत वाढलेले, सामाजिक जाणिवेने एकत्र आलेले डॉ. बंग दाम्पत्य. लग्नानंतर भारताबाहेर ‘सामाजिक आरोग्य’ या विषयात
उच्च शिक्षण घेऊन गडचिरोलीत डॉ. अभय यांचे, आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा ग्रामीण समाजासाठी उपयोग करायचा हे स्वप्न राणी बंगच्या साथसंगतीनेच साकार झाले.
मेळघाटात बैरागडमध्ये आदिवासी लोकांसाठी काम कारणारे डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे. स्मिताचे राहणीमान अतिशय उच्चभ्रू, फॅशनेबल, कोणत्याही कामाची सवय नाही. हे शहरी आयुष्य सोडून पतीच्या कार्यासाठी सर्वस्वी वेगळे आणि कष्टप्रद आयुष्य स्वीकारले. नव्हे पूर्ण त्यात झोकून दिले. रोजच जगणं आव्हानं ठरावं, असे वास्तव. साप-विंचवांचा सहवास, चुलीवर स्वयंपाक, मातीने सावरलेले कडीकोंडा नसलेले सर्वांसाठी खुले असे घर. मानवता हा एकच धर्म पाळणारे ते दोघे.
अकोल्याच्या साहित्य संमेलनात झालेल्या ओळखीतून विद्यापीठात पहिल्या आलेल्या प्रतीमा केसरकरने सीनिअर कॉलेजची प्राध्यापकी आणि पीएचडी सोडून राजा दांडेकर या फकीराशी लग्न केले. मुख्यतः पत्नी रेणू दांडेकरांच्या साथसंगतीमुळे चिखल गावी एक नव्या वाटेवरच्या अभिनव शाळेचे, राजा दांडेकरांचे स्वप्न साकार झाले. वरील साऱ्या उदाहरणात पतीच्या स्वप्नपूर्तीसाठी पत्नीने सर्वस्वाने दिलेली साथसंगत मोलाची ठरते. आज बऱ्याच स्त्रिया उच्च पदावर कार्यरत आहेत. दोघांची क्षेत्र भिन्न असलेल्या साथसंगतीत पती-पत्नीच्या नात्यात विश्वास हवा. आदर हवा. एकमेकांना समजून घेऊन प्रोत्साहन देणे महत्त्वाचे ठरते. याचीही उदाहरणे खूप आहेत.
शोधक पत्रकार, लेखक, चित्रकार अनिल अवचट आणि त्यांच्या पत्नी, मुक्तांगण व्यसनमुक्तीची संचालिका. त्याची मुलगी यशोदा लिहिते, “आईबाबांचे सुंदर हृद्य नातं, एकमेकांच्या मताचा राखलेला मान, एकमेकांना दिलेली स्पेस, दिलेली साथसंगत हे सारे आम्ही लहानपणापासून जवळून पाहिले. बाबा घरातही खूप मदत करीत. आईला कॅन्सर झाला तेव्हा बाबा सगळं सोडून तिच्या बरोबरीने उभा राहिला.”
परिस्थिती नसतानाही आपल्या साथीदारासाठी सर्वोतोपरी दिली जाणारी साथसंगत आपण सर्वसामान्यांच्या घरातही पाहतो. “एकमेकांसाठीचं जगणं हीच वटपूजेची शिकवण आहे.” आज जवळजवळ प्रत्येक स्त्री नोकरीसाठी बाहेर पडते ते घरची साथसंगत आहे म्हणूनच. रोजच्या आयुष्यात अनेक छोटे-मोठे चढ-उतार येतात. नोकरी जाते, अपघात, आजारपण अशा प्रसंगी एकाच पगारावर घर चालते. “काळजी करू नका, हेही दिवस जातील.” हा आशावाद, धीर देणारे शब्दही वटपूजाच होय.
स्त्री-पुरुष समानतेच्या युगात पुरुषाच्या कर्तृत्वामागे त्याच्या पत्नीच्या तसेच पत्नीच्या यशामागे त्याच्या पतीचा मोठा वाटा असतो. तक्रारीचा कोणताही शब्द न काढता स्वतःहून दिव्यांगाशी लग्न करून तिचे/त्यांचे आयुष्य फुलविणाऱ्यांनाही सलाम, अशीही साथसंगत.
शिरीष चिंधडेनी लिहिलेली कथा - इंग्रजी कवी डांटे गॅब्रियल रोझेटी उत्तम चित्रकारही होते. त्याची मॉडेल इलिझबेद, त्यांच्या लग्नानंतर डांटेच्या प्रतिभेला बहर आला. स्वतः डांटे त्या कविता जपून ठेवीत नसत. त्याच्या कविता इलिझबेद एका वहीत स्वअक्षरांत लिहून ठेवीत असे. मज्जासंस्थेच्या आजारात इलिझबेद गेली. डांटेच्या लिहलेल्या कवितांच्या वहीसह तिचे दफन केले. त्यानंतर डांटेची कविता मूक झाली, चित्रकला रुसली. सात वर्षे गेली. डांटेला वाटले इलिझबेदने एवढ्या प्रेमाने लिहलेल्या आपल्या कवितेची वही, म्हणजेच तिचे प्रेम, तिची स्मृतीच आपण गाडली. शिवाय आपल्याजवळ स्थळप्रत काहीच नाही. ते थडगे पुन्हा उकरले तर...? पापकृत्य तर होणार नाही ना? रितसर परवानगी घेऊन त्यांच्या मित्रांनी इलिझबेदचे थडगे उकरून, पुन:श्च दफन करून ती वही डांटेला दिली. साक्षात मृत्यूच्या दाढेतून ओढून काढलेला हा ऐवज! वही हातात घेताच डांटेचे अश्रू थांबेनात. सत्यवानच्या सावित्रीची आठवण आली. ग्रीक पुराणात ॲर्फियसच्या कथेत संगीताच्या बळावर तो मृत पत्नीला यमलोकातून परत आणतो. कवी डांटेने तिची स्मृती चिरकाल टिकेल, यासाठी ‘पोएम्स’ हा कविता संग्रह प्रकाशित केला. शेवटी “साथसंगतीने एकमेकांसाठीच जगणं हीच वटपूजा होय.”
mbk1801@gmail.com