चतुरस्त्र लेखिका आणि कवयित्री शांता शेळके यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करताना
अनेक कवितांच्या रूपाने त्या आपल्यात वसतील… नव्या पिढीला त्यांचे शब्दसूर निश्चितच कळतील.
कुणास काय ठाऊके
कसे, कुठे उद्या असू?
निळ्या नभात रेखिली
नकोस भावना पुसू
तुझ्या मनीच राहिली
तुला कळेल गीत हे
असेन मी, नसेन मी
तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या
उद्या हसेल गीत हे
-शांता शेळके
प्रियानी पाटील
जेष्ठ कवयित्री शांता शेळके जरी आपल्यात नसल्या तरी त्यांच्या कविता आणि गाणी आज मनामनाला खिळवून ठेवणारी ठरली आहेत. कवितांचं भारावलेपण शब्दांच्या जोडीने अंत:करण व्यापून टाकतात खरं तर. स्त्री मनाचा वेध घेताना माहेरच्या आठवणींचा एक कप्पा शांताबाईंनी अलगद उलगडला आहे. तिचं हसणं, रडणं, मनातील आठवणी, स्त्रियांचा रांधा, वाढा उष्टी काढण्याचा परिपाठ, तिचा संसार, कपाळावरील कोंदण रेखताना शांताबाईंची शब्दशृंखला आजच्या पिढीलाही स्त्रीच्या जगण्याचे अनेक पैलू सांगून जाणारी ठरते.
शांताबाई शेळके हे नाव मराठी कविता, चित्रपटातील गाणी, बालसाहित्य, आत्मकथन, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत आजच्या पिढीमध्ये प्रसिद्ध ठरले आहे.
चतुरस्त्र लेखिका आणि कवयित्री शांता शेळके यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२२ चा. २०२२ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या वर्षी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करताना अनेक साहित्यिक उपक्रम राबविले जातील, त्यांच्या कवितांच्या रूपाने त्या आपल्यात वसतील. अनेक कवी संमेलने, ऑनलाइन काव्याचे नजराणे अपेक्षित आहेत. यानिमित्ताने त्यांच्या कवितांचा वेधही घेतला जाईल. नव्या पिढीला शांता शेळके यांचे शब्दसूर निश्चितच कळतील.
शब्द उलगडताना कवयित्रीचे मनही उलगडत जाते म्हणतात. कवितेच्या रूपाने दिसणाऱ्या भावना या कवयित्रीच्या मनातून, अंत:करणातून आल्याने तिच्या भावनांचा सूर हा प्रत्येकीचा आपला असा बनून जातो. समाजातील प्रथा-परंपरा असोत किंवा असो स्त्रीचं रडणं, कुढणं… या साऱ्यांचा ठाव घेताना कवयित्री खऱ्या अर्थाने शब्दांतून जनमानसापर्यंत सरमरसते. प्रत्येक स्त्रीला ती आपलीशी वाटून जाते. म्हणून कविता जगते. तिची कलाकृती जगते आणि कवयित्रीही मनामनात अजरामर बनून राहते.
आठवणींचे अनेक कप्पे उलगडताना कवयित्री शांता शेळके यांनी एका कवितेत ‘आठवण ही हृदयाच्या बंद कप्प्यात लपलेली असते’ हे सांगतानाच ‘कधी आठवण ही वसंतातल्या गुलमोहरात, तर कधी सागराच्या अथांग निळाईत, तर कधी बहरलेल्या चैत्रपालवीत लपलेली असते’, असे म्हटले आहे आणि ‘या साऱ्यांतून दरवळतो तो आठवणींचा बकुळगंध असतो’ अशी उपमाही दिली आहे.
आपल्या दु:खाशी जगाला देणं-घेणं नसतं खरं तर, तसं आपणही स्वत: त्यात किती गुरफटून राहायचं हे ज्याचं त्याने ठरवलं पाहिजे याचीच प्रचिती देणारी त्यांची कविता – दु:ख समंजस माझे यातून उलगडते, तर
वर्षांमागून वर्षे गेली,
संसाराचा सराव झाला…
यातूनच स्त्रीमनाचे धागे, कंगोरे उलगडतात.
कविता करताना केवळ एकाच विषयाचा धागा पकडून कवितेचे मर्म जोपासले गेले असे कधी होत नाही. कविता जसं सुख, आनंद जाणते तसंच दु:खही जाणते. विश्वाची व्यथा जाणते. अल्लड मुलीचं अवखळ जगणं जाणते, स्त्रीच्या भावना जाणते, स्वत: ती जगते, आई-बापाचं मन जाणते. निसर्गाचा आविष्कार जाणते तसंच रौद्र रूपही जाणते. कवी कोणत्याही विषयाची मर्यादा आखून घेत नाही. कारण त्याचे शब्द अमर्याद असतात.
कवयित्री शांताबाई शेळके यांच्या कविता शालेय जीवनापासून अनेकांनी अभ्यासल्या आहेत. त्यांच्या कविता, गाणी आकाशवाणीवरून अनेकदा कानांना सुमधुर शब्दांची लेणी देऊन गेली असतील.
शांताबाईंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अनेक गाणी, कविता नव्याने उलगडली जातील. अनेक संवादांतून शांताबाईंची लेखणी पुन्हा लोकांना कळेल. कवितांचे शब्दस्फुरण, गाण्यांच्या ओळी पुन्हा उमटतील.
निसर्गाचं रूप चितारताना श्रावणसरींचा उल्लेख शांताबाईंनी ‘कधी हासऱ्या… कधी लाजऱ्या आल्या श्रावणसरी’ असा केला आहे,
तर प्रेमाची भावना जपताना…
‘जाईन विचारीत रानफुला…
भेटेल तिथे गं सजण मला…’
हे गीतही तितकेच प्रचलित झालेले पाहायला मिळते.
अनेक विषयांची आखणी शांताबाईंच्या कवितांच्या रूपाने या जगाला देणगी म्हणून लाभली आहेत. कथा, कादंबरी, कविता असे त्यांनी लेखन केले आहे.
ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांना गदिमा गीतलेखन पुरस्कार १९९६, सुरसिंगार पुरस्कार, केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार, तर साहित्यातील योगदानासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा पुरस्कार आदी पुरस्कार त्यांना लाभले आहेत.
एक प्रतिभासंपन्न कवयित्री म्हणून शांताबाई शेळके यांच्या कविता, गाणी आजही आपला ठसा उमटवून
राहिली आहेत. गीताच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून त्यांचे शब्द हे प्रत्येकाला आपलेसे वाटणारे आहेत. लेखनाच्या शैलीतून जोपासली गेलेली साहित्य प्रतिभा ही अनेक नवकवींना, नवीन साहित्यिकांनाही अभ्यासपूर्ण ठरणारी आहे.