डॉ. लीना राजवाडे
मागील काही लेखातून आपण आहार रस ही संकल्पना समजावून घेतली. षड्रसयुक्त आहार स्वास्थ्यासाठी कसा घ्यायचा हे आजच्या लेखातून समजून घेण्याचा प्रयत्न करू. मधुर किंवा गोड, आंबट या सहाही रसांना स्वतंत्र अस्तित्व नसते. ते द्रव्याच्या आश्रयानी राहतात. जेव्हा रसना किंवा जिभेशी त्या पदार्थाचा संबंध येतो तेव्हा तो रस व्यक्त होतो. आपल्या अंगभूत महाभुताच्या गुणांनी तो शरीराचे पोषण करतो. स्थूल आणि सूक्ष्म दोनही स्तरावर हे पोषणाचे काम चालते. लेखात सोबत दिलेल्या चित्रात अन्न प्रायः चार प्रकारचे असते हे सांगितले आहे. त्याबरोबर आहार वर्ग दाखवले आहेत. यापैकी धान्य वर्ग, मांस वर्ग हा शरीराला विशेषकरून हाडे, स्नायू यांना ताकद देणारा आहे. भाज्या, फळे यातूनही रस, रक्त याचे पोषण होते. मसाला वर्ग हा पचन चांगले ठेवायला मदत करतो. द्रव वर्ग हा स्वतंत्र सांगितला आहे. वय, देश, ऋतू, दिवस, रात्र, अन्न खाणारी व्यक्ती, तिचे कामाचे स्वरूप या सर्व गोष्टीचा विचार करून मग ज्याने त्याने आहार बनवून खावा. हे भारतीय आहारशास्त्राचे वैशिष्ट्य आहे. स्वास्थ्य रक्षणासाठी नित्य काय खावे याचाही निर्देश शास्त्रात केलेला आहे. धान्यवर्ग-साठेसाळ तांदूळ, गहू, सातू शिम्बी (शेंगांतील) धान्य-मूग, मसूर, चवळी भाज्या-पडवळ, वांगे, तांदूळजा, गाईचे दूध, तूप फळे -डाळिंब, खजूर, मनुका, आवळा शिजवून तयार केलेले कोणतेही पदार्थ शिळे खाऊ नयेत. ताजे अन्न खावे. तरच योग्य पोषण मूल्यं मिळतील. ऋतू सापेक्ष तयार होणारे, सेंद्रिय घटक अन्न बनवताना शक्यतो वापरावे.
नवीन धान्य वापरण्यापेक्षा एक वर्ष जुने वापरावे. ते पचायला अधिक हलके असते.आपल्याला भूक किती लागली आहे, त्यानुसार खाद्यपदार्थाचे प्रमाण ठरवावे. आजची गुरूकिल्ली
पंचभुतात्मके देहे आहार : पाञ्चभौतिकः : पाच महाभुतांपासून बनलेल्या शरीराचे पोषण पांच भौतिक अन्नातूनच होते. असे हे अन्न अतिशय सजगतेने खावे, तर नक्कीच अंगी लागेल.
यासाठी आहार विषय आणखी जाणून घेऊ पुढील लेखातून…