श्रीशा वागळे
लोकप्रिय गायक केकेच्या निधनाच्या वृत्ताने अवघ्या मनोरंजन विश्वाला धक्का बसला. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आलं. केकेच्या आधी अनेक कलाकारांचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे तिशी-चाळिशीत मृत्यू झाला. अशा अकाली मृत्यूंमुळे मनोरंजन क्षेत्राचे मोठं नुकसान झालं. मधल्या काळात संगीतक्षेत्रातले अनेक सितारे हे जग सोडून गेले. यामुळे संगीतविश्वाची अपरिमित हानी झाली आहे.
एकापेक्षा एक बहारदार गाणी देणाऱ्या केकेच्या निधनाची बातमी चाहत्यांना धक्का देऊन गेली. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना केके हे जग सोडून गेला. कोलकाता इथल्या कार्यक्रमात उत्साहाने गाणारा, हसऱ्या चेहऱ्याचा केके असा अचानक गेल्यामुळे संगीतविश्वाचं मोठं नुकसान झालं, ही बाब कोणीही नाकारू शकणार नाही. वयाच्या अवघ्या ५३व्या वर्षी केके हे जग सोडून गेला. हृदयविकाराचा झटका हे केकेच्या मृत्यूचं कारण ठरलं. त्याने हृदयविकाराच्या संकेतांकडे दुर्लक्ष केलं. त्यातच कोलकाता इथल्या बंदिस्त सभागृहात एसी बंद असताना त्याने जीव तोडून गाणी म्हटली. त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं. केकेला हॉटेलवर नेण्यात आलं. तो तिथेच कोसळला. रुग्णालयाच्या वाटेवर असतानाच केकेने प्राण सोडला. या धक्क्यातून त्याचे चाहते अद्यापही सावरलेले नाहीत.
केकेने एकापेक्षा एक सदाबहार गाणी दिली. ‘हम दिल दे चुके सनम’मधल्या ‘तडप तडप के दिल से आह निकलती रही’ या गाण्यामुळे केकेला तुफान लोकप्रियता लाभली. केके हे नाव एका रात्रीत घराघरात पोहोचलं. तरुण वर्ग केकेच्या गायकीवर फिदा झाला. या गाण्यातून प्रेमभंग झालेल्या तरुणाच्या हृदयातला दर्द, त्याच्या भावना केकेने अगदी योग्य पद्धतीने पोहोचवल्या. हे गाणं ऐकल्यावर आजही डोळ्यांत पाणी उभं राहतं. प्रेमभंग झालेल्या तरुणाची मानसिक अवस्था काय असेल, याची जाणीव होऊ शकते. यासोबतच ‘सच कह रहा है दिवाना, आशाएं, हम रहें या ना रहें कल, याद आऐंगे ये पल’ अशी कायम स्मरणात राहणारी सुरेल गाणी केकेच्या स्वरांनी सजली आहेत. केके हे अत्यंत उत्साही आणि जोशपूर्ण व्यक्तिमत्त्व होतं. चित्रपटासाठी गाणं असो किंवा मैफिलीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणं असो; तो अगदी समरसून गात असे. गाणं हा केकेचा श्वास होता.
चित्रपटांसाठी पार्श्वगायन सुरू करण्याआधी त्याने जाहिरातींची जिंगल्स तसंच मालिकांची शीर्षकगीतंही सादर केली, अनेकविध भाषांमधली गाणी आपल्या स्वरांनी सजवली. त्याच्याकडून अजून बरंच काही अपेक्षित होतं. अनेक सुरेल गाणी त्याच्या आवाजाने सजणार होती. मात्र त्याआधीच तो काळाच्या पडद्याआड गेला. केकेचा असा अकाली मृत्यू चटका लावणारा ठरला.
यंदा संगीतक्षेत्राला सातत्याने धक्के बसत आहेत. लता मंगेशकर, बप्पी लाहिरी, पंडित शिवकुमार शर्मा आदी दिग्गजांच्या निधनाने संगीतक्षेत्राचं मोठं नुकसान झालं. या सगळ्या धक्क्यांमधून सावरत असतानाच अनेक युवा कलाकार हे जग सोडून जात आहेत. संगीतक्षेत्राला पोरकं करत आहेत. संगीतक्षेत्राचं भविष्य असं अर्ध्यावर डाव मोडून जात आहे. ही बाब खरं तर खूपच दु:खद आहे. केकेच्या मृत्यूआधी सिद्धू मुसेवाला या युवा पंजाबी गायकाची हत्या करण्यात आली.
सिद्धू मुसेवालाचे चाहते जगभर पसरले आहेत. सिद्धूच्या हत्येचा सध्या तपास सुरू आहे. या प्रकरणात अनेकांची नावं समोर येत आहेत. सिद्धू मुसेवालाचं आयुष्य अनेक वादांनी भरलेलं होतं. तो गाण्यांमधून बंदूक दाखवायचा. त्यामुळे तो बंदूक संस्कृतीला चालना देत असल्याचा आरोपही केला गेला. सिद्धूने नुकतीच पंजाब विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. पण त्याला पराभव स्वीकारावा लागला. सिद्धू मुसेवाला अवघ्या २९ वर्षांचा होता.
सिद्धू भारतासोबतच अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमध्येही बराच लोकप्रिय होता. त्याच्या जाण्याने पंजाबी संगीताचं खऱ्या अर्थाने नुकसान झालं आहे. सिद्धू मुसेवालाने भविष्यात खूप चांगली गाणी दिली असती. पंजाबी गाण्यांना मुळातच असणारी लोकप्रियता सिद्धू मुसेवालासारख्या गायकांमुळे गगनाला भिडली होती. सिद्धूने येत्या काळात गायनक्षेत्रात मोठं योगदान दिलं असतं. पण हे फूल फुलण्याआधीच कोमेजून गेलं. तरसेम सिंग सैनी ऊर्फ ताज या गायकानेही खूप लवकर एक्झिट घेतली. तो आशियाई आणि पाश्चिमात्य संगीताचं मिश्रण करत असे. त्याने ही कला उत्तम प्रकारे साधली होती. ‘प्यार हो गया, नाचेंगे सारी रात, गल्ला गुरियां’ ही त्याची गाणी चांगलीच गाजली. वयाच्या ५५व्या वर्षी त्याने हे जग सोडलं. त्याच्या जाण्याने आशियाई आणि पाश्चिमात्य संगीताला जोडणारा एक दुवा निखळला.
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली मृत्यूमुळेही चाहत्यांना मोठा धक्का बसला. सिद्धार्थ अवघ्या ४० वर्षांचा होता. तंदुरुस्त सिद्धार्थ अचानक हे जग सोडून गेला. सिद्धार्थ ‘बिग बॉस’चा एक भाग होता. त्याचं करिअर फुलत होतं. पण काळाला हे मंजूर नव्हतं. हृदयविकाराच्या झटक्याने या तरुण कलाकाराचं निधन झालं होतं. दाक्षिणात्य स्टार पुनिथ राजकुमारच्या निधनानेही अलीकडे अवघा देश हादरला. त्याचे चाहते जगभरात पसरले आहेत. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात पुनीतला हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्याचं निधन झालं. तो तंदुरुस्तीबाबत जागरूक होता. हृदयविकाराचा झटका हे अनेक कलाकारांच्या मृत्यूचं प्रमुख कारण ठरलं.
या क्षेत्रातले ताणतणाव, अपुरी झोप, शरीरावर सतत करावे लागणारे प्रयोग, मेकअप, अतितीव्र स्वरूपाचा व्यायाम अशा अनेक कारणांमुळे हृदयविकार या क्षेत्रातल्या अनेकांना गाठत असल्याचं दिसून येत आहे. मात्र कमी वयात होणारे हे मृत्यू खूपच धक्कादायक आहेत. माणसाच्या रूपात एक गुणवत्ता लोप पावते.
चाहत्यांनाही खूप मोठा धक्का बसतो. या क्षेत्रातल्या अनियिमीत वेळांमुळे शक्य असूनही तंदुरुस्त राहता येत नाही. सततची धावपळही कलाकारांच्या जीवावर उठते. रात्रीची जागरणं, पार्ट्या मारक ठरतात. हे कलाकार जग सोडून जातात आणि त्यांच्या आठवणी मागे राहतात.