Wednesday, April 23, 2025
Homeमहत्वाची बातमीअल कायदाच्या धमकीनंतर महाराष्ट्र ‘हाय अलर्ट’वर

अल कायदाच्या धमकीनंतर महाराष्ट्र ‘हाय अलर्ट’वर

मुंबई : मोहम्मद पैगंबर यांच्या तथाकथित वादग्रस्त वक्तव्यावरून संपूर्ण देशात तणाव वाढू लागला आहे. कुख्यात दहशतवादी संघटना अल कायदाने भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याची धमकी दिल्यानंतर महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या धमकीची सुरक्षा संस्थांनी गंभीर दखल घेतली असून मुंबईतील रेल्वे स्थानकावरील सुरक्षेवर भर दिला जात असून पोलीस श्वानांना घेऊन शोध मोहीम राबवित आहेत.

मोहम्मद पैगंबर यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अल-कायदाने देशातील अनेक शहरांमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट घडवण्याचा इशारा दिल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. अल कायदाबाबत आता महाराष्ट्र ‘हाय अलर्ट’वर आहे.

मुंबईसह महाराष्ट्रातील काही ठिकाणी षड्यंत्राचा इशारा देण्यात आला आहे. कानपूरच्या धर्तीवर काही समाजकंटक दगडफेकीचा कट रचू शकतात. याला गांभीर्याने घेत महाराष्ट्र सरकारने दगड-बॉटल हल्ल्याच्या शक्यतेवर संवेदनशील भागांवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत गृह मंत्रालय लवकरच बैठक घेणार असून, त्यात राज्यातील उच्च पोलीस अधिकारी आणि मंत्रालयाच्या सचिवांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे.

अल कायदाने ६ जून रोजी एक धमकीचे पत्र जारी केले होते, ज्यात म्हटले होते की ते दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये आत्मघाती हल्ले करतील. या धमकीनंतर सर्व राज्ये हाय अलर्टवर आहेत. भगव्या दहशतवाद्यांनी आता दिल्ली, मुंबई, यूपी आणि गुजरातमध्ये त्यांचा अंत होण्याची वाट पाहावी, असे या पत्रात म्हटले आहे. अल-कायदाने विशिष्ट शहरांची नावे देऊन धमक्या देण्याची ही पहिलीच वेळ आहे. अल कायदा दहशतवादी संघटनेच्या पत्रात असे म्हटले आहे की, आमच्या पैगंबराचा अपमान करणा-यांना आम्ही मारून टाकू, आमच्या प्रेषिताचा अपमान करणा-यांना उडवण्यासाठी आमच्या शरीरावर तसेच आमच्या मुलांच्या शरीरावर स्फोटके बांधू, या चुकीसाठी कोणतीही माफी, कोणतीही शांतता आणि सुरक्षितता त्यांना वाचवू शकणार नाही.

केंद्रीय एजन्सींनी धमकीच्या पत्राची पडताळणी केल्यानंतर सर्व संबंधित राज्य पोलीस दलांना हाय अलर्टवर राहण्यास सांगितले आहे. ज्या ठिकाणी प्राधान्याने दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे, त्यामध्ये विमानतळ, रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके आणि गर्दींच्या बाजारपेठांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. कोठेही संशयास्पद व्यक्ति दिसला अथवा संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्या तर तात्काळ सुरक्षा संस्थांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -