शेतकरी आंदोलनासाठी अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या काही वर्षांत प्रसिद्धीच्या झोतात आलेला पुणतांबे हा परिसर आहे. सध्या शेतकऱ्यांनी तेथे आपल्या प्रश्नांसाठी सुरू केलेले आंदोलन स्थगित केले आहे. विश्वाचा अन्नदाता असलेल्या बळीराजालाही आंदोलन करावे लागते, ही आपल्यासारख्या कृषिप्रधान देशाची खऱ्या अर्थांने शोकांतिकाच आहे. कांद्याचे भाव गडगडणे, तब्बल १८ महिने उलटलेल्या उसाला तोडीसाठी मजूर न मिळाल्याने ऊस पेटवून देणे या समस्येने सध्या बळीराजा त्रस्त झालेला आहे. बळीराजाच्या वाढत्या आत्महत्या, कर्जबाजारीपणा हा गेल्या काही वर्षांतील प्रचलित झालेला विषय आहे. एका पिकांमध्ये कमविणाऱ्या बळीराजाला पुढच्या अनेक पिकांमध्ये गमविण्याची वेळ येते.
भारताचे माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ ही घोषणा देताना जवान व किसान यांचा गौरव करताना त्यांच्या व त्यांच्या कार्याप्रती खऱ्या अर्थांने कृतज्ञता व्यक्त केली आहे. जवान सीमेवर बाराही महिने चोवीस तास पहारा करत असल्याने आपण स्वातंत्र्यांमध्ये श्वास घेत आहोत. देशातील जवानांना समाजव्यवस्थेत आजही मान-सन्मान मिळतो, ते योद्धा आहेत, हे सत्य कोणीही नाकारणार नाही. पण दुसऱ्या नाण्याचे काय? जय किसान या घोषणेचे काय? आजच्या प्रचलित समाजव्यवस्थेत आपला अन्नदाता असणाऱ्या बळीराजाला आजही मान-सन्मानाची वागणूक मिळत नाही. बळीराजा आपली भूक भागवित असतानाही बळीराजाच्या पदरी मान-सन्मानाच्या बाबतीत उपेक्षाच पडत आहे. शेती हा अनिश्चिततेचा प्रकार असतानाही वर्षानुवर्षे इतरांची भूक भागविण्यासाठी बळीराजा शेती करत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आजच्या काळात बळीराजा हा भुतलावरील महायोद्धाच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
शेती हा अनिश्चिततेचा प्रकार आहे. कर्मचारी व अधिकाऱ्यांना महिनाभर कंपनी-कारखान्यात, शासकीय-निमशासकीय सेवेत काम केल्यावर महिन्याचे वेतन मिळते. जवानांनाही सरकारकडून वेतन मिळते. पण बळीराजाच्या उत्पन्नाची शाश्वती काय? बी-बियाण्यांच्या किमती वाढत चालल्या आहेत. शेतामध्ये नांगरणी, फणणी, केणी, रोटावेटर वापरण्यासाठी ट्रॅक्टरच्या भाड्यातही कमालीची वाढ झाली आहे. शेतीमध्ये खुरपणी करण्यासाठी मजूर म्हणून काम करणाऱ्या महिला-पुरुषांच्या मजुरीतही वाढ झाली आहे. वीजदेयकामध्ये वाढ झाल्याने घरातील बिलासोबत पाण्याच्या पंपाचे, मोटारीच्या देयकातही वाढ झाली आहे. स्वत:चे पैसे टाकून शेतीमध्ये पीक काढायचे आणि त्या उत्पन्नाला भाव मिळेल की नाही याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही. शेतमाल विकणाऱ्याला एक वेळ पैसे मिळेल की नाही याची खात्री नसते. मात्र शेतमाल बाजारपेठेत पोहोचविणाऱ्या हुंडेकरीवाल्याला, माल वाहतूक करणाऱ्या ट्रान्सपोर्टवाल्याला, मजुरी करणाऱ्या मजुरांना, बी-बियाण्यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्याला, माल विकणाऱ्या व्यापाऱ्याला, मालाची वाहतूक करणाऱ्या माथाडींना मात्र उत्पन्नाची खात्री असते. पण जो शेतमाल पिकविण्यासाठी काबाडकष्ट करणाऱ्या बळीराजाला व त्याच्या परिवाराला उत्पन्नासाठी देवावरच हवाला ठेवायला लागतो. एका पिकामध्ये पैसा भेटला तरी पुढच्या तीन-चार पिकांमध्ये उत्पन्न मिळत नाही. हातातोंडाशी माल आल्यावर बाजारभाव कोसळणे हा बळीराजाच्या बाबतीत नित्याचाच प्रकार झाला आहे.
स्थानिक बाजारपेठेत शहरी भागातील ग्राहकांना भाज्या, धान्य, फळे महागड्या दराने मिळत असल्याने या ग्राहकांचा बळीराजाला भरपूर उत्पन्न मिळत असल्याचा समज होतो. प्रत्यक्षात बाजारात विकल्या जाणाऱ्या शेतमालाच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या हातात नगण्य उत्पन्न प्राप्त होत असते. खत-औषधांचे दुकानदार, बि-बियाण्यांचे विक्रेते, ट्रॅक्टर, शेतमजुरांची मजुरी, वाहतूकदार, हुंडेकरीवाले, व्यापारी, माथाडी या साखळीप्रक्रियेत विक्री झालेल्या उत्पन्नाचा बराचसा भाग जातो. शेती हा अनिश्चिततेचा प्रकार असल्याने शेतकऱ्यांच्या कर्जात वाढच होत चालली आहे. बँका, पतसंस्था व सहकारी संस्थांचे, शेतीविषयक सोसायट्यांचे कर्ज वाढत गेल्याने शेतकरी आत्महत्येचा पर्याय स्वीकारतात व आपल्या परिवाराला पोरके करून, मुला-बाळांना अनाथ करून या जगाचा निरोप करतात. भाजी, फळे अनिश्चिततेचा प्रकार असताना ऊस हा एकमात्र हमखास उत्पन्नाचा प्रकार मानला जात होता, पण दोन वर्षांपासून ऊसतोडीस होत असलेला विलंब आणि तब्बल वीस महिने ते दोन वर्षे कालावधी ऊसतोडीला लागत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात पुन्हा घट होऊ लागली आहे.
उसाला तुरे फुटल्यावर उसाचे वजन कमी होते. त्यामुळे दर कमी मिळतो. बागायती क्षेत्रामध्ये आता बिबट्याचा व वाघाचा वावर वाढू लागला आहे. शेतकरी व त्यांच्या परिवारासह शेतकऱ्यांच्या गायी, बैल, शेळी, ढी, म्हैस यांसह राखणदार असणाऱ्या कुत्र्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. इतक्या संकटाचाही सामना करूनही बळीराजा संघर्ष करत आहे. प्रतिकूल परिस्थितीत हवामानाशी लढत आहे. इतरांचे पोट भरण्यासाठी स्वत:सह व स्वत:च्या परिवाराला अर्धपोटी ठेवत आहे. असा नि:स्वार्थीपणा भुतलावर केवळ बळीराजाच्याच ठायी पाहावयास मिळत आहे. ज्याला भविष्यात शेतमालाला किती भाव मिळेल याची खात्री नसतानाही जो संघर्ष करतो, अशा बळीराजाला व त्यांच्या कष्टाला मानसन्मान भेटलाच पाहिजे. आपल्या पोटाची काळजी करणाऱ्या बळीराजाला आदराची वागणूक दिलीच पाहिजे. त्यामुळे बळीराजाला हा कलियुगातील महायोद्धाच ही उपाधीच सार्थ आहे.