Friday, April 25, 2025
Homeक्रीडाविश्वचषक नेमबाजी : अंजुमला रौप्य

विश्वचषक नेमबाजी : अंजुमला रौप्य

सांघिक गटात स्वप्निल-दीपक-गोल्डीची दमदार कामगिरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या अंजुम मुदगिलने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात रौप्यपदक पटकावले. महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारातील सुवर्णपदकाच्या लढतीत अंजुमला डेन्मार्कच्या रिक्के माएंग इब्सेनकडून १२-१६ अशी हार पत्करावी लागली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या अंजुमने त्यापूर्वी ६०० पैकी ५८७ गुण मिळवत अव्वल आठ नेमबाजांच्या मानांकन फेरीत प्रवेश मिळवला होता.

त्यानंतर मानांकन फेरीत अंजुमने ४०६.५ गुणांसह दुसरे स्थान मिळवले, तर अव्वल स्थानावरील इब्सेनचे ४११.४ गुण होते. सुवर्णपदकाच्या लढतीत अंजुमने इब्सेनला उत्तम झुंज दिली. मात्र, मोक्याच्या क्षणी इब्सेनने अचूक वेध साधत सुवर्णपदक आपल्या नावे केले. त्याचप्रमाणे, ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारातील पुरुषांच्या सांघिक गटात भारताच्या स्वप्निल कुसळे, दीपक कुमार आणि गोल्डी गुर्जर यांनी रौप्यपदक जिंकले. अंतिम लढतीत त्यांना क्रोएशियाच्या त्रिकुटाने १७-७ अशा मोठ्या फरकाने नमवले.

पदकतालिकेत भारत तिसऱ्या स्थानी

अंजुम आणि पुरुष संघाच्या कामगिरीमुळे भारताने विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या पदकतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताच्या खात्यावर एक सुवर्ण आणि तीन रौप्य अशी एकूण चार पदके आहेत. अव्वल स्थानावरील कोरियाने एकूण पाच (तीन सुवर्ण), तर दुसऱ्या स्थानावरील सर्बियाने एकूण चार (दोन सुवर्ण) पदके मिळवली आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -