Categories: कोलाज

“इलो रे, पाऊस इलो रे..….!”

Share

अनुराधा परब

पहिला पाऊस चैतन्याची पेरणी करतच येतो. वैशाख वणव्याने पोळलेली धरणी आकाश मिलनासाठी आसुसलेली असते. निळ्याशार समुद्राचं पाणी उधाणायला लागतं आणि क्षितिजी काळ्या मेघांच्या लडी मागून लडी उलगडायला सुरुवात होते. पावसाचे थेंब मातीत मिसळताच आसमंत मृद्गंधाने दरवळून जातो. हा सगळा मिलनोत्सुख नखरा पाहायला हाडाच्या शेतकऱ्याला सवड तरी कुठे असते. मृग नक्षत्र लागण्यापूर्वीच त्याला आपल्या शेताची मशागत पूर्ण करायची असते. निसर्गातून त्याला मिळणाऱ्या पावसाच्या संकेतांवरून तो सरासरी पावसाची, आपल्या शेतीतल्या उत्पादनाची भाकितं बांधत असतो. सिंधुदुर्गातही चित्रं याहून वेगळं अजिबात नसतं.

परशुरामाने २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रीय करून कश्यपांना पुन्हा वसविण्यासाठी दानही केली; परंतु दान केलेल्या या भूमीमध्ये वास्तव्य करणे योग्य नसल्याने तिथे प्रतिसृष्टी निर्माण करावी, असा विचार समोर आला. प्रतिसृष्टीसाठी आवश्यक भूमी मिळावी म्हणून सह्याद्रीवरून सागराला काही अंतर मागे हटायला सांगत भूमीची मागणी करण्यात आली. उन्मत्त सागराने ही मागणी फेटाळताच परशुरामाने आपल्या सात बाणांनी कच्छ ते कन्याकुमारीपर्यंतचा भूभाग सागरापासून विलग केला. मात्र आपल्या हिश्श्याची जमीन हिरावून घेतली म्हणून समुद्र शोक करत होता. शिवाय या भूमी निर्माणाच्या प्रक्रियेत अनेक जीवांना नाहक प्राणाला मुकावे लागले. म्हणून ही भूमी शापित झाली. शापाने पोळलेल्या भूमीला उःशापही मिळाला खरा. तरीही शापाच्या खुणा शिल्लक राहिल्याच. त्याचेच पर्यावसान हे काही रिती- परंपरांमध्ये झालेले दिसते. विलग केलेल्या या भूमीला परशुरामाने “कुकण” असे नाव दिले, अशी आख्यायिका आहे.

कु म्हणजे वाईट आणि कण म्हणजे अंश. ज्या भूमीमध्ये जो वाईटाचा अंश आहे तो जळून जावा आणि त्यातून चांगलं ते निष्पन्न व्हावं म्हणून “जळो पण पिको” या उःशापानुसार मृगाच्या पावसापूर्वी शेतीचा कोपरा न् कोपरा जाळला जातो आणि नंतर पीक काढले जाते, अशीही एक कथा पूर्वापार घट्ट रुजलेली आहे. पहिल्या पावसानंतर नांगरणी – पेरणीची धांदल इथे पाहायला मिळते.

कोकणातले मुख्य अन्न भात आणि मासे. नैसर्गिक पावसावर अवलंबून असलेल्या इथल्या भातशेतीमध्ये पारंपरिक वाणांबरोबरच नवीन वाणांचीही पेरणी होताना सध्या दिसत आहे. वालई – लाल तांदूळ तसेच वाडा कोलम, बासमती ही वाणेदेखील घेतली जातात. उत्तर कोकणामध्ये भातपिकाची लावणी करताना लावणीगीते गाण्याची पारंपरिक पद्धत रूढ आहे. तसा प्रकार सिंधुदुर्गामध्ये नाही. मात्र भातपीक लावणीसाठी एकत्र येणे, मदत करणे या गोष्टींना आजही समाजजीवनात महत्त्व आहे. पेरणी काळातच फक्त नाही तर इतर वेळीही इथल्या लोकांच्या न्याहारीमध्ये उकड्या तांदळाची पेज असते. तर दुपारच्या जेवणात माशांचं कालवण आणि भात यावरच भर असतो. उन्हाळी वाळवणाचा उपयोग पावसाळ्यात हमखास होतो. पावसाळ्यात भाजीपाल्याची वानवाच असल्याकारणाने सगळी भिस्त रानभाज्या, कडधान्यांवर किंवा कोंबड्या, माशांवर असते. पावसाळ्याचे मृग नक्षत्र आणि कोंबडी-वडे हे नातंसुद्धा लोकसाहित्यात, परंपरेत, मौखिक संस्कृतीत खूप खोलवर रुजलेलं दिसून येतं.

“ मिरग म्हंजे काय कोंबो आणि वडे मस्त पडताच पाऊस ढग गडगडे पावसांत भिजाक गेलो तर आऊस बडबडे…”

अशा गीतातून नात्याचं सुंदर रूप समोर येतं. कृषी आणि सागरी संस्कृती यांचा मिलाफ इथल्या समाजजीवनात दिसून येतो. “आराड गे मांडके सांजांवने, शेतातली आये घरां येवूंदे…” अशी शेतात कामासाठी गेलेल्या आईची वाट बघणाऱ्या लेकरांची गाणी ऐकू येतात. किंवा “शेत माझं डोंगरी गे,

तिथे माझं म्हायेर गे…” यासारखी आप्तजनांविषयी चिंता व्यक्त करणारी गाणीही सहज सुचतात. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या पृथ्वीवरील स्वर्गातल्या माणसाचं जगणं दारिद्र्याचं, संघर्षाचं. शेतीतून हाती येणारं उत्पन्न घरापोरांपुरतंच मिळत असल्याने चाकरमान्यांच्या मदतीवर अवलंबून असलेल्या कोकणी माणसांच्या जगण्याबद्दल वि. कृ. नेरूरकर लिहितात –

“बाळो बैल मेलो भोरी रेडी
ठकली (थकली)
जोत कसा फाल्या उब्या रवंतला…
कापल्यापासून भात खावनच सरलां
खंडाक धनी येता दारात बोंबयता
पैसे होये घालूक ठकल्यावर त्याच्या
गरज कशी तरी गांठव रे – झिला…”

जगणंच सारं शेतीवर अवलंबून असलेल्या कोकणातल्या भातशेतीमध्ये जिथे पाणी राहाते तिथे उन्हाळी भातशेतीचे दुसरे पीक घेतले जाते. याला वायंगणी शेती (रब्बी पीक) म्हणतात. पावसाळी भातशेतीपेक्षा किफायतशीर असलेल्या वायंगणी शेतीला इथला शेतकरी महत्त्व देतो. उशिरापर्यंत होणारा पाऊस जसा या भातशेतीच्या पथ्यावर पडतो त्याचप्रमाणे कोकणातले उष्ण व दमट हवामानही त्याला पोषक ठरते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ व मालवण तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ही भातशेती करण्यात येते. मालवण तालुक्यातील वायंगणी, काळसे, ओवळीये, चिंदर, बागायत, मसदे इत्यादी गावांतून वायंगणी शेतीचे पीक घेतले जाते. खरीप हंगामाप्रमाणेच शेतीची नांगरणी, चिखलणी वगैरे होऊन उत्पादनवाढीसाठी खताची मात्रा वाढवावी लागते. कमी काळात अधिक उत्पन्न देणाऱ्या भातवाणांची लागवड यावेळी केली जाते. दलदल, नदीकिनारी, पाणथळ जागांच्या आसपासच्या जागांवर वायंगणी शेती बहरून येते. यात कधी चवळी, वाल, मटकी, उडीद यांसारखे आंतरपीकही घेतले जाते. येत्या ७ तारखेक मिरग (मृग नक्षत्र) लागतो. वेशीवरचा पाऊस घरात येतला. खळ्यात, मळ्यात पानी भरतला. व्हाळात चढणारे कुर्ले काढूक, टोपलीभर माशे पकडूक पोरांटोरा निघतली. वातावरणात एकच पुकारो घुमतलो…

Recent Posts

SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…

49 minutes ago

अटारी बंद, व्हिसा रद्द, सिंधू करार बासनात, पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…

54 minutes ago

कोकणातील माकडे व वानरांचे निर्बीजीकरण करणार!

निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…

2 hours ago

६४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत जाहीर

गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…

2 hours ago

पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार!

राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…

3 hours ago

IPL सामन्यात काळी पट्टी बांधून उतरले खेळाडू, चिअरलीडर्स गायब…पहलगाम हल्ल्यानंतर झाले हे बदल

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…

3 hours ago