डॉ. विजया वाड
आजच्या जमान्यात नयनकडे मोबाइल नव्हता. त्याचे बाबा म्हणाले होते की, नयन अकरावीत गेला, की ते मोबाइल घेतील म्हणून आणि ते नयनने ऐकले होते. शहाण्या मुलासारखे.
प्रिय आईबाबा, आज त्याच भाग्यवान कुटुंबांची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. नयनला का वाटत नव्हते? आपल्याकडेही इतर मुलांसारखा मोबाइल असावे ते! पण नववीत गेलेल्या चौदा वर्षांच्या मुलाला आपल्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज बरोबर असतो आणि आपले आईबाबा हे लेकराच्या सुखासाठी काय वाटेल ते कष्ट झेलतील, याची खात्रीही असते. नयनलाही ती होती… आणि म्हणून बाबांनी सांगितल्याप्रमाणे अकरावीतच मोबाइल वापरू लागणार होता.
मित्रांनाही तो सांगे, “मलाच नकोय मोबाइल. बाबा अकरावीत घेणार आहेत. कारण मीच त्यांना सांगितले आहे.”
बघा हं, प्रिय आईबाबा. किती शहाणं लेकरू होतं ते. या नयनची जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेसाठी निवड झाली. त्याला आता फोंड्यातून पणजीला जायचे होते. तिथे तीन दिवस राहायचे होते. आई म्हणाली, “मी येऊ का रे नयन सोबत?”
“नको गं, मी का आता लहान आहे?” नयन म्हणाला.
“रात्री नयन झोपल्यावर आई नयनच्या बाबांना म्हणाली, “अहो पैशाची तजवीज करायला हवी.”
“मी माझ्या मेडिकल स्टोरच्या मालकाला विचारलं गं!”
“मग? तो नेहमीसारखा नाही म्हणाला ना”
“हो गं” बाबांच्या डोळ्यांत पाणी आले.
“तुम्ही जीव छोटा करू नका. माझ्याजवळ हळदी कुंकूवाचा चांदीचा करंडा आहे. तो काढूया. नयनची आई समंजस होती ना! आपल्या नवऱ्याशी पैशावरून कधी वाद घालत नसे. इतर बायकांसारखी. तिचा नवरा मेडिकलच्या दुकानातला एक सामान्य विक्रेता नोकर होता. लग्न करतानाच तिने तो मान्य केला होता ना. मग आता भांडण कशास? तरी नयनच्या बाबांनी ठरविले की, आपले मनगटी घड्याळ विकायचे.
नयन जिल्ह्याच्या ठिकाणी वादविवाद स्पर्धेसाठी जाणार. त्याला पांढरे शुभ्र कपडे हवेत. बूट मोजे हवेत. माझा मुलगा हुशार आहेच. चमकदारही दिसो. नयनच्या बाबांनी मनात आपला निश्चय पक्का केला.
अशी दोघांनी पैशांची तजवीज केली आणि आपापल्या वस्तू विकून नयनला पांढरी पँट, सदरा चड्डी, नवे बूट मोजे आणले.
“कसे काय जमवले हो आईबाबा?” त्याने विचारलेच.
“जमवले, तू खूश ना?” “मी जाम खूश.. खूशम खूश आईबाबा” तो अतिशय आनंदाने म्हणाला.
आईबाबांनी नवे कपडे घातलेल्या, नव्या बूट मोजात रुबाबदार दिसणाऱ्या आपल्या लेकराला मोठ्या प्रेमानंदाने निरोप दिला.
शाळेच्या शिक्षण कक्षातील एका नॉनटीचिंग स्टाफला नयनसोबत पाठविण्यात आले. नयन शाळेचे प्रतिनिधित्त्व जिल्हास्तरावर करीत होता. शाळेसाठी ही मोठी अभिमानाची बाब होती. नयनचा विषय होता ‘कुटुंबसंस्था नामशेष होत आहे काय?’ नयनने फार सुंदर तयारी केली होती. आपला विषय सुरेख मांडला त्याने.
त्याचे काही विचार तर टाळ्यांनी गाजले. “आज गृहिणी, गृहस्थ, मुले… सारेच टेक्नोसॅव्ही झाले आहेत. ही केवढी अभिमानाची बाब आहे. पण खरेच सांगतो. यंत्रे ही साधने आहेत, साध्य नव्हे. घरातली माणसे जर टीव्ही, व्हॉट्सअॅप, ई-चॅट, संगणक यात सर्वत्र रिक्त वेळ घालवू लागली, तर घरातल्या व्यक्तींची स्वकेंद्री वर्तुळे तयार होतील अन् संवाद नष्ट होऊन घर नुसते भिंतीचे बनेल. माणसे, नातीगोती, आपुलकी, जिव्हाळा, हास्यविनोद, आदरातिथ्य या साऱ्या साऱ्या गोष्टी तेथून हळूहळू नष्ट होतील. भारतीय संस्कृती मी, माझे, मला अशी कधीच नव्हती. ती आपण आपले सर्वांचे, सर्वांसाठी अशी होती. घराची व्याख्या ‘घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती’ अशी होती तेव्हा यंत्राचा सुयोग्य वापर करून घराचा नात्यांचा ओलावा जपूया. आपण ‘कनेक्टेड विथ दि वर्ल्ड अँड डिसकनेक्टेड विथ दि फॅमिली’ अशी आपली व्याख्या कधीच नव्हती आणि नसावी. भारतीय संस्कृती, परंपरा, ‘अतिथी देवो भव’ ही भावना जपण्याची धडपड, आईच्या मायेच्या हातांनी बनविलेले रुचकर, स्वादिष्ट अन्न, बापाची आश्वासक ऊब, आजी- आजोबांचे मायेचे हात यासकडे सारे जग आशेने बघत आहे. आपण पाश्चात्त्याचे अंधानुकरण न करता आपली महान संस्कृती जपूया. जयहिंद!”
बापरे बाप… टाळ्यांचा गजर हॉलभर घुमला. जयहिंदचा नारा झाला. नयनला जिल्हास्तरावर पहिले बक्षीस तर मिळालेच, वर प्रेक्षकांतूनही उत्स्फूर्तपणे छोट्या-छोट्या रक्कमांची बक्षिसे येऊन त्याचे खिसे गच्च भरले. नयनने आपल्या शाळेचे नाव रोशन केले. आई-वडिलांच्या नावाला कीर्तीचा सुंगध दिला. थोडी खरेदी करून तो परत फोंड्याला दाखल झाला. आईने दृष्ट काढली. बाबांनी जवळ घेतले. बाप्पापाशी पेढा ठेवून त्याच्या मुखी घातला. त्यांस त्याने वाकून नमस्कार केला, तेव्हा मनापासून आशीर्वाद दिला.
“जयतु शुभम भवतू”
आणि मग नयनने आपली बॅग उघडली, “आई, तुजसाठी हा चांदीचा हळदी-कुंकुवाचा करंडा’ त्याने तो आईस दिला. “मी सारे बोलणे ऐकले होते तुमचे दोघांचे. झोपलो नव्हतो.” तो म्हणाला.
“माझा गुणाचा छोनूला.” आईने नयनला जवळ घेतले.
“थांब, बाबांच्या हाताला घड्याळ बांधायचे आहे. रिकामा हात बरा दिसत नाही.” नयन म्हणाला. आईची मिठी सोडवत त्याने पोतडीतून घड्याळ काढले. बाबांच्या मनगटावर बांधले.
आई, बाबा, नयन… सगळे रडत होते. पण अश्रू आनंदाचेही असतात, नाही का आईबाबा? फार पवित्र फार मंगल…
नयनची गोष्ट एवढ्यासाठी सांगितली की, आपले घरही असेच ऊबदार असू द्या, माणूसपणा जपणारे, नात्यांमधला गोडवा टिपणारे, नातीगोती यंत्रापेक्षा अधिक मानणारे, आपल्या मातीचा गंध नाकात साठवणारे, आईच्या मायेचा पदर नि बापाच्या छातीची ऊब आपल्या लाडक्या मुलांना देणारे. एक ‘भाग्यवान’ घर नयनसारखे…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…