अनघा निकम-मगदूम
अवकाळी पावसाच्या सरी आणि वाऱ्याची बदललेली दिशा यातून जशी मान्सूनची चाहूल लागलीय, तशीच चाहूल समुद्राच्या बदलत्या रंगाने, समुद्राच्या वाढत्या गाजेनेसुद्धा येऊ लागलीय. आता हळूहळू समुद्र आपलं रंग, रूप एकदम बदलून टाकेल. एरव्ही शांत वाटणारा, हवाहवासा वाटणारा हा दर्या पावसाच्या स्वागतासाठी एकदम सज्ज होईल. त्याला आनंदाचं इतकं भरतं येईल की, मग त्याचा उधाणलेपणा कुणाच्याही आवाक्यातच येणार नाही. हेच सारं सुरू आहे सध्या कोकणातल्या किनाऱ्यावर! ऋतू बदलाचे संकेत जसे जसे येऊ लागलेत, तसतसे समुद्रातसुद्धा बदल होऊ लागलेत आणि या बदलाची चाहूल लागलेला मच्छीमारसुद्धा आपल्या पालनकर्त्या समुद्राचा काही काळ निरोप घेऊन किनाऱ्यावर माघारी लोटलासुद्धा आहे.
गेल्या काही वर्षांपासून मासेमारीमध्ये यांत्रिकीकारण आले, यंत्राने माणसाला अपरिमित ताकद दिली आहे. माणसाने त्याच्या बुद्धीने यंत्र तयार केली आणि आता हीच यंत्र ताकद, पैसा, सत्ता याचा लोभ दाखवून माणसावरच राज्य करू लागले आहेत. त्यामुळेच एकीकडे ताकद मिळाली. पण अनेक गोष्टींचा ऱ्हास सुरू झालाय. हाच परिणाम मासेमारीमध्ये यंत्रांचा शिरकाव झाल्यानंतर दिसू लागला आहे. पारंपरिक मच्छीमार हे मे महिन्याच्या शेवटी आपली मासेमारी आटोपती घेऊन आपल्या नौका किनाऱ्यावर ओढतात. नारळी पौर्णिमा होईपर्यंत समुद्र उधाणलेला असतो, हाच काळ मोठ्या प्रमाणावर माशांचा प्रजननाचा काळ असतो, तर उधाणलेल्या समुद्रात पारंपरिक नौका घेऊन जाणं हेही तसंच जिकरीचं असतं. पण यंत्रांनी मच्छीमारी व्यवसायात प्रवेश केला आणि काळ, वेळ, ऋतू, दिवस यांचा हिशोब राहीनासा झाला. अनियंत्रित मासेमारी होऊ लागली. छोटी छिद्र असलेली पर्ससीन नेट समुद्रात टाकली जाऊ लागली. या जाळ्यांनी समुद्राचा तळ अक्षरशः खरवडून निघू लागला. याचाच परिणाम होत मत्स्य उत्पादन घटत जाऊ लागलं. त्यामुळेच अखेरीस शासनाला पावसाळ्यातील दोन महिन्यात मासेमारी करण्यावर कायदेशीररीत्या निर्बंध आणणं गरजेचं झालं. पण त्यानंतरही मच्छी उत्पादन घटत जाऊ लागल्याने पारंपरिक आणि पर्ससीन नेट मासेमारी हे दोन वेगवेगळे विभाग करून पर्ससीन नेट मासेमारीला सप्टेंबर ते डिसेंबर चार महिन्यांच्या कालावधीत मासेमारीला परवानगी देण्यात आली.
नैसर्गिक साधनसंपत्ती टिकवणं हे लोकांनीच निवडून दिलेल्या शासनाचंच काम नव्हे, तर सर्वसामान्य माणसाचीसुद्धा ती महत्त्वाची जबाबदारी आहे. आपण ज्या निसर्गासोबत जगतो, ज्या निसर्गामुळे जगतो त्या निसर्गाचं जतन, संवर्धन करणं हीसुद्धा आपलीच जबाबदारी आहे. त्यांना दिलेली संसाधन टिकवणं हीसुद्धा मनुष्याची जबाबदारी आहे. मात्र हे होत नसल्यामुळेच मत्स्य व्यवसायात संघर्ष दिसतोय. मच्छीमारच एकमेकांसमोर उभे ठाकलेत. पारंपरिक की पर्ससीन? यात वाद टोकाला गेलेत. त्यात शासनाने पारंपरिक मच्छीमारीला प्राधान्य दिल्याने हा वाद टोकाचा होऊ लागला.
अर्थात चौकटीतून बाहेर पडून नवं काहीतरी, नव्या सुधारणा करणे आणि आपली प्रगती करणे हा मनुष्य स्वभाव! त्यामुळे मासेमारी व्यवसायातील यांत्रिकीकरण, सुधारणा, बदल हे अपेक्षित आहेतच. आज केवळ पारंपरिक मासेमारी ही चौकट ठेवून व्यवसाय करणे नक्कीच अवघड आहे.
पण निसर्गानं आपल्याला जगायला शिकवलं, जगताना लागणारी संसाधने निसर्गानेच उपलब्ध करून दिली. त्यात मासे आणि मासेमारी हा त्याचाच एक भाग आहे; परंतु मनुष्याने मात्र निसर्गाकडून ओरबाडणे आणि स्वतःलाच विकास करणं एवढीच भावना ठेवल्यामुळे हीच संसाधन संपताना त्यांचा ऱ्हास होताना दिसतोय. आज मे महिन्याच्या शेवटी जेव्हा बोटी किनाऱ्यावर विसावतात, त्यावेळी दोन महिन्यानंतर सुरू होणाऱ्या हंगामात किती उत्पन्न मिळेल, त्यातून किती फायदा मिळेल हा विचार पारंपरिक आणि पर्ससीन नेट वापरणाऱ्या प्रत्येक मच्छीमाराला पडत असतोच. गेल्या काही दिवसांपासून डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. मासेमारी व्यवसायातील खर्च प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत आहे आणि दुसरीकडे तीव्र स्पर्धा, परराज्यांतील व्यावसायिकांची घुसखोरी आणि त्यातून कमी प्रमाणात मिळणारे मच्छी उत्पादन हा या मासेमारी व्यवसायावर खूप मोठा परिणाम करणारा घटक आहे. याचा विचार होणार आवश्यक आहे.
त्यातून बाहेर पडून मच्छीमाराला दर्याच्या लाटांवर स्वार होऊन या व्यवसायात पुन्हा ऊर्जितावस्था आणणे आवश्यक आहे. यासाठी या समुद्र राजावर विसंबलेल्या प्रत्येकाने त्याची संसाधने कशी टिकतील, त्यात माझा सहभाग किती असेल, याचा विचार करणे आज खूप गरजेचे झाले आहे.