Saturday, July 5, 2025

नाऊ वी आर ॲट पीस!!

नाऊ वी आर ॲट पीस!!

मैने जिंदगी के उसूल बदल से दिये हैं
आँखो में सपनो के दिए सजा तो दिये हैं
नमी हैं पलको पे, धुँआ धुँआ से हैं
जिंदगी के रास्ते मैंने अब बदल से दिये हैं!


डॉ. स्वप्नजा मोहिते

गोव्याच्या त्या समुद्र किनाऱ्यावर ती ध्यान लावून बसली आहे. पिंगट सोनेरी केस वाऱ्यावर भुरभुरत आहेत. मावळतीच्या सूर्याचे किरण तिच्या केसात रेंगाळताना एका वेगळ्याच रंगाने चमकत राहिलेत. तिच्या लांबसडक पापण्या गालावर विसावल्या आहेत. मघाशी समुद्रात पोहून आल्याने, पाण्याचे थेंब तिच्या अंगा-खांद्यावर चिकटून, मोत्यांगत चमकत आहेत. जलपरी... सुंदर गोऱ्या गुलाबी कांतीची... गुलाबाच्या लालचुटुक कळीसारख्या ओठांची... समुद्राच्या अथांग गहिराईच्या निळाईनं भारलेल्या डोळ्यांची... जलपरी! मी मागच्या शॅकच्या सावलीत बसून तिला न्याहाळतेय. हा किनारा तसा मुख्य गोव्यापासून... तिथल्या गर्दीपासून दूर... काहीसा अनटच्ड... मोकळा आणि आपलासा वाटणारा! पीसफुल!! आजूबाजूला माडांची झालर आणि भरती-ओहोटीचे संगीत सोबतीला! त्या रेशमागत मऊसूत असणाऱ्या पुळणीवर या टोकापासून त्या टोकापर्यंत... कोणीच नाही डिस्टर्ब करायला...


अशा त्या पिक्चर परफेक्ट बीचवर मी माझ्यातच गुमसुम होऊन बसलेय. जिंदगी तुने कहाँ ला छोडा... न अपनो में हूँ, न अपनी हूँ... बस तुझे गुजरते देख रही हूँ... अतीत में छोडे चिन्ह तो हैं कई... दर्द के घावों उभरते देख रही हूँ! मैं और मेरी तनहाई अक्सर यह बाते करते रहते हैं!


मी आत्ममग्नशी... स्वतःतच गुरफटून बसलेली आणि ती तिच्यात! कुठलं तरी एक अनामिक नातं असावं तिच्यात आणि माझ्यात. समोर सूर्य, समुद्राच्या बाहुपाशात शिरण्यात उत्सुकसा! उतरती किरणं लाटांवर हळूवार विसावत आहेत. सभोवतालची निरव शांतता पांघरून आम्ही बसलोय. ती तिचं ध्यानस्थ आसन मोडत नाहीये... मी माझी बैठक सोडत नाहीये. न जाणो त्या हालचालींनीही शांतता भंग पावायची भीती वाटत असावी आम्हाला! लाटांच्या फेन फुलांचा पिसारा पुळणीवर विखुरतो आणि एकमेकींशी पाठशिवणीचा खेळ खेळत, लाटा परत माघारी फिरतात. मावळतीचे किरण तिच्या देहाच्या नक्षीवर अजूनच सोनसळी होत जातात. तिला जाणवलं असेल का माझं आस्तित्व? तिच्या त्या ध्यानस्थ मूर्तीभोवती शांततेचं एक आवर्तन उमटतंय... ते मला भंग करायचं नाहीये. तरीही मी तिला न्याहाळतेय!


नकळतपणे ती डोळे उघडते आणि तिच्या पद्मासनाची अवस्था बदलत, ती मान वळवते. तिच्या गोऱ्या गालावरल्या आसवांच्या रेषा, बुडत्या सूर्याच्या साक्षीनं अधिकच ठळक होतात. जिंदगी तूने यह क्या कुछ दिया? कभी साँसों को छू लिया... कभी आँसूओं को मेरे नजर कर दिया? मी माझ्या आठवणींच्या गुंत्यात अडकलेय. किती एकटेपण हे? माझं मीच ओढून घेतलेलं? की एक एक हात सुटत गेल्यानं माझ्या जिंदगीत आलेलं? तिनं बाजूच्या सॅकमधून काही फोटो काढले आणि अलगद त्यावर आपले ओठ टेकवले गुडघ्यावर हनुवटी टेकवून, ती अपलक ते फोटो न्याहाळतेय! हुंदक्यांनी तिचं शरीर गदगदताना दिसतं तशी मला माझ्या आतल्या घुसमटीची नव्यानं जाणीव होते. उफ्! कितना दर्द छुपाये रखा हैं, ए दिल तूने यह क्या संभाले रखा हैं, यूं तो पहले कभी शिकायत न थी, अब यह क्या मंजर बनाये रखा हैं!


किनाऱ्यावर मंद प्रकाश आहे. मी तिच्या बाजूला बसलेय. तिच्या शेजारी बसून, मी समोरच्या अंधारल्या सागरावर नजर रुतवून बसलेय. लाटा येतात आणि जातात. तिच्या डोळ्यांतली आसवं आता मुक्तपणे झरत आहेत. माय मॉम अँड डॅड, आय लॉस्ट देम लास्ट मंथ इन ऍन ऍक्सिडेन्ट... आय कूड नॉट क्राय देन! मी तरी कुठे रडले होते तेव्हा? बाबांचा तो व्हेंटिलेटरच्या जाळ्यात गुरफटलेला देह बघून मी सुन्न झालेले ..... आय कूड नॉट क्राय! ते असे कसे राहतील व्हेंटिलेटरवर? नेहमी हसणारे, हसवणारे... माझ्या प्रत्येक प्रश्नाला तेवढ्याच सहनशीलतेनं समजून घेणारे... मला त्यांची उत्तरं शोधायला मदत करणारे माझे ब्रिलिअंट बाबा. ही वॉज माय हिरो, ते असे या हॉस्पिटल बेडवर?


आय कूड नॉट एक्सेप्ट दॅट! त्यांचा तो वेदनांनी पिळवटणारा चेहरा अजून मनात खोलवर रुतून बसलाय! ते बाहेर पडतील यातून आणि आमचं जग पुन्हा जुन्या वाटांनी पुढे सुरू राहील... मला खरंच वाटलं होतं! पण तो हात हातातून सुटून गेला... आय स्टील कूड नॉट एक्सेप्ट दॅट! ते दोघे गेले आणि मी एकटी पडले... आय लॉस्ट माय वर्ल्ड! व्हाय गॉड टुक देम अवे? व्हाय?? तिच्या हातातले फोटो डोळ्यांतल्या आसवांनी पार भिजून गेले होते. खरंच, का नेतो देव आपल्या माणसांना? जगात राहण्याचं ओझं आपल्या खांद्यांवर टाकून? मी तिचा हात हातात घेऊन नुसतीच मूकपणे क्षितिजाला टेकलेला सूर्य पाहतेय. माझ्या ओठांवर समुद्राचा खारटपणा जाणवतोय का?


आय केअर नो मोअर! आँखो ने आज समंदर देखा हैं... की पलको पे यह बोझ सजा रखा हैं... कूछ टूट रहा हैं दिल के दर्या में... की आज सागर के छलकने का अंजाम देखा हैं!! मिशेल... क्षितिजापारच्या अमेरिकेतून आलीय गोव्यात! यू विल फाइंड पिस इन इंडिया... कोणीतरी सांगितलं म्हणे तिला! शांती... मनातली वादळं शमवणारी... भेटेल तुला इथे? इथल्या प्रत्येक मनामनात अगणित वादळं घुमताहेत. प्रत्येक माणूस एक बेट आहे इथे. वेदनांचं मोहोळ सांभाळणारा! आय वॉज ट्राइंग टू फर्गेट माय ग्रिफ... व्हेन आय लॉस्ट माय लव्ह... ही जस्ट वॉक्ड अवे...!! तिच्या हातातला माझा हात आणखी घट्ट दाबला गेला. किती वादळं यावीत या किनारी... सावलीही उरू नये काही... हात हातातले सुटून जावे अन् एकली उरावी मी आता किनारी!! का होतं असं आपल्याच सोबत? आपलीच सोबत उरते अशी शेवटी आपल्याचसाठी? माझ्या खांद्यावर मान ठेवून ती रडतेय. की मला मिळतेय तिची सोबत या माझ्या आसवांसोबत? मी माझ्या सुटून गेलेल्या सोबतीचा विचार करतेय. कोणीतरी म्हटलं होत नं... हम अकेलेही चले थे जानिब -ए-मंझिल, मगर लोग साथ आते गये और कारवाँ बनता गया!! कहाँ हैं वह कारवाँ? हम अकेलेही चले थे जानिब-ए-मंझिल, मगर राह गुजरती गयी, हम अकेले ही रह गये. सुने रास्ते मिलते गये, मंझिल हातसे छुटती गयी, जिंदगी का कारवाँ गुजरता रहा!!


सूर्य पार अस्ताला गेलाय. मिशेल अन मी तरीही बसलोच आहोत. आपापल्या वादळांना घेऊन! तिच्या गहिऱ्या निळ्या डोळ्यांत आता अभ्र दाटलेली नाहीयेत. नितळ झालीय नजर तिची. माझ्या मनात दडपून ठेवलेल्या भावनाही आता निचरून गेल्यात. आभाळ निरभ्र व्हावं आणि केवळ मावळता सायंप्रकाश आभाळभर विखरून जावा, तसं झालंय. आता माझी मीच आहे. आय एक्सेप्ट! तशी खरंच कुणाची साथ असते का पूर्ण जिंदगीभर? की आपले आपणच असतो आपल्यासोबत? आय ऍम विथ मी! आय ऍम नॉट अलोन!! मिशेलच्या निरागस चेहऱ्यावर हळवा सायंप्रकाश रेंगाळतोय. डोळे मिटून ती समुद्राचा खारा श्वास आपल्या श्वासात भरून घेते. इज धिस दॅट पिस? आय नो मॉम अँड डॅड आर वॉचिंग मी! नाऊ आय फिल हॅपी! खरंच बरं वाटतंय आता... मनातला तळ स्वच्छ झाल्यागत! काहीतरी गुरफटून टाकणारं, घुसमटून टाकणारं... खोलवर दाबून ठेवलेलं... मोकळं झालंय! मी मोकळी झालेय की मी मोकळं केलंय बाबांना, माझ्या बंधनातून? पण एक वेगळंच फिलिंग आहे आत खोलवर... शांत... मोकळं... नितळ!! आय एम फ्री नाऊ! मिशेलसारखाच खोल श्वास घेत मी ते फ्रीपणाचं फिलिंग मनात खोलवर झिरपू दिलं. नाऊ वी आर ॲट पीस!!

Comments
Add Comment