डॉ. मिलिंद घारपुरे
एक प्रसिद्ध स्वीट मार्ट. दुकानाबाहेर स्वतंत्र ‘चाट सेंटर’. जरा अत्याधुनिक. डावी उजवीकडे काऊंटर. मध्ये बिलिंग डेस्क. लोक रांगा लावून. काऊंटरवरचे आधुनिक असे ‘कार्पोरेट भय्ये’. स्वच्छ कपडे डोक्यावर शेफ टोपी हातात ग्लोव्हज. अफाट गर्दी, प्रत्येक काऊंटरसमोर आपला नंबर कधी याची अहमहमिका. खाणारे वेगळे, पार्सलवाले वेगळे. समोर समस्त ‘चाट संप्रदायातील’ पदार्थांची रेलचेल.
‘पुरी’… खरतर दोनच प्रकार. शेवपुरी, दहीपुरी… बाकी दही भल्ले, पापडी चाट, टोकरी चाट असे आपले उगाचच पोटभेद. गुरूने शिष्याला ज्ञानदान करावं तद्वत, पाणीपुरी देणारा ‘भैय्या’ आणि पाण्याने भरलेली अखंड पुरी मुखगुहेत भक्तीभावाने सारणारा तो ग्राहक… तेही रसाचा एकही थेंब सांडू न देता… अतीवssssss कौशल्य!!
पाणीपुरी नंतर तिखट पाणी आणि मग “खारा पुरी देना भैय्या” असं म्हणत ती वसूल करणारा शिष्य किंवा शिष्या. आता हेही एका अर्थाने बरोबरच म्हणा, कारण फलश्रुती म्हटल्याशिवाय अथर्वशीर्षाचे फळ नाही मिळत… तसच काहीसं.
आलू संप्रदायातला कुटुंब प्रमुख, बटाटेवडा नंतर समोसा… स्वतःला जराशी शहाणी समजणारी तोऱ्यात राजेशाही थाटातली तिखट गोड चटणी, कांदा, शेव, कोथिंबीर यांनी नटलेली ‘आलू टिकिया’. उगाचच भाव खाणारे मुगभजी, मध्ये मध्ये लूडबूड करणारे छोटे छोटे पनीर, सुकी कचोरी, पोहा समोसे वगैरे… जातीचा खवैय्या यांच्याकडे ढुंकूनही बघत नाही. चाट प्रकारात, ब्रेडला तसं काही स्थान नाही. तरीही बेमालूमपणे घुसलेले चीज टोस्ट सँडविच. डाळिंबाच्या दाण्यांना मदतीला घेऊन बस्तान बसवलेली ‘कच्ची दाबेली’. चाट संस्कृतीत नसलेली तरीही कायम स्वतःच्या मिजासीत स्टीलच्या कढईत पिवळ्या धम्मक तुपात गुदगुल्या होत असलेली सोनेरी दिमाखदार देखणी जिलबी.
एकूणच वातावरण, संमिश्र गंध… समस्त भक्तांच्या जाठरेश्वराला साद घालणारं… नुट्रिशन, कोलेस्टेरॉल, कॅलरी, इम्यूनिटी वगैरे जुनाट गोष्टींना तुच्छतेने फाट्यावरती मारणारी चाट संस्कृती… स्वित्झरलँडमध्ये माऊंट टिटलीसवर जेव्हा एका गोऱ्याला, वडापावबरोबर “प्लीज हॅव दॅट ग्रीनडीप मोर” असा पुदिन्याचा चटणीचा उल्लेख ऐकून कान तृप्त झाले. चीज, अॅवॅकॅडो डीप, बारबेक्यू सॉस यांच्या सणसणीत कानफटात मारणारं हे वाक्य दिलको सकून का काय म्हणतात ते देऊन गेलं होतं. एखाद्या साधकाने नामजपात तन मन धन विसरून ईश्वर चरणी विलीन व्हावं, तीच अगदी तीच तल्लीनता, एकाग्रता, शुचिता आणि समर्पण समस्त भक्तांमध्ये. या साधनेला स्थळ, काळ, वेळाच बंधन नाही. मग कोपऱ्यावरचा भैय्या असो नाहीतर एअरपोर्ट!
ईश्वरा तुझी लीला अगाध!!! तुझ्यापर्यंत पोहोचण्याचे चारच मार्ग आम्हाला माहीत होते. ज्ञानयोग, राजयोग, भक्तियोग, कर्मयोग…पण… पण त्या सर्वांच्या पलीकडे जाऊन आचरणायला सोपा, अध्यात्मिक गती मिळवून देणारा, देश, धर्म, जात, वंश, भाषा, पेहराव, शिक्षण, वय या सगळ्यांना एकाच पातळीवर आणणारा, पाचही इंद्रियांना तृप्ततेकडे नेणारा… ‘चाट योग’ एकमेवाद्वितीय!!!
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…