संतोष वायंगणकर
मुंबई-गोवा महामार्ग क्र. ६६ चे बांधकाम अद्यापही अपूर्णावस्थेतच आहे. सिंधुदुर्गातील बहुतांशी काम पूर्ण झाली असली तरीही अनेक कामे अपूर्ण आहेत. या महामार्गाचा दर्जा कसा आहे त्यावर एक वेगळे चर्चासत्र आयोजित करावे लागेल. मात्र, तरीही कोकणवासीयांनी ‘पदरी पडलं आणि पवित्र झालं’ या म्हणीप्रमाणे आहे ते स्वीकारून पुढे जाण्याचा निर्णय घेतला; परंतु कोणतीही आगाऊ सूचना न देता तीन दिवसांपूर्वी टोलवसुलीचा ट्रेलर दाखविला गेला. सिंधुदुर्गातील वाहनधारकांना हा धक्काच होता. कोणतीही नियमावली जाहीर न करता थेट टोल माथी मारण्याचा हा सारा प्रकार आहे. वास्तविक टोल सुरू करण्यापूर्वी कोकणातील जनतेला त्यासंबंधीची माहिती देणे आवश्यक होते; परंतु अचानकपणे ओसरगांव टोलनाक्यावर टोलवसुली करणारे कंपनीचे कर्मचारी हजर झाले आणि १ जूनपासून टोलवसुली करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कोकणात कोणीही उठावं आणि काहीही करावं, कसंही वागावं असे चालू देता कामा नये.
कोकणातील ओसरगांव आणि हातिवले येथे टोलनाके उभारण्यात आले आहेत. लांजाच्या पुढचा महामार्ग अद्यापही तयार करण्यात आलेला नाही. काम झालेलं नाही. मात्र, तरीही टोलवसुलीला सुरुवात होत आहे. टोलवसुलीच्या बाबतीत कोकणातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही कोणतीही माहिती नाही. असे त्यांच्यातील चर्चेतून समजून येते. मात्र यातही काही तथ्य नाही असेच म्हणावे लागेल. टोलवसूल करणारी कंपनी जरी परप्रांतातील असली तरीही त्यामागे कोण-कोण आहेत ते मुखवटेही समोर आले पाहिजेत. कोकणात काहीही घडलं तरी नेहमी राणेंकडे बोट दाखवलं जातं. अशा अनेक घटना आणि प्रकरण आहेत. ज्याचा राणेंशी दुरान्वयेही संबंध नाही; परंतु वातावरण निर्मिती करून गोबेल्स प्रचारनितीचा वापर करण्यात येतो. हे आजवर असंख्य वेळा घडले आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून परिस्थितीचा राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न केला जात असतो. या पलीकडे काहीही नसत. आजवर कोकणातील जनतेने ही गोबेलनिती अनेकवेळा पाहिली आहे.
कोकणातील महामार्गाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. पनवेल ते चिपळूण या मार्गात तर महामार्ग गेली अनेक वर्षे रेंगाळले आहे. टाइम लिमिटमध्ये या महामार्गाचे काम होणे अपेक्षित आहे; परंतु का कुणास ठाऊक ज्या धिम्या गतीने महामार्गाचे काम सुरू आहे. यावरून हा महामार्ग केव्हा पूर्णत्वास जाईल देव जाणो. कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोलवसूल करण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा साहजिक जनतेचा रोषही असणार आहे. टोल किती आकारला जाणार आहे. तो कसा असणार आहे. यासंबंधी कोणतीही माहिती पुढे येत नाही. कोल्हापुरात जेव्हा टोलवसुली कंपनीने टोलवसुली करण्यास सुरुवात केली तेव्हा कोल्हापुरातील जनतेने तीव्र आंदोलन उभे केले. कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक टोल देणार नाहीत, ही ठाम भूमिका घेतली तेव्हा टोलवसुली करणाऱ्या कंपनीला कोल्हापुरातून गाशा गुंडाळावा लागला. आंदोलन हे अशाच पद्धतीचे असायला पाहिजे. सिंधुदुर्गातील जनतेला टोलमाफी मिळायलाच हवी, अशी आग्रही भूमिका घेतली पाहिजे.
टोलवसुली करणाऱ्या कंपनीत कोकणातील कोणी वाटेकरी असेल, तर ते स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे. आज काल कंपनी परप्रांतातील; परंतु त्यातले भागीदार इथलेच असे असू शकते. सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीवर जर कोणी विनायकाच्या साक्षीने किरण पसरवून वैभव आणू पाहत असेल, तर या टोलनाक्यावरही बारकाईने नजर असायलाच हवी. कारण या टोलनाक्याचा उपयोग करून प्रचंड कमाईचे एक साधन म्हणूनच त्याकडे पाहिले जात आहे. म्हणूनच कोकणातील या टोलनाक्यांची निश्चिती झाल्यापासून नजर खिळलेली होती. मात्र कोणत्याही स्थितीत सिंधुदुर्गातील जनतेला टोलमाफी मिळायलाच हवी.
पर्यटनात कोकण बदनाम नको…
कोकणात पर्यटन व्यवसाय आता कुठे बहरू लागलाय. व्यवसाय स्थिरावतोय, मात्र कोकणातील पर्यटन स्थळ आणि पर्यटन व्यवसाय बदनाम होऊ नये, याची काळजी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे. जे दोष निर्माण झालेले असतील ते आपणच दूर केले पाहिजेत. कोकणात येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित वाटलं पाहिजे. तो विश्वास असायला हवा, ही विश्वासाची भावना सर्वच बाबतीत असायला हवी. कोकणात येणाऱ्या पर्यटकाला प्रवासात, पर्यटनस्थळावर, पर्यटनाचा आनंद घेताना अशा सर्वच बाबतीत पर्यटकांना अधिकाधिक आनंद कसा घेता येईल हे पाहिले पाहिजे. आग, पाणी, वारा यांच्याशी कोणाची कितीही जवळीक नेहमीची सवय असली तरीही त्याला गृहीत धरणे गैर ठरते. यामुळे घडलेली घटना, त्याचे परिणाम याला आपणाला सामोरे जावेच लागणार आहे.