Saturday, December 14, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणमोदी सरकारने शेकडो शोषित, वंचितांना संरक्षण दिले : आमदार नितेश राणे

मोदी सरकारने शेकडो शोषित, वंचितांना संरक्षण दिले : आमदार नितेश राणे

संतोष राऊळ

कणकवली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अकरा कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना १८२ लाख कोटी रुपयाचे वाटप मोदी सरकारने केले आहे. कोरोना काळात ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य, स्वतःच्या कोरोना लस निर्माण केल्या. ९ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन, ३ कोटींहून अधिक लोकांना मालकीचे घर देणे, सुमारे तीस लाख फेरीवाल्यांना कर्जपुरवठा करून पुन्हा व्यवसाय उभारण्यात आले आहेत. ४१ कोटींहून अधिक जनधन खाती या सारख्या शेकडो योजनांतून मोदी सरकारने गरीब कल्याण कार्यक्रम प्रभावीपणे अमलात आणल्याने शोषित, वंचित वर्गाला संरक्षण मिळाले आहे. असे भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या आठव्या वर्षपूर्ती निमित्त भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची ८ वर्षे या अभियानाचे औचित्य साधत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे बोलत होते.

ते म्हणाले की, सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास आणि सब का प्रयास हा मंत्र घेऊन मोदी सरकारने गेल्या आठ वर्षात अंत्योदय आणि एकात्म मानववादाला केंद्रस्थानी ठेवत गोरगरिबांच्या कल्याणाच्या अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या. त्याचबरोबर देशांतर्गत सुरक्षा मजबूत करणे, दहशतवादी शक्तींना त्याच भाषेत उत्तर देण्याचे कणखर धोरण यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताची प्रतिमा बलशाली राष्ट्र अशी तयार झाली आहे. वैश्विक पातळीवर भारताकडे आदराने पाहिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वामुळेच हे शक्य झाले आहे. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या आठ वर्षात अनेक क्षेत्रात भारताची वेगाने चंगली प्रगती होत आहे. जम्मू – काश्मीरसाठीचे ३७० वे कलम रद्द करणे, राममंदिराच्या उभारणीतील अडथळे दूर करणे, तिहेरी तलाक पद्धत रद्द करणे, या सारख्या निर्णयांमुळे अनेक वर्षांपासूनचे प्रश्न मोदी सरकारने निकालात काढले. कायम अशांत असणाऱ्या ईशान्य भारताला हिंसाचार मुक्त केले. अंतर्गत सुरक्षा बळकट केल्यामुळे गेल्या आठ वर्षात काही अपवाद वगळता दहशतवाद्यांचा एकही मोठा हल्ला झाला नाही. सीमेवर झालेल्या आगळीकीला त्याच भाषेत उत्तर दिले गेल्यामुळे भारताकडे कणखर राष्ट्र म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. कोरोनाच्या संकट काळात मोदी सरकारचे सुशासन आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजले गेले. योग्यवेळी टाळेबंदीचा निर्णय घेत अवघ्या नऊ महिन्यात दोन स्वदेशी कोरोना लस विकसीत करत मोदी सरकारने कोरोना प्रसाराला वेळीच अटकाव केला. भारतासारख्या खंडप्राय देशात लसीकरणाचे आव्हान यशस्वीपणे पेलत मोदी सरकारने प्रगत देशांनाही मागे टाकले. कोरोना काळातच पंतप्रधान गरीब कल्याण योजना राबवत गोरगरीब उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली. या योजनेची जागतिक बँकेनेही प्रशंसा केली आहे. आत्मनिर्भर भारतासारखी संकल्पना प्रत्यक्षात आणल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ओळख झाली आहे, असेही आमदार नितेश राणे म्हणाले.

आजची जगातील महागाई पाहता श्रीलंका, पाकिस्तान असे देश फारच अडचणीत आले आहेत. त्या मानाने भरतात महागाई खूपच आटोक्यात आहे. कोरोनानंतर देश स्थिरावतो आहे, सावरतो आहे. त्यामुळे जनतेने संयम पाळावा. अमेरिका, चीनला मागे टाकून भारत देश मोदींच्या नेतृत्वाखाली महासत्ता बनेल, असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -