Thursday, October 30, 2025
Happy Diwali

अडचणी सोडविण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत...

अडचणी सोडविण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत...

ठाणे (प्रतिनिधी) : पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेंतर्गत कोरोनामुळे पालक गमावलेल्या देशभरातील अनाथ बालकांना सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइन उपस्थितीत महत्त्वाच्या कागदपत्रांचे वाटप करण्यात आले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सुमारे ३० अनाथ बालके यावेळी उपस्थित होती.

त्यांना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते आरोग्य विमा कार्ड, टपाल खात्यात ठेवलेल्या रकमेचे पासबुक आणि पंतप्रधानांचे पत्र अशा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार कुमार आयलानी, ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, स्माईल फाऊंडेशनच्या उमा आहुजा आदी उपस्थित होते.

कोरोनामुळे ठाणे जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या मुला-मुलींची संख्या सुमारे ४३ आहे. त्यातील ३० जण सोमवारी उपस्थित होते. त्यांना आरोग्य विमा कार्ड, टपाल खात्यात ठेवलेल्या रकमेचे पासबुक आणि पंतप्रधानांचे पत्र अशा साहित्याचे वाटप करण्यात आले. उर्वरित बालकांच्या सांभाळकर्त्यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले.

जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी यावेळी बालकांना आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा धीर देत चांगला अभ्यास करा आणि उत्तम करिअर करा, असा सल्ला दिला. कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा बंद होत्या. मात्र शिक्षण ऑनलाइन सुरू होते. आता जूनपासून नवीन शैक्षणीक वर्ष सुरू होईल आणि शाळाही प्रत्यक्षात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे चांगले नागरिक बनण्यासाठी शिक्षणाची कास धरा. समाज आपल्यासोबत आहे. तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही आहोत, असा दिलासाही नार्वेकर यांनी दिला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा