Thursday, September 18, 2025

सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा

सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा

अकर्तेपणे करीत राहावे कर्म। हाच परमात्मा आपला करून घेण्याचा मार्ग॥ न करावा कोणाचा द्वेष मत्सर। सर्वांत पाहावा आपला रघुवीर॥ परनिंदा टाळावी। स्वतःकडे दृष्टी वळवावी॥ गुणांचे करावे संवर्धन। दोषांचे करावे उच्चाटन॥ जेथे जेथे जावे। चटका लावून यावे॥ याला उपाय एकच जाण। रघुनाथावांचून न आवड दुजी जाण॥ देहाचे दुःख अत्यंत भारी। रामकृपेने त्याची जाणीव दूर करी॥ मनावर कशाचाही न होऊ द्यावा परिणाम। हे पूर्ण जाणून, की माझा त्राता राम॥ अभिमान नसावा तिळभरी। निर्भय असावे अंतरी॥ जे दुःख देणे आले रामाचे मनी। ते तू सुख मानी॥ देह टाकावा प्रारब्धावर। आपण मात्र साधनाहून नाही होऊ दूर॥ मी असावे रामाचे। याहून जगी दुसरे न दिसावे साचे॥ प्रपंचातील सुखदुःख ठेवावे देहाचे माथा। आपण न सोडावा रघुनाथा॥ आपण नाही म्हणू कळले जाण। ज्ञानाचे दाखवावे अज्ञान॥ दोष न पाहावे जगाचे। आपले आपण सुधारून घ्यावे साचे॥ कोणास न लावावा धक्का। हाच नेम तुम्ही राखा॥ एक रामसेवा अंतरी। सर्वांभूती भगवद्भाव धरी॥ राम ज्याचा धनी। त्याने न व्हावे दैन्यवाणी॥ नका मागू कुणा काही। भाव मात्र ठेवा रामापायी॥ वाईटांतून साधावे आपले हित। हे ठेवावे मनी निश्चित॥ भगवंताचे विस्मरण । हे वस्तूच्या मोहाला कारण॥ म्हणून भक्ती व नाम। याशिवाय ऐकू नये कोणाचे ज्ञान॥ परिस्थितीचा निर्माता परमात्मा जाणे। त्यातच त्यास पाहावे आपण॥ सर्व कर्ता राम हा भाव ठेवता चित्ती। खऱ्या विचारांची जोडेल संगती ॥ व्यवहारातील लाभ आणि हानि। मनापासून आपण न मानी॥ मी आहे रामाचा ही जाणीव ठेवून मनी। सुखाने वर्तत जावे जनी॥ एकच क्षण ऐसा यावा । जेणे सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा॥ रामाविण उठे जी जी वृत्ती । त्यासी आपण न व्हावे सांगाती॥ मी रामाचा हे जाणून । वृत्ती ठेवावी समाधान॥ धन्य मी झालो। रामाचा होऊन राहिलो। ही बनवावी वृत्ती। जेणे संतोषेल रघुपती । वृत्ती बनविण्याचे साधन। राखावे परमात्म्याचे अनुसंधान॥ शरीरसंपत्ती क्षीण झाली। तरी वृत्ती तशी नाही बनली॥ विषयाधीन जरी होय वृत्ती। तरी दुरावेल तो रघुपती ॥ संतांची जेथे वस्ती। तेथे आपली ठेवावी वृत्ती॥

- ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

Comments
Add Comment