अहमदाबादमधील मोदी स्टेडियमवर झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला आणि आयपीएलचा राजा होण्याचा मान मिळवला. गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा सात विकेट राखून पराभव केला आणि विजेतेपद खेचून घेतले. आयपीएलचा चषक यंदा कोण जिंकणार याची सर्व देशभर उत्सुकता होती. अंतिम सामना पाहण्यासाठी देशातील कोट्यवधी लोकांच्या नजरा टीव्हीच्या पडद्यावर खिळल्या होत्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या सामन्याला हजर राहून आनंद लुटला. एक लाखापेक्षा अधिक लोक सामना बघण्यासाठी जमले होते. गुजरात टायटन्सच्या सात नंबरची जर्सी घातलेल्या शुभमन गिलने षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिल्यावर स्टेडियमवर एकच जल्लोश बघायला मिळाला.
आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर विजेत्या व उपविजेत्या संघावर तसेच हंगामात विशेष कामगिरी बजावलेल्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव झाला. विजेत्या गुजरात टायटन्स संघाला विजेतेपदाचा चषक मिळालाच. पण त्याबरोबरच वीस कोटी रुपये रक्कम बक्षीस म्हणून मिळाली. उपविजेत्या राजस्थान रॉयल्स संघाला साडेबारा कोटी रुपये बक्षिसांची रक्कम मिळाली. तिसऱ्या स्थानावरील बंगळूरुला सात कोटी, तर चौथ्या स्थानावरील लखनऊ संघाला साडेसहा कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले. राजस्थानच्या युजवेंद्र चहलला चषक व दहा लाख रुपये मिळाले, त्याने सर्वात जास्त म्हणजे २७ गडी बाद केले. राजस्थानचा आघाडीचा फलंदाज जोस बटलरला सर्वाधिक बक्षिसे मिळाली. सर्वाधिक धावा काढल्याबद्दल त्याला दहा लाख रुपये बक्षीस मिळाले. त्याने १७ सामन्यांत ८६३ धावा काढल्या. मॅन ऑफ द मॅच म्हणून पांड्याला ५ लाखांचे बक्षीस मिळाले.
याखेरीज इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर, सुपर स्ट्रायकर ऑफ द इयर, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द इयर, गेम चेंजर ऑफ द इयर, पाॅवर प्ले ऑफ द इयर अशी बक्षिसांची खैरात झाली. जेव्हा फेब्रुवारीत आयपीएलसाठी लिलाव झाले, तेव्हा गुजरात टायटन्स संघाविषयी फारसे कोणी चांगले बोलत नव्हते. आयपीएलमधील सर्वात कमजोर संघ अशी टिंगल गुजरात संघाची होत होती. गुजरात टायटन्सकडे कोणी मोठे खेळाडू नाहीत, फार मोठे कोणी स्टार्स नाहीत, संघाची बॅटिंग कमजोर आहे, अशी सुरुवातीला चर्चा ऐकायला मिळायची. पण जिद्द व टीमवर्कच्या जोरावर या संघाने आपल्याकडे खेचून आणला.
गुजरात टायन्सने अंतिम सामना जिंकून आयपीएल किंगचा बहुमान मिळवला तेव्हा अकरा वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाने कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला त्याची आठवण होणे स्वाभाविक आहे. तेव्हा भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव करून विश्वचषक जिंकला होता. यंदा आयपीएल अंतिम सामन्यात सात नंबरची जर्सी घातलेल्या शुभमनने षटकार ठोकून गुजरातला विजय मिळवून दिला. सन २०११ साली सात नंबरची जर्सी घातलेल्या कर्णधार धोनीने षटकार मारूनच विश्वचषक मिळवून दिला होता. २०११ मध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव केला होता. तेव्हा श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकारा होता व श्रीलंकेकडे लसिथ मलिंगा हा वेगवान गोलंदाज होता. आज हे दोघेही राजस्थान रॉयल्सबरोबर आहेत. संगकारा हा संघाचा संचालक आहे, तर मलिंगा हा प्रशिक्षक आहे. आणखी एक गंमत म्हणजे, सन २०११ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक दक्षिण ऑफ्रिकेचे गॅरी कर्स्टन होते व भारतीय संघात आशीष नेहरा हा वेगवान गोलंदाज होता.
यंदा हे दोघेही गुजरात टायटन्स संघाबरोबर आहेत. नेहरा हा मुख्य प्रशिक्षक होता, तर कर्स्टन हा संघाचा मेंटाॅर होता. आयपीएलचे पंधरावे पर्व संपले. रोहित शर्मानंतर सर्वात कमी सामन्यांमध्ये आयपीएल जिंकणारा पांड्या हा दुसरा कर्णधार ठरला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, गुजरातच्या भेदक गोलंदाजीमुळे राजस्थान संघाला फार मोठे आव्हान ठेवता आले नाही. हंगाम सुरू होण्यापूर्वी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर क्रिकेट समीक्षक व अभ्यासू संशय व्यक्त करीत होते. पण परिस्थिती बघून मैदानावर घेतलेल्या निर्णयाने संघाला मोठे यश मिळवून दिले. हार्दिकने फलंदाजीसह गोलंदाजीचेही दमदार प्रदर्शन केले. संघाच्या यशात प्रशिक्षक म्हणून आशीष नेहरा याचा मोठा वाटा आहे. नेहरा पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाचा प्रशिक्षक होता.त्याने अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर हार्दिकबरोबर चांगली रणनिती आखली. गुजरातच्या फलंदाजांनी अखेरच्या षटकांत जी टोलेबाजी केली, त्याचा लाभ संघाला झाला. डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, हार्दिक पांड्या यांनी डेथ ओव्हर्समध्ये जोरदार फलंदाजी केली. संपूर्ण आयपीएल हंगामातच गुजरातच्या संघाने दमदार गोलंदाजी केली. हार्दिक पांड्याने स्वत: चौथ्या क्रमांकावर येऊन केलेली अप्रतिम फलंदाजी हे त्याचे वेगळेपण म्हणावे लागेल.