नारायण राणे
केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री
भारताच्या राजकीय इतिहासाचा पट नव्याने लिहिणाऱ्या आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीला ३० मे २०२२ रोजी आठ वर्षे पूर्ण होत आहेत. देशाच्या इतिहासात श्री. नरेंद्रजी मोदी यांची कारकीर्द ‘‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’’ पर्व या नावानेच ओळखली जाईल. मोदीजींच्या यशस्वी कारकिर्दीला आठ वर्षे झाल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! मोदी सरकारच्या नजरेसमोर कायम देशातील शेतकरी, गोरगरीब, महिला, अनुसूचित जाती व जमातीची जनता यांच्या कल्याणाचा विचार असतो. सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मोदी सरकारने २०१४ पासून आजपर्यंत अनेक नावीन्यपूर्ण योजना आणि कार्यक्रम राबविले. कारकिर्दीच्या सुरुवातीला २ ऑक्टोबर २०१४ रोजी म. गांधींच्या स्मृती दिनाच्या औचित्यावर आदरणीय नरेंद्र मोदीजींनी स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली. ही एक सरकारी योजना न राहता लोकांचा सक्रिय सहभाग मिळावा यासाठी मोदीजींनी खास प्रयत्न केले. परिणामी सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेचे २०१४ साली ३८ टक्के असलेले प्रमाण २०२२ साली ९९ टक्क्यांवर पोहोचले. जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा या महत्त्वाकांक्षी अभियानाचे कौतुक केले. स्वच्छतेचा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी मोदीजींनी स्वच्छ गंगा अभियान व त्याबरोबरच देशातील इतर प्रमुख नद्यांच्या स्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमाला सुद्धा यश मिळत असल्याचे दिसून येते.
शेती व शेतकरी हा आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या हृदयामध्ये खास जागा असलेला विषय. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी मोदीजींनी अर्थसंकल्पामध्ये खास तरतुदी केल्या. पीएम किसान सन्मान योजना त्यांनी २०१९ च्या अर्थसंकल्पात मांडली. या योजने अंतर्गत आज अखेर ११.७८ कोटी शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. तसेच या योजनेमार्फत आजवर एक लाख ८२ हजार कोटी रुपयांचा निधी वितरीत झाला आहे. त्याशिवाय निसर्गाच्या लहरीपणापासून बचावासाठी प्रधानमंत्री कृषी विमा योजना, सॉईल हेल्थ कार्ड असे अनेक नवीन कार्यक्रम व योजना राबविल्या जात आहेत. सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी मोदी सरकारने अनेक कल्पक व नावीन्यपूर्ण योजना राबविल्या. प्रधानमंत्री जनधन योजनेखाली प्रत्येक भारतीयाचे बँकेत खाते असावे असा उद्देश ठेवण्यात आला आहे. आजवर ४५.४७ कोटी भारतीयांनी बँकांमध्ये खाती उघडली असून वैयक्तिक लाभाच्या योजनांचा निधी आता थेट नागरिकांच्या खात्यावर जातो. यातून गोरगरिबांची आर्थिक प्रगती वाढीस लागली असून दलालांचा भ्रष्टाचार नष्ट झाला आहे. २०१६ साली सुरू झालेल्या उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून आजवर ९ कोटी १७ लाख ५४ हजार ३७१ महिलांना मोफत धूरमुक्त चुलींचे वाटप झाले व त्यांच्या चेहेऱ्यावर अश्रूंच्या जागी आनंद आला. स्वातंत्र्य मिळाल्यापासून ७० वर्षे अंधारात असलेल्या १८,००० खेड्यापाड्यांमध्ये वीज उपलब्ध करण्यात आली. देशातील एकही माणूस बेघर राहू नये यासाठी आदरणीय मोदीजी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेमध्ये मोदीजींनी ‘‘प्रत्येकाला घर’’ ही संकल्पना मांडली व ती पूर्ण करण्यासाठी देशामध्ये कार्यक्रम राबविला. याचे परिणाम दिसून येत आहेत. २०१४ ते १९ या काळात प्रत्येकाला घर कार्यक्रमामध्ये १.२५ कोटी घरे बांधून पूर्ण झाली होती. भ्रष्टाचार पूर्णपणे निपटून काढण्यावर मोदीजींचा खास कटाक्ष असतो. पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी ‘न खाऊंगा, न खाने दूंगा’ हे अगदी स्पष्ट शब्दांमध्ये बजावून सांगितले व त्याची कठोर अंमलबजावणीसुद्धा सुरू केली. मोदीजींच्या कठोर शिस्तीच्या धाकामुळे सरकारी कार्यालयांमधील भ्रष्टाचारावर चाप लागला. यामुळेच भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप आजवर होऊ शकले नाहीत. देशातील सरावलेल्या व्यावसायिकांना कठोर चाप तर बसलाच, पण, सर्वसामान्य जनतासुद्धा भ्रष्टाचाराच्या विरोधात मोकळेपणे पुढे येऊन सक्रिय झाली.
विकास हा मोदीजींच्या सरकारचा श्वास. विकासकामातील दप्तर दिरंगाई, भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी मोदीजींनी देशभर निविदा प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा नियम कठोरपणे अमलात आणला व पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त विकासकामांना वेग आला. हा वेग एवढा प्रचंड आहे की, आधीच्या सरकारच्या काळात ज्या वेगाने महामार्ग बांधले जात होते त्यापेक्षा चार पट जास्त लांबीचे महामार्ग तेवढ्याच दिवसांमध्ये मोदीजींचे सरकार बांधते आहे. या सरकारच्या कारकिर्दीत महामार्ग, रेत्वेमार्ग, जलमार्गांचे प्रचंड मोठे जाळे देशभर निर्माण झाले. ‘उडान’सारख्या कल्पक योजनेच्या माध्यमातून विमानसेवेचा मोठा विस्तार झाला. या साऱ्याचा सकारात्मक परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊन अर्थव्यवस्थेत मोठे चैतन्य आले.भारत वेगाने आर्थिक प्रगती करून जगातील महासत्ता बनण्याचे स्वप्न साकार करीत असतानाच २०२०साली जागतिक महामारी कोरोनाने भारताला गाठले. अर्थव्यवस्था जीविताच्या भीतीने ठप्प झाली. देशातील जनतेचे जीवित सुरक्षित राहावे यासाठी मोदी सरकारने कंबर कसली. निर्बंधांमुळे उपजीविका गमाविलेल्या गरीब व बेरोजगारांच्या रक्षणासाठी मोदीजींनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना राबविली. गरिबातील गरिबांना दोन वेळेचे अन्न व तेही मोफत मिळावे यासाठी मोदी सरकारने ८० कोटी भारतीयांना १ लाख ७० हजार कोटी रुपयांचे अन्नधान्य मोफत दिले. करोडो लोकांची उपासमारीतून सुटका केली.
अमेरिका, इंग्लंड व इतर पाश्चिमात्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनता मृत्युमुखी पडत असताना, तुटपुंज्या वैद्यकीय व्यवस्थेचा पुरेपूर वापर करून मोदी सरकारने कोरोनाच्या भारतातील नरसंहाराला आळा घातला. भारताने कोरोनाबरोबर दिलेल्या लढ्याचे जागतिक पातळीवरून कौतुक झाले. अनेक देशांतील शिष्टमंडळे भारताने कोरोनाविरुद्ध केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी भारतामध्ये येऊन गेली. कोरोनाविरुद्ध लढ्याला बळ व गती मिळावी यासाठी मोदी सरकारने देशातील सर्व पात्र नागरिकांना मोफत लसीकरणाचा निर्णय घेऊन मोठे पाऊल उचलले. परिणामी, देशातील कोरोना आज पूर्णपणे आटोक्यात आला आहे. कोरोनाविरुद्ध जागतिक लढ्याचे नेतृत्व पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय औषध उद्योगाने समर्थपणे स्वीकारले. कोरोनाच्या लसीच्या उत्पादनामध्ये भारताने नेतृत्व केले. साऱ्या जगासाठी भारत हा कोरोनाविरोधी लसीचा उत्पादक व पुरवठादार झाला. भारतामध्ये निर्माण झालेल्या कोरोनाविरोधी लसींचा कित्येक आर्थिकदृष्ट्या कमकुवत व गरजवंत देशांना मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारने महत्त्वाच्या वेळी पुरवठा केला. जागतिक आरोग्य संघटनेने भारताच्या या कामगिरीचे मुक्तकंठाने कौतुक केले. जनतेच्या आरोग्यासाठी मोदी सरकारने अनेक नवनवीन उपक्रम राबविले. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ५० कोटी भारतीयांना हेल्थकेअर प्रोग्रामचा लाभ पुरविण्यात आला. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री वय वंदना योजना अशा अनेक नावीन्यपूर्ण योजना व कार्यक्रमांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आर्थिक संरक्षण उपलब्ध करण्यात आले.
आर्थिक क्षेत्रातील मोदी सरकारची कामगिरीसुद्धा नजरेत भरण्यासारखी आहे. बँकांमध्ये अब्जावधी रुपयांचे घोटाळे करून देशाबाहेर पळणाऱ्या गुन्हेगारांना जरब बसविण्यासाठी नवीन इन्सॉल्व्हन्सी अॅण्ड बँकरप्सी कोड अमलात आणले. बँक घोटाळ्यामुळे बँक बुडाल्यास सामान्य नागरिकांनी मुदत ठेवीमध्ये ठेवलेल्या बचतीचे रक्षण करण्यासाठी मोदी सरकारने ५ लाख रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवींना विम्याचे संरक्षण दिले. या व अशा इतर अनेक उपाययोजनांचे सुपरिणाम आता दिसू लागले आहेत. या वर्षी सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजे सरकारची मालकी असलेल्या जवळपास सगळ्या बँका फायद्यामध्ये आल्या आहेत. उद्योग व व्यावसायिकता विकास हा मोदीजींचा आवडता विषय. उद्योग विकासासाठी मोदीजींनी अनेक योजना व कार्यक्रम राबविले. मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया, ईझ ऑफ डुईंग बिझनेस, जीएसटी (वस्तू व सेवा कर) प्रणालीच्या माध्यमातून वन नेशन, वन टॅक्स, प्रधानमंत्री मुद्रा योजना यांसारख्या अनेक नावीन्यपूर्ण योजना व कार्यक्रमातून मोदीजींनी देशातील उद्योजकतेला आणि तरुणांमधील उद्योग उभारणीच्या प्रेरणेला नवीन ऊर्जा दिली. याचे दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत. मोबाइल फोन निर्मितीचे दोन कारखाने २०१४ साली होते. आता ते १२५च्या आसपास आहेत. ईझ ऑफ डुईंग बिझिनेसमध्ये भारताने १४२ वरून ७७ व्या स्थानावर झेप घेतली आहे.
आदरणीय मोदीजी देशाच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी आल्यानंतर महत्त्वाचा कोणता बदल झाला असेल, तर तो जनतेच्या मानसिकतेचा. सरकारने सर्व काही करावे व लोकांनी फायदा घेत राहावे ही जनतेची मानसिकता बदलली. सरकारने सुविधा पुरवाव्यात व जनतेने त्या आधारे प्रगती करून देशाचा विकास साधावा, अशी नवी मानसिकता पुढे आली. यामुळेच प्रत्येक कुटुंबाला वर्षाला ७२ हजार रुपये देण्याची योजना नाकारून भारतातील जनतेने मोदीजींना पुन्हा प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करण्याचा कौल दिला. मोदीजी व त्यांचे सरकार पर्यावरणाबाबत अतिशय सजग असते. विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर व परिषदांमध्ये भारताची पर्यावरणाशी असलेली बांधिलकी त्यांनी अनेक वेळा अधोरेखित केली. मोदीजींच्या पर्यावरणविषयक सहभागासाठी संयुक्त राष्ट्र संघाने त्यांना ‘चँपियन ऑप द अर्थ’ या पुरस्काराने सन्मानित केले. देशापुढील प्रश्न कठोरपणे व नेटाने सोडविण्याचे मोदी सरकारचे कौशल्य या पूर्वी कोणाला साध्य झाले नाही. यामुळेच घटनेच्या ३७० कलमाचा व स्वातंत्र्यापासून प्रलंबित अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला. अत्यंत विचारपूर्वक व काटेकोर नियोजन करून मोदीजींचा विश्वास सार्थ ठरवत भारताच्या सैन्यदलांनी पाकिस्तानच्या भूमीवर जाऊन सर्जिकल स्ट्राइक केले व पाकिस्तानी लष्कर व सरकारला जोरदार झटका देऊन कायमची जरब बसविली. मोदीजींच्या या कर्तृत्वामुळेच २०२४च्या निवडणुकाच नव्हे तर त्यानंतरसुद्धा मोदी सरकारला भारतातील जनता कोणताही पर्याय निवडणार नाही हे निर्विवाद सत्य!
आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदीजींनी मुत्सद्दीपणा, दूरदृष्टी व अजोड बुद्धिमत्तेच्या जोरावर भारताची एक प्रगल्भ व बलशाली देश अशी प्रतिमा निर्माण केली व देशाला मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. गरिबांची कणव असलेल्या या अष्टपैलू नेतृत्वाचा गौरव व कौतुक करावे तेवढे थोडेच. देशातील १३५ कोटी भारतीयांना आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी आपले पंतप्रधान आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आज जगभरात दबदबा व आदर निर्माण झाला आहे. आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्यासाठी बळ द्यावे, यासाठी प्रार्थना मी परमेश्वर चरणी करतो.