Categories: कोलाज

स्वातंत्र्यवीर सावरकर : “मारितां मारितां मरेतो झुंजेन”

Share

मृणालिनी कुलकर्णी

२८ मे, महान देशभक्त, जहाल सक्रांतिकारक, ओजस्वी इतिहासकार, थोर साहित्यिक, तत्त्वनिष्ठ राजकारणी, धुरंधर सेनापती, खंदा समाजसुधारक अशा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची जयंती. सावरकरांचे चारित्र्य, राष्ट्राच्या उभारणीसाठी नव्या पिढीला सांगितले जावे, यासाठी ह. त्र्यं. देसाई यांच्या ‘शतपैलू सावरकर’ या पुस्तकाच्या आधारे हा छोटासा प्रयत्न.

‘कर्तव्यकर्म कर, तीच ईश्वरपूजा’ हा गीतोपदेश वीर सावरकरांनी तंतोतंत पाळला. त्यांच्या कर्त्यव्यनिष्ठेला, हिंदुत्वनिष्ठेचा आणि विज्ञाननिष्ठेचा भरभक्कम आधार होता. सावरकर १२/१३ वर्षांचे असताना व्यायाम म्हणून नमस्कार घालू लागले आणि १६/१७ व्या वर्षी व्यायाम हे त्यांचे राष्ट्रीय कर्तव्य ठरले.

वयाच्या १२व्या वर्षी पुण्या-मुंबईच्या दंग्यात सवंगड्यांना एकत्र जमवून मशिदीवर चढाई केली. १४व्या वर्षी वक्तृत्व स्पर्धेत त्यांच्या लेखनासंबंधी आक्षेप होताच तो चुकीचा आहे, हे स्पष्ट केले.

१५व्या वर्षी चाफेकरांच्या हौतात्म्याने सावरकर अस्वस्थ झाले. चाफेकरांनी चेतवलेली ही शत्रूंजयवृत्ती पुढे नेण्याचे दायित्व माझ्यावर नाही का? देशाचा झेंडा घेऊन येणाऱ्याला पुढे जाता यावे म्हणून मार्गातले काटेकुटे साफ करायला, पूल बांधायला, नवी पिढी उत्पन्न व्हावी या कारणाने, कर्तव्यभावनेने सावरकरांनी विचार पक्का करून, स्वदेशाच्या स्वातंत्र्यार्थ सशस्त्र क्रांतीचा झेंडा उभारून “मारितां मारितां मरेतों झुंजेन” ही देवीपुढे शपथ घेऊन ‘अभिनव भारत’ या क्रांती संघटनेचे जाळे (मेळे/पोवाडे/व्याख्याने अशा साधनांनी) महाराष्ट्रभर विणले. क्रांतिसदस्यांना शिक्षण देताना “सशस्त्र क्रांतीवाचून स्वातंत्र्य कधीही संभवतच नसल्याने “तूं तुझं कर्तव्य कर, यश येवो वा ना येवो; देशमाता मुक्त करण्यासाठी, एक शत्रू जरी बळी घेऊन तू मारीत मारीत मेलास तरी तुझं कर्तव्य तू केलंस’’असं त्यागरूपी कर्तव्याचं शिक्षण दिलं. गावोगावी ‘मित्रमेळाव्याच्या शाखा’ काढल्या. सावरकरांनी पाहता पाहता फर्ग्युसन कॉलेज वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देशभक्तीचे वेड लावले. पुण्यातील सामान्य नागरिकांच्या भावना देशप्रेमाने फुलाव्यात म्हणून स्वदेश स्वातंत्र्याच्या वेडाने, टिळकांच्या प्रोत्साहनाने, परांजप्यांच्या मदतीने १९०५ मध्ये गाडीभर विदेशी कपड्यांची सार्वजनिक होळी करून दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन केले.

१८५७ हा, स्वातंत्र्य लढा होता, हे समप्रमाण लेखातून सिद्ध करून साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले. देशभक्तीचा दंड म्हणून सरकारने बी. ए. पदवी हिरावून घेतली. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या, बुद्धिमान श्रीमंत पण रंगेल अशा ७०० विद्यार्थ्यांना संघटित करून देशभक्तीचे वेड लावून, सशस्त्र क्रांतीच्या लढ्यात आणण्यासाठी वरकरणी बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले. बॅरिस्टर झाले, पण सनद घेतली नाही. लंडनच्या चार वर्षांच्या वास्तव्यानंतर सावरकरांना पाच आरोपाखाली पकडले. १) राजाविरुद्ध युद्ध करणं नि प्रोत्साहन देणे. २) गुप्त कट करणं. ३) शस्त्रास्त्र जमाविणं. ४) राजद्रोह करणं. ५) खुनाला साह्य करणं.

लंडनला येतानाच सावरकरांनी पोर्ट होल म्हणजेच वाटोळ्या खिडक्या कशा असतात, हे पाहिलं होतं. लंडनवरून ‘मोरिया’ या प्रवासी नौकेतून त्यांना नेताना या बोटीच्या खिडक्यांची झाकण पक्की बंद नसतात हेही पाहिलं. खिडकीचा व्यास १२ इंच अन् आपली छाती ३२ इंच. तरीही अंग संकोचून आपण उडी मारू शकू, हा आत्मविश्वास होता. ठरलेल्या गुप्त बेताप्रमाणे ८ जुलै सकाळी ६.३०च्या सुमारास सावधगिरीने शौचकुपातील काच झाकून, कपडे काढून, आवाज न करता, हातानी वरची खिडकी मागे रेटून आपले शरीर बाहेर ढकलत धाडकन उडी मारली. बरगड्या सोलल्या गेल्या तरीही भराभर पोहू लागले. दुर्दैवाने मित्रांना उशीर झाल्याने पुन्हा पकडले गेले. अर्ध्या तासाच्या आत घडलेला हा इतिहास. हीच ती त्रिखंडात गाजलेली सावरकरांची समुद्रातील उडी.

५० वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा, हे ऐकताच मनात चर्र झाले. लगेच समजून-उमजून संकटाला तोंड देण्याचा निर्धार केला. सावकारांचे ‘माझी जन्मठेप’ हे अंदमानातले आत्मचरित्र होय. नारळाच्या काथ्याचा दोरखंड वळताना, घाण्याला बैलासारखे जुंपून तेल काढताना, वेताचे फटके, जेवण (?) भयंकर छळ, मानसिक यातना सोसत असतानाही अडाणी, अक्षरशत्रू बंदीवानांना लिहायला, वाचायला, गाणी म्हणायला शिकविले. एक मोठं ग्रंथालय उभे केले. बाटवलेल्या हिंदू-मुसलमानांना शुद्ध करून तेथे हिंदू राज्य स्थापन केले. उत्कृष्ट महाकाव्य रचले. पराकोटीच्या देशभक्तीमुळेच सावरकर हे करू शकले. आचार्य अत्रे म्हणतात, साहित्यातील दहावा रस देशभक्ती असून त्याचे जनक वीर सावरकर आहेत. दि. वि. गोखल्यांनी तरुणांना आवर्जून सांगितलंय, “एकवेळ गीता-ज्ञानेश्वरी नाही वाचली तरी चालेल, पण ‘जन्मठेप’ वाचा. क्षुल्लक कारणासाठी तुम्ही आत्महत्या करणार नाहीत.” पुण्याचे माजी महापौर वासुदेव गोगटे यांनी विद्यार्थीदशेत सावरकरांना आम्ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी काय करावे? हे विचारताच ‘प्रथम कोण व्हायचे हे निश्चित करा. काँग्रेसच्या दहा अधिवेशनांनी जी राजकीय जागृती होत नाही ती राजगुरू भगतसिंगांच्या हौतात्म्याने होते. ‘मारिता मारिता मरावे’ हे विसरू नये.

१९२४ ला कारावास संपवून तेरा वर्षे रत्नागिरीत स्थानबद्ध असताना अस्पृश्यतेतून उद्भवणारं धर्मांतर नि राष्ट्रांतर टाळण्यासाठी प्रचंड काम केले. सर्व हिंदूंसाठी मुक्तद्वार असे पतितपावन मंदिर उभारले. आपल्या अनुयायांनी निष्ठेने देशकार्य करावे या उद्देशानं सावरकर “एक देव, एक देश, एक आशा एक जाति, एक जीव, एक भाषा” अशी शपथ ते स्वतः आणि सहकाऱ्यांकडून म्हणवून घेत.

सावरकर हे सदोदित सर्वांगीण साधक-बाधक विचार केल्यावरच आपलं म्हणणं मांडत होते. विज्ञानवादी सावरकर भोळसट आचार, खुळ्या रूढी यावर कडाडून टीका करतानाच तरुणांना संदेश देतात “जे त्रिकालाबाधित सत्य असते त्याची कास धरा.” ‘काल’च्या पोथीनं ‘आज’ बांधलेला नसावा अन् ‘उद्या’ तर नसावाच नसावा.’ स्वतंत्र भारताच्या राष्ट्रध्वजावर घटना समितीत चरख्याऐवजी सारनाथ-स्तंभावरील धर्मचक्र सावरकरांच्या सूचनेवरून स्वीकारलं गेलं. सावरकरांनी ‘जगावं कसं’ हे जसं शिकवलं तसे ‘मरावं कसं’ हेही शिकवलं. महिनाभर ‘प्रायोपवेशन’ करून आपली जीवनयात्रा संपवली.

शेवटी विविध क्षेत्रांत असाच उज्ज्वल इतिहास घडविणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे अनेक कार्यकर्ते भारतात पुन्हा निघोत हीच त्यांच्या जयंती निमित्ताने प्रार्थना करते. ‘तेथे कर माझे जुळती’!

mbk1801@gmail.com

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

5 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

6 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

6 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

8 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

9 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

9 hours ago