मुंबई-पुणे (वार्ताहर) : भारताच्या युवा खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळांच्या स्पर्धेत चांगली कामगिरी करता यावी, यासाठी देशभरात प्रत्येक स्तरावर क्रीडाविषयक पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती व्हायला हवी, ही बाब केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी अधोरेखीत केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलाचे उद्घाटन आणि कुस्तीपटू खाशाबा जाधव आणि स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण शनिवारी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
खासदार गिरीश बापट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे, अध्ययन परिषदेच्या सदस्य सुनेत्रा पवार, क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष राजेश पांडे आणि क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. दिपक माने यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्याला भारतीय खेळाडूंना अधिकाधिक पदके जिंकण्याच्या दृष्टीने सक्षम बनवायचे आहे. मात्र त्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, राष्ट्रीय खेळ प्राधिकरण, राज्य क्रीडा संघटना आणि क्रीडाविषयक कॉर्पोरेट संस्था या सगळ्यांनी एकत्र काम करण्याची गरज अनुराग सिंग ठाकूर यांनी यावेळी अधोरेखीत केली.
स्वतंत्र भारताला पहिले ऑलिम्पिक वैयक्तिक पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव आणि स्वामी विवेकानंद यांचे पूर्णाकृती प्रत्येकी ६ फूट उंचीचे पुतळेही या क्रीडा संकुलाच्या आवारात उभारले आहेत. हे क्रीडा संकुल उभारल्याबद्दल आणि क्रीडा संकुलाला स्वतंत्र भारताला पहिले ऑलिम्पिक वैयक्तिक पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचे नाव दिल्याबद्दल त्यांनी विद्यापीठ व्यवस्थापनाचे अभिनंदन केले. १९५२ साली झालेल्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकणारे खाशाबा जाधव हे पुणे विद्यापीठाचेच विद्यार्थी होते. स्वामी विवेकानंद सर्व युवांचे प्रेरणास्त्रोत आहेत. खेळलात तरच शारीरिक आणि मानसिक पातळीवर सुदृढ राहू शकतो असा संदेश देणाऱ्या स्वामी विवेकानंदांचा पुतळा क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वारावरच उभारणं ही गौरवाची बाब आहे असेही ते म्हणाले.
जगभरातील विद्यापीठांचे पदक विजेते खेळाडू तयार करण्यात मोठं योगदान आहे. भारतातही अलिकडेच बंगळुरू इथे पार पडलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेत ७,००० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाल्याचे आपण पाहीले. या स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही चांगली कामगिरी करत, पहिल्या ५ विद्यापीठांमध्ये स्थान मिळवले आहे असे ठाकूर म्हणाले.