Wednesday, April 30, 2025

पालघर

जव्हारमधील बीएसएनएल कार्यालय कुणाच्या भरवशावर?

जव्हारमधील बीएसएनएल कार्यालय कुणाच्या भरवशावर?

जव्हार (वार्ताहर) : जव्हार शहरात शासकीय, खासगी संस्थांच्या कार्यालयांमध्ये बीएसएनएलचे इंटरनेट वापरले जाते. परंतु शहरातील बीएसएनएल कार्यालयात अधिकारी, कर्मचारी नसल्यामुळे चोरांना सुगीचे दिवस आले आहेत. या कार्यालयातील जवळपास २० टक्के सामग्री चोरीस गेली आहे. त्यामुळे ग्राहकांना नेटवर्कची समस्या निर्माण होऊ लागली आहे.

या बीएसएनएल कार्यालयात लाखो रुपयांची यंत्रसामग्री आहे. त्या सामग्रीची योग्य प्रकारे देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे मनुष्यबळ नाही. त्यामुळे दिवसेंदिवस ही यंत्रसामग्री भंगार होत आहे. याचाच फायदा भुरट्या चोरांनी घेतला असून कार्यालयातील जवळपास २० टक्के सामग्री चोरी केली आहे.

जव्हार पोलिसांनी अशा चोरांवर कारवाईही केली आहे. परंतु बीएसएनएल कार्यालयात कोणी हजर राहत नसल्याने एवढ्या महागाच्या यंत्रसामग्री कुणाच्या जबाबदारीवर ठेवल्या आहेत. बीएसएनएल अधिकारी यांना ही बाब निदर्शनास येत नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ग्राहकांना रिचार्ज करूनही चांगल्या दर्जाची सुविधा मिळत नाही, याकडे कोण लक्ष देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जव्हार येथील बीएसएनएल कार्यालयात अधिकारी, कर्मचारी वर्गाची त्वरित नेमणूक करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सध्या इंटरनेटचे जाळे जगभर पसरले आहे. शहरातील बीएसएनएल कार्यालयात लाखोंची यंत्रसामग्री केवळ चोरांना चोरी करण्यासाठी ठेवली आहे का? शिवाय ग्राहकांकडून आगाऊ रिचार्जचे पैसे घेऊन लूटमार करण्याचे काम चालू आहे. जव्हार येथील बीएसएनएल कार्यालयातील होणारे नुकसान टाळण्यासाठी कार्यालयात कर्मचारी पाठवणे गरजेचे आहे.

-गोपाळ वझरे, मनसे तालुकाध्यक्ष, जव्हार

Comments
Add Comment