Thursday, January 16, 2025
Homeमहामुंबईचलनात २ हजाराच्या नोटा घटल्या तर ५०० रुपयांच्या वाढल्या

चलनात २ हजाराच्या नोटा घटल्या तर ५०० रुपयांच्या वाढल्या

आरबीआयने वार्षिक अहवालात केला खुलासा

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांत अर्थव्यवस्थेतून दोन हजार रुपयांच्या नोटा गायब झाल्याचे निरीक्षण नुकतेच आरबीआयने नोंदविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ साली नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने २००० रुपये किमतीची नवीन नोट चलनात आणली होती. पण मागील काही दिवसांत अर्थव्यवस्थेतून दोन हजार रुपयांच्या नोटा गायब झाल्याचे निरीक्षण नुकतेच आरबीआयने नोंदविले आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार, मार्च २०२२ च्या संपलेल्या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच्या नोटात १२.६० टक्क्यांची घट झाली आहे. सध्या बाजारात २ हजार रुपयांच्या २१ हजार ४२० लाख नोटा आहेत. गेल्या वर्षी हा आकडा २४ हजार ५१० लाख इतका होता, तर २०२० मध्ये अर्थव्यवस्थेत २७ हजार ३९८ लाख २ हजार रुपयांच्या नोटा होत्या. गेल्या दोन वर्षांत चलनात असलेल्या २ हजार रुपयांच्या नोटांच्या संख्येत २१.८१ टक्क्यांनी घट झाली आहे.

विशेष म्हणजे आरबीआयने गेल्या चार वर्षात दोन हजार रुपयांच्या नवीन नोटांचा पुरवठा केलेला नाही. नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीनंतर आरबीआयने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करत २,००० रुपयांची नोट बाजारात आणली होती. तसेच २०१६ मध्ये नव्याने डिझाइन केलेली ५०० रुपयांची नोटही आरबीआयने बाजारात आणली होती.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, चलनात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांचे मूल्य मार्च २०२२ मध्ये १२.६० टक्क्यांनी घसरून ४,२८,३९४ कोटी रुपयांवर आले आहे. जे गेल्या वर्षी ४,९०,१९५ कोटी रुपये इतके होते, तर दुसरीकडे, मार्च २०२२ मध्ये चलनात असलेल्या ५०० रुपयांच्या नोटांची संख्या वाढली असून सध्या बाजारात ४,५५,४६८ लाख ५०० रुपयांच्या नोटा आहेत. मागील वर्षी बाजारात ३,८६,७९० लाख नोटा होत्या, अशी माहिती मध्यवर्ती बँकेने आपल्या वार्षिक अहवालात दिली आहे. गेल्या आर्थिक वर्षात आरबीआयने ५०० रुपयांच्या १,२८,००३ नोटांचा पुरवठा केला होता, असेही आरबीआयने म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -