नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी भारतीय बॉक्सर लव्हलिना बोरगोहेनची इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशनच्या अॅथलीट समितीच्या प्रमुखपदी निवड झाली आहे. इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशनतर्फे सांगण्यात आले की, लोव्हलिनाला सर्वाधिक मते मिळाली आहेत.
महिलांच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळाडू समितीचे प्रमुख आणि संचालक मंडळासाठी मतदान झाले. नुकतेच हे मतदान पार पडले. शिव थापा यांचीही क्रीडापटू समितीत निवड झाली आहे. त्यांची निवड २०२१ च्या पुरुषांच्या जागतिक चॅम्पियनशिप दरम्यान झाली.
निवड झाल्यानंतर लव्हलिना म्हणाली, ‘माझा सन्मान आहे. मला समिती सदस्य होण्याची आशा होती, पण मी अध्यक्ष होईन याची कल्पनाही नव्हती. यामुळे मला भारतीय बॉक्सिंग, विशेषतः महिला बॉक्सिंगला प्रोत्साहन देण्यासाठी मदत होईल. बॉक्सिंगला प्रोत्साहन देण्याची ही माझ्यासाठी मोठी संधी असल्याचेही ती म्हणाली. सर्वप्रथम, मी सदस्य मंडळ आणि जगातील बॉक्सर्सचा सल्ला घेण्याचे ठरवले आहे.
या कामगिरीबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे. ठाकूर म्हणाले, ‘ही मोठी जबाबदारी आहे. मला आशा आहे की तुम्ही दोघेही तुमचे कर्तव्य पार पाडाल.