मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्रकार परिषदेनंतर आता भाजपानेही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले की, संभाजीराजे छत्रपतींच्या निमित्ताने चार भिंतीच्या आड खोटं कोण बोलतो हे उघड झाले. आपल्याला अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचं वचन दिलं होतं, म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना खोटे पाडणारे, आज पुरते उघडे पडले आहेत, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली.
संभाजी राजे छत्रपतीच्या निमित्ताने चार भिंतीच्या आड खोटं कोण बोलतो हे उघड झाले.
आपल्याला अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचं वचन दिलं होतं म्हणून अमित शहांना खोटे पाडणारे, आज पुरते उघडे पडले आहेत.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 27, 2022
शिवसेनेत या, शिवबंधन बांधा तरच राज्यसभेची उमेदवारी देऊ अशी अट उद्धव ठाकरेंनी संभाजीराजे छत्रपतींसमोर ठेवली. इतकंच नाही तर राज्यसभा हवी असेल तर मातोश्रीवर येऊन शिवबंधन बांधा, असा निरोप शिवसेनेने राजेंना धाडला. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती इच्छुक होते. अपक्ष म्हणून लढण्यावरच त्यांचा सुरुवातीपासून भर होता. त्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती, शरद पवारांना राजे भेटले, अगदी फडणवीसांचीही त्यांनी भेट घेतली. अपक्ष म्हणून लढलो तर सर्वपक्षीय पाठिंबा देतील अशी अपेक्षा राजेंना होती पण तसं झालं नाही. तरीही संभाजीराजे म्हणतात, मी अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणूक लढवणार होतो. मला कुठल्याही पक्षाचा द्वेष नाही.