जपानची राजधानी टोकियोमध्ये क्वाड शिखर परिषदेला सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होण्यासाठी विमानतळावर उतरले, तेव्हा सोमवारी विमानतळ परिसर ‘‘जय श्रीराम’’च्या घोषणांनी दणाणून गेले. मोदी… मोदींचा जयघोषही अनिवासी भारतीयांनी केला. याचा अर्थ आजही परदेशातील भूमीत वास्तव्य करणाऱ्या भारतीयांच्या मनात नरेंद्र मोदी यांची किती क्रेझ आहे, हे दिसून आले. त्यांच्या स्वागतातून देशाभिमान्यांच्या छाती फुगून आल्या. ‘‘झंडा ऊँचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा’’ या देशभक्तीपर गीताच्या ओळी ओठांवर तरारल्या. त्याचे कारण सोमवारी जपानच्या भूमीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ज्या भव्यतेने स्वागत झाले. आपल्या देशाला जगभरात जो मान आणि सन्मान मिळत आहे, ते पाहून विजयी विश्व तिरंगाचे शब्द पुन्हा आठवले. आज आपल्या देशाची जगात चर्चा होत असल्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत आहे.
मंगळवारी होणाऱ्या क्वाड शिखर परिषदेसाठी उपस्थित राहिलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जपान दौरा भरगच्च कार्यक्रमांनी भरलेला आहे. जवळपास ४० तासांच्या मुक्कामादरम्यान ते एकूण २३ कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तसेच अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रप्रमुखांसोबत स्वतंत्र बैठका घेणार आहेत. जपानच्या दौऱ्यावर व्यापार, राजनैतिक आणि सामुदायिक मुद्द्यांवरही ते चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर एकूण ३०हून अधिक जपानी कंपन्यांचे सीईओ आणि शेकडो अनिवासी भारतीय नागरिकांशी नरेंद्र मोदी यांचा संवाद होणार आहे. त्यामुळे परदेश दौऱ्यांमध्ये कमी वेळात अधिकाधिक सभा घेण्याची पंतप्रधान मोदी यांची प्रथा जपान दौऱ्यातही कायम राहणार असल्याचे दिसून येत आहे.
देशाला विकासाच्या वाटेवरून पुढे नेत असताना, जगातील प्रमुख देशांचे भारताशी कायम सौहार्दाचे संबंध राहिले आहेत, त्यापैकी जपान हा एक देश. भारताबरोबर जपान हा नैसर्गिक साथीदार म्हणून उभा राहिला आहे. भारताच्या विकासामध्ये जपानचे महत्त्वाचे योगदान आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस मार्ग याला जपानचे पाठबळ आहे, असे खुद्द नरेंद्र मोदी यांनी जपानमधील कार्यक्रमात सांगितले. जपानच्या लोकांची देशभक्ती, जपानच्या लोकांचा आत्मविश्वास आणि स्वच्छतेविषयी जागरूकता याबद्दलचे कौतुक मोदी यांनी केले. आपल्या ओघवत्या शैलीतील भाषणाने पंतप्रधान मोदी यांनी जपानवासीयांची मने जिंकली आहेत.
या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा फ्रान्सचे राष्ट्रपती झालेल्या इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. फ्रान्सचे राष्ट्रपती निवड झाल्यावर पहिल्यांदा जर्मनीच्या दौऱ्यावर येतात; परंतु ते जपानला आले आहेत आणि यावेळी मॅक्रॉन यांनी नरेंद्र मोदी यांची खास भेट घेतली. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनीही मॅक्रॉन यांना भारताच्या दौऱ्यावर येण्याचे निमंत्रण दिले. गेल्या ८ वर्षांपासून नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक नेत्यांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांत अनेक देशांमध्ये सत्ताबदल झाला आहे. त्यात अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांचा समावेश आहे. त्यामुळे सत्ताबदल झालेल्या देशांनी देखील भारताशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न मोदी यांच्याकडून होत असल्याचे दिसून आले आहे. ऑस्ट्रेलियाचे नवनिर्वाचित पंतप्रधान अल्बनीज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची स्नेहभेट झाली. जर्मनीचे चान्सलर ओलाफ शॉल्त्स यांच्यासोबत नरेंद्र मोदींची एक विशेष बैठक झाली. शॉल्त्स हे गेल्या डिसेंबर महिन्यात सत्तेवर आले आहेत. इस्त्राइलचे पंतप्रधान नफताली बेनेट यांचे नरेंद्र मोदी यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात बेनेट भारतात आले होते, त्यावेळी नरेंद्र मोदी इस्त्राइलमध्ये प्रसिद्ध असल्याचे ते म्हणाले होते. मोदी आणि इस्त्राईलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्यातदेखील चांगले संबंध होते. जगात महासत्ता असलेल्या अमेरिका, रशिया, चीन या प्रमुख देशांचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? त्यांच्याशी आपण कसे जुळून घ्यायचे? याबाबत अन्य देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाचे खाते नेहमीच विचार करताना दिसत असते. गेल्या काही वर्षांत भारताची भूमिका काय आहे? याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या आधी यूरोपच्या दौऱ्यावर गेले होते. तिथे जर्मन चान्सलर ओलाफ शॉल्त्स यांची भेट घेतली होती. त्या भेटीत दोन्ही देशांमध्ये सहकार्य करारावर भेट झाली. जर्मनीने भारताला पर्यावरणविषयक प्रकरणांमध्ये सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. अशा प्रकारे नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे ८ वर्षांत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे महत्त्व वाढले आहे, ही गोष्ट नाकारता येत नाही.