Tuesday, July 16, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखराजीव गांधींचा मारेकरी सुटला कसा?

राजीव गांधींचा मारेकरी सुटला कसा?

सुकृत खांडेकर

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या केल्याप्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने व सर्व चौकशी यंत्रणांनी दोषी ठरविलेला पेरारिवलन हा तुरुंगातून सुटला कसा? तो जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना त्याची सुटका कशी झाली? तो बाहेर आल्यावर तामिळनाडूतील राजकीय पक्षांनी त्याचे जंगी स्वागत कसे केले? या प्रश्नांची उत्तरे शोधताना मती गुंग होते. १८ मे २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव, बी. आर. गवई आणि ए. एस. बोपन्ना यांच्या खंडपीठाने कलम १४२ चा हवाला देऊन निकाल दिला. या कलमाचा आधार घेऊन कंप्लिट जस्टिस दिला. कारण त्याची दया याचिका कित्येक वर्षे प्रलंबित होती. शिक्षेतून मुक्तता मिळताच, पेरारिवलन याने आपल्या आईने माझ्या सुटकेसाठी चालवलेला एकतीस वर्षांचा संघर्ष यशस्वी झाला, असे उद्गार काढले. राजीव गांधींची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेल्या बॉम्बमध्ये नऊ व्होल्टच्या दोन बॅटरीजचा उपयोग केला होता. त्या बॅटरीज पेरारिवलनने आणून दिल्या होत्या. राजीव गांधी हत्या प्रकरणी पेरारिवलनला वयाच्या १९व्या वर्षी अटक झाली. सुरुवातीला फाशीची शिक्षा झाली, नंतर तिचे रूपांतर जन्मठेपेत झाले आणि आता वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्याची सुटका झाली.

तामिळनाडूतील पेरूबंदर येथे २१ मे १९९१ रोजी एका निवडणूक प्रचार सभेला आले असताना राजीव गांधी यांची कमरेला बेल्टमध्ये बॉम्ब बांधलेल्या एका आत्मघाती महिलेने त्यांची हत्या केली. २४ मे रोजी सीबीआयच्या विशेष पथकाकडे त्याची चौकशी सोपवली. ११ जून १९९१ रोजी सीबीआयने १९ वर्षांच्या पेरारिवलनला अटक केली. २० मे १९९२ रोजी एसआयटीने ४१ आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले. त्यातले बारा आरोपी मरण पावले होते. २८ जानेवारी १९९८ रोजी टाडा कोर्टाने नलिनी व पेरारिवलनसह २६ जणांना फाशीची शिक्षा ठोठावली. ११ मे १९९९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने पेरारिवलन, नलिनी, मुरूगन व संथानसह चार आरोपींची फाशी कायम केली. ए. जी. पेरारिवलन ऊर्फ अरिवू हा तमिळ कवी कुयिलदासन यांचा मुलगा. शाळेत असतानापासूनच तो लिबरेशन टाइगर्स ऑफ तमिळ इलम (लिट्टे)ने प्रभावित झाला होता. राजीव गांधी दि. २१ मे १९९१ रोजी श्रीपेरूबंदर येथे एका मेळाव्यासाठी आले असताना त्यांची हत्या झाली तेव्हा पेरारिवलन याचे वय १९ होते. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर वीस दिवसांनी पेरारिवलनला अटक झाली.

त्याच्यावर दोन आरोप ठेवण्यात आले. एक – त्याने नऊ व्होल्टच्या दोन बॅटरीज खरेदी करून हत्याकांडाचे मास्टरमाइंड लिट्टेचे नेते के. शिवरासन याला दिल्या आणि दुसरा आरोप – राजीव गांधी यांच्या हत्येपूर्वी काही दिवस अगोदर शिवरासनला घेऊन पेरारिवलन एका दुकानात गेला व तेथे बनावट पत्ता देऊन एक मोटारसायकल खरेदी केली. राजीव गांधी हत्याप्रकरणी दि. २८ जानेवारी १९९८ रोजी टाडा न्यायालयाने पेरारिवलनसह २६ जणांना फाशीची शिक्षा ठोठावली. ११ मे १९९९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने पेरारिवलन, नलिनी, मुरूगन व संथानसह चौघांची फाशीची शिक्षा कायम ठेवली. तिघाजणांना फाशीऐवजी जन्मठेपेची सजा दिली आणि एकोणीसजणांना निर्दोष मुक्त केले. पेरारिवलनने एकतीस वर्षांची शिक्षा पुजहल व वेल्लोर सेंट्रल जेलमध्ये भोगली. त्यातील २४ वर्षे त्याने अंधाऱ्या कोठडीत काढली, जिथे तो एकटा होता. जेलमध्ये शिक्षा भोगत असताना त्यांने इंदिरा गांधी राष्ट्रीय खुल्या विद्यापीठातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्याशिवाय आठ डिप्लोमा व सर्टिफिकेट कोर्सेसही त्याने पूर्ण केले.

सर्वोच्च न्यायालयाने १९९९ मध्ये फाशीची शिक्षा सुनावल्यावर पेरारिवलनकडे पर्यायही शिल्लक राहिले नाहीत. सन २०११ मध्ये त्याने राष्ट्रपतींना दयेचा अर्ज केला. अकरा वर्षांनी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी त्याचा दयेचा अर्ज फेटाळून लावला. त्याला फाशीची शिक्षा देण्यासाठी दि. ९ सप्टेंबर २०११ ही तारीख निश्चित झाली. फाशीनंतर त्याचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी त्याच्या आईला पत्रही पाठवण्यात आले. पण त्यानंतर अचानक अशा काही गोष्टी घडत गेल्या, त्यामुळे त्याच्या जीवनाला वेगळीच दिशा मिळू लागली. फाशी देण्याच्या अगोदर तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी एक ठराव संमत करून घेतला आणि राजीव गांधी हत्या प्रकरणी ज्यांना दोषी ठरवून शिक्षा झाली आहे ती कमी करावी, अशी राज्य सरकारच्या वतीने मागणी केली. त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने दोषींच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली. सन २०१३ मध्ये सीबीआयचे अधिकारी टी. त्यागराजन यांनी खुलासा केला की, पेरारिवलन याने त्याचा कबुलीजबाब बदलला आहे. आपण दिलेल्या बॅटरींचा उपयोग राजीव गांधी यांच्या हत्येसाठी, बॉम्ब बनविण्यासाठी होणार होता याची आपणास माहिती नव्हती, असे त्याने नव्या जबाबात म्हटले. सीबीआयने त्याचे प्रतिज्ञापत्रही न्यायालयात सादर केले. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. टी. एस. थॉमस यांनी २०१३ मध्ये म्हटले की, तेवीस वर्षे ज्याने तुरुंगात काढली त्या कोणालाही फाशी देणे योग्य ठरणार नाही. फेब्रुवारी २०१४ मध्ये मुख्यमंत्री जयललिता यांनी पेरारिवलनची आई अरपुतमची चेन्नईत भेट घेतली. त्यानंतर पेरारिवलनने आपल्याला झालेली शिक्षा माफ करावी, यासाठी राज्यपालांकडे दयेचा अर्ज पाठवला.

पेरारिवलनला तामिळनाडू सरकारने ऑगस्ट २०१७ मध्ये पहिल्यांदा पेरोल दिला. सप्टेंबर २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पलानीस्वामी सरकारने सर्व सातही दोषींची सुटका करावी, अशी शिफारस केली. तामिळनाडू सरकारने पेरारिवलनचा पेरोलला सतत मुदतवाढ दिली. मार्च २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याला जामीन दिला आणि १८ मे २०२२ रोजी त्याची सुटका करण्याचा आदेश दिला. पेरारिवलनची आई अरपूतमने म्हटले आहे की, सुरुवातीला आम्हाला काय करावे हे समजत नव्हते. पोलीस, कोर्ट, कायदा, वकील, तारखा हे सर्व आम्हाला नवे होते. अरिवु (पेरारिवलन)च्या दोन्ही बहिणी मिळवत्या होत्या. त्यांच्या पैशातून त्याची कोर्ट केस लढवली जात होती. पेरारिवलनला १९९९ मध्ये फाशीची शिक्षा देणारे न्या. केटी थॉमस यांनी या निकालानंतर प्रतिक्रिया दिली. ‘‘आता सामान्य माणसाप्रमाणे सुरळीत व आनंदाने जीवन जगावे. त्याने फार मोठी कायदेशीर लढाई लढली. वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्याची सुटका झाली, याविषयी मी तरी काय बोलू? त्याच्या सुटकेचे सारे श्रेय मी त्याच्या आईला देतो.’’

sukritforyou@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -