Thursday, December 12, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखसर्वांची माऊली...

सर्वांची माऊली…

संतोष वायंगणकर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कार्यकर्तृत्वाला समर्थ साथ देत ज्यांनी राणे कुटुंबाची सावली बनून प्रत्येक प्रसंग आणि आनंदाचे असंख्य क्षण अनुभवतानाही त्यांच्यातला साधेपणा, आपलेपणा, माणूसपण कधीही बाजूला होऊ दिला नाही. आजही कोणालाही त्या आपलं गाऱ्हाण, म्हणणं सांगण्याची एक हक्काची व्यक्तिमत्त्व वाटतात. अशा सौ. निलम नारायण राणे यांचा आज वाढदिवस आहे. सौ. निलमवहिनींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं व्यक्तिमत्त्व हे एक अजब रसायन आहे. त्यांच्यातला राजकारणात न चालणारा स्पष्टवक्तेपणा, त्यातून निर्माण होणारी वादळं आणि त्याच वेळी आपल्या जन्मभूमी कोकणावर नितांत प्रेम असणारं नारायण राणेंचं व्यक्तिमत्त्व, कर्णाचे दातृत्वगुण, कुटुंबवत्सल, सहृदयी असणाऱ्या नारायण राणे यांच्या कार्यकर्तृत्वात सौ. निलमवहिनींची साथ ही निश्चितच लाखमोलाची होती. सौ. निलमवहिनींचा राजकारणाशी थेट संबंध आला नाही. मात्र, तरीही राजकारणात असणाऱ्या तसेच समाजातील सर्वांनाच सौ. निलमवहिनी या आपल्या ताई, वहिनी, आई वाटत राहिल्या. एक सहृदयी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. लग्नानंतरचे चेंबूरमधील सुरुवातीचे दिवस वेगळे होते. राणे कुटुंबातील सर्वांची जबाबदारी साहेबांवरच होती. आयकर विभागाची नोकरी सोडून साहेबांनी मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक पदाची निवडणूक लढविणे आणि नगरसेवक निवडणुकीत कार्यकर्त्यांना स्वत: मैत्रिणींच्या सहाय्याने पुरी-भाजी बनवून ती कार्यकर्त्यांना कशी वाटली. निवडणुकीतील विजय साजरा करण्यासाठीही पैसे कसे नव्हते अशा असंख्य जुन्या आठवणी सांगताना सौ. निलम राणे भावुक होतात. मात्र राणे कुटुंबाच्या प्रत्येक व्यवसायात आणि संस्थेतही सौ. वहिनींचं अगदी बारीक-सारीक लक्ष असतं. गेल्या महिनाभरातीलच एक घटना आहे. प्रहार भवनमधील स्वामी विवेकानंद सभागृहाच्या (हॉल) खिडकीतून पडदा बाहेर आलेला होता. प्रहार भवनाच्या समोरून गाडीतून जाताना सौ. वहिनी यांचं लक्ष गेलं. त्यांनी चालकाला सांगून ताबडतोब मला कळवलं. कोणी म्हणेल, यात काय विशेष असं नाही. माणसं उगाच मोठी होत नाहीत. श्रीमंत होत नाहीत. त्यामागे उदारता जपतानाच व्यवहारवादही तितकाच सांभाळलेला असतो.

सुरुवातीच्या जीवनातील संघर्ष आणि गरिबी अनुभवलेली असल्याने सर्वसामान्यांबद्दलची कणव त्यांच्यात असते. कोणताही व्यवसाय, उद्योग उभारताना त्यातून आपल्या कोकणातील तरुणांना रोजगाराची संधी मिळावी हाच त्यांचा प्रयत्न आणि उद्देश असतो. सिंधुदुर्गातील महिलांच्या हाताला काम मिळावे यासाठीच त्यांनी जिजाई महिला संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देऊन उद्योगशिलता वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. १९९० पासून सौ. निलमवहिनींना पाहात आलोय. त्यांच्या वागण्या-बोलण्यात कधीच कोणताच फरक पडलेला नाही. जेवढ्या आदराने त्या श्रीमंतांशी बोलतील, तोच आदर आणि आपलेपणा एखाद्या खेड्यातून आलेल्या महिलेच्या बाबतीत असतो.

खरं तर श्रीमंती ही अनेकांना समाजापासून आणि माणुसकीपासून दूर घेऊन जाते असे म्हणतात; परंतु इथे तसं कधीच घडलं नाही. असंख्यांना वेळप्रसंगात त्यांनी वैयक्तिकरीत्या मदत केली; परंतु त्यांनी कधीच ही बाब बोलून दाखविलेली नाही. यासंदर्भाने कधी बोलणं झालंच, तर फक्त सौ. निलमवहिनी एवढंच म्हणतील, देवाने आपणाला दिलेलं असतं. त्यातला काही भाग दिला तर त्यात एवढं काय आहे. फक्त आपण ज्यांना मदत करतो त्यांनी त्याचा योग्य वापर करावा इतकंच.

कणकवली तालुक्यातील सांगवे येथे वृद्धाश्रम त्या चालवतात. या वृद्धाश्रमात असणाऱ्या वृद्धांना अत्यंत आपलेपणाची वागणूक त्यांच्याकडून असते आणि या वृद्धाश्रमातील मंडळी ही राणे दांपत्याला आपली मुलंच वाटतात, असं एक वेगळं नातं त्यांच्यामध्ये तयार झालेलं आहे. सौ. निलमवहिनींनी माणसं कधीच तोडली नाहीत. राजकीय स्वार्थासाठी दुरावलेलेही सौ. वहिनींबाबत कमालीचे सॉफ्ट असतात. त्याचे कारण सौ. निलमवहिनींनी कार्यकर्त्यांना आपलेपणाने सांभाळलेले असतं. कुणावरही कधीही रागावणं नाही, ओरडणं नाही. समोरच्याला त्याची चूक दर्शवितानाही चूक करणाऱ्याला अपराधीपणा वाटला पाहिजे. इतक्या सौम्य शब्दांत त्यांचं बोलणं असतं. सौ. वहिनी राजकारणात नाहीत, राजकारणी नाहीत; परंतु त्यांना माणसांची उत्तम पारख आहे. म्हणूनच राणे परिवाराचा हा सारा डोलारा सौ. निलमवहिनींच्या मार्गदर्शनाखाली सांभाळला जातो. परमेश्वरावर त्यांची नितांत श्रद्धा आहे. भक्तिभावातून देवावर श्रद्धा ठेऊन काम करत राहण्यातच त्या समाधानी आहेत. ‘देवाने आम्हाला खूप काही दिलंय. साहेबांच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याची संधी दिली आहे. हे देखील आमचं भाग्यच आहे’ असं मी मानते, असे त्या अनेक वेळा सांगतात. खऱ्या अर्थाने सर्वांच्याच माऊली आणि राणेंच्या सावली असलेल्या सौ. निलमवहिनींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. श्रीदेव रामेश्वराने उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य द्यावे हीच प्रार्थना!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -