मुंबई : शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होताना दिसत आहे. यशवंत जाधव यांना इन्कम टॅक्स विभागाकडून छापेमारी करण्यात आल्यानंतर आता ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे.
यापूर्वी इन्कम टॅक्स विभागाकडून यशवंत जाधव यांचे घर, मालमत्तावर छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर आता ईडीकडून समन्स आल्याने यशवंत जाधव अडचणीत येताना दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत जाधव यांना फेमा अंतर्गत ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. ईडीकडून आता यशवंत जाधवांच्या परदेशातील गुंतवणुकींची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यशवंत जाधव यांच्या संपत्तीची आणखी एक माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. आयकर विभागाने केलेल्या चौकशीतून यशवंत जाधव यांची संपत्ती आता 36 वरून 53 वर पोहोचली आहे. यात कैसर बिल्डींगचा समावेश आहे. या एका इमारतीतून 80 कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
काही ज्वेलर्सकडून 6 कोटींच्या दागिन्यांची खरेदी केले. ही संपूर्ण रक्कम रोखीने अदा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कोरोनेशन बिल्डिंग, झैनाब महाल आणि कैसर बिल्डिंगमध्ये अचल संपत्ती हस्तांतरणासाठी 3 कोटींहून अधिक रक्कम रोखीने खरेदी केल्याचे समोर आले आहे. आणखी रोख रकमेच्या व्यवहारांचा तपास सुरू आहे.