
प्रियानी पाटील -
तुम्हाला कोकण जास्त आवडते की मुंबई?
मुंबई. माझा जन्म मुंबईचा असल्याकारणाने माझा मुंबईशी जास्त संपर्क आला. नंतर कोकणाशी संबंध हा राजकीय क्षेत्रामुळे जास्त आला. कोकणातही आम्ही लहानपणी मे महिन्यात शाळांना सुट्टी असली की जायचो. तेवढाच कोकणशी संबंध होता. पण त्यानंतर राणे साहेबांनी जेव्हा पहिली निवडणूक लढवली. त्यानंतर खरं तर कोकणशी जास्त संपर्क वाढला, येणं जाणं वाढलं. आता दर महिन्याला कोकणात जावं लागतं. नाहीतर वर्षातून एकदा तरी जाणं व्हायचंच. पण साहेबांच्या निवडणुकीनंतर कोकणाशी जास्त संबंध येऊ लागला. आता दोन्ही मुलांनी कोकणात निवडणूक लढवली आहे. राजकीय कार्यक्षेत्र कोकणात व्यापलं आहे. कोकणही आवडतं, पण त्या तुलनेत आवडते जास्त ती मुंबईच.
गृहिणी आणि सहचारिणीमध्ये आपली राजकीय भूमिका किती आहे?
गृहिणी म्हटलं तर घर आणि संसार हा कोणत्याही स्त्रीला चुकलेला नाही. घर सांभाळताना आमच्याकडे तिघेही राजकारणात असल्यामुळे घर सांभाळताना राजकारण हे येतच येतं. कारण कोणत्याही गोष्टीची चर्चा असते. कार्यक्रम असतात, राजकीय वातावरण घरातच असल्याने लोकांचं येणं-जाणं असतं. कुणाला मदत हवी असेल, साहेब घरात नसतील तेव्हा मला पुढाकार घेऊन मग किंवा निलेश, नितेशला भेटायला माणसं येतात. सारखा दिवसभर राबता चालूच असतो. त्यामुळे नाही म्हटलं तरी राजकीय सहभाग हा असतोच!
बाहेरील राजकारणाचा त्रास किती होतो?
प्रचंड त्रास होतो. आजचं राजकारण झालंही तसंच आहे. आपल्या वैयक्तीक जीवनावर त्यांचा जेव्हा परिणाम होतो तेव्हा त्रास होतोच होतो. इथे पेशन्स ठेवावे लागतात. आता कुणीही उठतो आणि आरोप-प्रत्यारोप करतो. याचा त्रास होतो. मीडियामुळे हे जास्त फोफावले आहे. याचा गैरफायदा घेतला जातो.
सगळ्यात जास्त त्रास केव्हा झाला?
शासनाने आमच्या घरावर जेव्हा नोटीस काढली, तेव्हा. मला असं वाटतं, खरंतर कुणीही कुणाच्या घरापर्यंत जाऊ नये. शेवटी कुणीही नेता किती मोठा असला तरी त्याला घर हे असतंच. त्या घरावर जर तुम्ही नोटीसा काढून त्रास द्यायचा प्रयत्न केला तर त्रास कुटुंबीयांना होणारच. घर हे प्रेमाने, मायेने सांधलेले असते. कुटुंब एकत्र राहत असतं. घरावर संकट आलं तर पूर्ण कुटुंबाला मनस्ताप सहन करावा लागतो. साहेबांवरील आकसामुळे शासनाने घरावर नोटीस आणली पण त्याचा त्रास घराला झालाच ना! पूर्ण कुटुंबींयांना झालाच ना! मला वैयक्तिक वाटतं, कुणाच्या घरापर्यंत जाऊ नये, राजकारण हे दाराच्या बाहेरच असावं. कुणाच्या घरापर्यंत राजकारण हे नेऊच नये. दिवस हे सगळ्यांचे सारखे नसतात. आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो, तेव्हा चार बोट आपल्याकडे असतात. मनस्ताप होतो. राजकारण हे आमच्याच काय पण कुणाच्याही घरापर्यंत नेऊ नये.
दिवसभर राजकीय क्षेत्रामुळे सुरू राहिलेला राबता कसा वाटतो?
आता मला राजकीय क्षेत्राची सवय झाली आहे. गेली ४० वर्षे मी राजकारण पाहते आहे. त्यामुळे या साऱ्याची आता सवय झाली आहे. आता काही वाटत नाही. सुरुवातीला थोडं वेगळं वाटलं. माहेरचं कुणी राजकारणात नसल्यामुळे याची सवय नव्हती. पण आता रुळलंय सगळं. आता चाळीस वर्षांनंतर माघारी वळणार नाही. सारं राजकारण, राजकीय क्षेत्र हे गृहिणी जरी असले तरी गेली ४० वर्ष मी सारं अनुभवतेय.
राजकारणामुळे खासगी आयुष्य असं राहतं का? त्याची किती सल आहे?
सल मनाला बरीचशी आहे. पण आता त्याचं शल्य नाही वाटत. सारं सवयीचं झालं आहे.कारण राजकारणामुळे आपलं आयुष्य हे जनतेसाठी बहाल केलं जातं. राजकारणात वावरताना आपलं आयुष्य हे खासगी असं राहत नाही. खरं तर राजकारण हा माझा पिंड नाही. राणे साहेब आणि माझ्या दोन्ही मुलांमुळे मी राजकारण अनुभवतेय. स्त्री म्हणून माझी आवड राजकारण नाही. पण घरात तीन राज्यकर्त्यांमुळे कधीकधी राजकीय चर्चेत सहभागी देखील होते. राजकारण जाणून त्यांच्यात मिसळून जाते. त्यामुळे शल्य नाही वाटत.
महिलांच्या समस्या कशा सोडवता?
विशेषत: गावी कोकणात गेल्यावर अनेक महिला येऊन भेटतात. आपल्या समस्या मांडतात. माझ्यापरीने त्या सोडवण्याचा प्रयत्न करते.
राणे साहेबांनी लढवलेली पहिली निवडणूक, त्यांचा पहिला विजय आणि त्यावेळचा आनंद? काय सांगाल?
साहेबांची पहिली निवडणूक ही आम्हाला नाविन्याचीच. साहेब जेव्हा नगरसेवक झाले तो आनंद मी विसरू शकत नाही. कारण ते आम्हाला सारं नवीन होतं. चेंबूर सुभाषनगरमध्ये राणे साहेबांनी पहिली निवडणूक लढवली. तो काळ मला नवीनच होता. कोकणात आमदारकीची निवडणूक, जल्लोष अनुभवला. आमदारकीची कामं, त्यांचा व्याप, मंत्रालय हे सारं पाहता... साहेबांचा आजवरचा विजयाचा आणि कारकिर्दीचा चढता आलेख पाहून आजही हा आनंद तितकाच द्विगुणित करणारा ठरला आहे. साहेब मुख्यमंत्री झाले तो आनंदही तितकाच महत्वपूर्ण ठरला आहे. केंद्रीय मंत्रीपदापर्यंत हा आनंदाचा क्षण असाच जपला गेला आहे. तो अखंडपणे...
बाहेर राजकीय चर्चासत्रामध्ये किती सहभागी होता?
मी साहेबांसोबत असते. सहचारीणी म्हणून साहेबांसोबत सतत असते. पण व्यासपीठावर कमी आणि महिलांसोबत जास्त असते. कारण मला त्यांच्या समस्या कळतात. आपुलकीचा क्षण अनुभवता येतो. कोकणातील कार्यकर्ते, महिला इतक्या जिवाभावाच्या आहेत की आम्ही दिसलो तर काही समस्या असतील तर त्या आवर्जून सांगतात. त्यामुळे हे देखील चर्चासत्रासारखेच आहे.
महिला बचत गट, संस्थांच्या माध्यमातून महिलांना कसे पुढे आणत आहात?
मी सुरुवातीला जिजाई महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक बचत गट निर्माण केले आहेत. त्या माध्यमातून अनेक महिला सक्रिय झाल्या. बऱ्याचशा महिलांनी आमच्या संस्थेतून काम केलं. त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठीचे कार्य आजही संस्थेच्या माध्यमातून चालू आहे. कोकण नावाच्या कंपनीतर्फे वस्तूला बाजारपेठ मिळवून दिली जात आहे. कच्चा माल कोकणातीलच आहे. सिझनवाईज जो माल मिळतो, त्यावर प्रक्रिया करून कोकणी पदार्थांचा स्वाद वाढवण्याचा प्रयत्न यामार्फत केला जात आहे. उदा. आंबा, कोकम, जांभळं, कैरी, काजू आदी फळांचा वापर केला जातो, तसेच मसाल्याच्या पदार्थांच्या विक्रीतून मालाला बाजारपेठ मिळवून देणे, आदींच्या माध्यमातून महिलांना सक्रिय केले जात आहे. अनेक महिलांनही रोजगार मिळतो.
कोरोनामुळे झालेली हानी भरून काढता येईल का?
निश्चितच! साहेबांच्या खात्यामुळे स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमुळे काही करता आलं तर प्रयत्न निश्चितच करणार आहे. त्यामार्फत महिलांसाठी ज्या योजना आहेत त्या राबविण्याच्या ठरविल्या आहेत. महिलांना प्रशिक्षण देऊन रोजगार देण्याचा निश्चितच प्रयत्न करून उद्योगधंद्याच्या माध्यमातून महिलांना सक्रिय करणार आहोत.
कोकणातील मुलींना पुढे आणण्यासाठी काही योजना आहेत का?
अनेक कोर्स आहेत. महिलांसोबतच मुलीही पुढे येत आहेत. आर्थिक चणचणीमुळे मुलींचे भवितव्य अंधारात ठेवण्यापेक्षा त्या मुलींना पुढे आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
आपणास राजकारणात यावंस वाटतं का?
नाही. मुळात राजकारण हा माझा पिंड नाही.
महिलांनी राजकारणात यावं का?
जरूर यावं. ज्यांना राजकारणाची आवड आहे, त्यांनी जरूर यावं. काम करण्याची जिद्द ठेवून राजकारणात यावं. राजकारण म्हणजे समाजकारणच आहे. समरसून त्यात उतरण्याची तयारी ठेवून आजच्या महिलांनी राजकारणात यावं.
मनातील एखादा राहिलेला मुद्दा सांगावासा वाटतो का?
निश्चितच! हे जे सरकार आले आहे आताचं, ते मुळात आलं आहे तीन पक्षाचं. पण जे एकमेकांवर आरोप होत आहेत. एखाद्याच्या घरापर्यंत ज्या गोष्टी नेताहेत, या त्यांनी करू नयेत. राजकारणात असणाऱ्यांनी तर करूच नयेत. असं मला स्वत:ला वाटतं. कारण राजकारण, निवडणुका या लोकांचं हित करण्यासाठी लढवलेल्या असतात. आकस मनात ठेवून दुसऱ्यांच्या घरापर्यंत राजकारण नेण्यासाठी निश्चितच नसतात. या साऱ्या गोष्टी मला आता जाणवायला लागल्या आहेत, या वर्षभरात. यापूर्वी असं नव्हतं राजकारण. आरोप - प्रत्यारोप असतात, पण या वर्षभरात हे अति झाले.
कठीण प्रसंगात साहेबांना साथ कशी देता?
शांततेच्या मार्गाने. राणे साहेबांना टेन्शन आलं, माझ्या दोन्ही मुलांना मनस्ताप झाला, टेन्शन आलं तर त्यांना मीडियाला, समाजातील लोकांना फेस करावं लागतं. घरातून एकच सल्ला दिला जातो. शांत राहा! शांत राहूनच साऱ्या समस्यांवर मात करता येते, असं मला वाटतं. खऱ्याला न्याय असतोच!
देवावर श्रद्धा किती आहे?
देवावर पूर्ण श्रद्धा आहे. आज जो साहेबांचा राजकीय कारकिर्दीचा चढता आलेख आहे, तो चढताच राहिला आहे, त्यामागे कुठेतरी परमेश्वर आहे. परमेश्वरच आपल्याला तारतो. चांगलं कर्म करतो, त्याचं फळ चांगलंच मिळतं.
आपलं स्वप्न काय आहे?
स्वप्न माझं असं काही नाही, पण माझ्या दोन्ही मुलांचं निलेश आणि नितेशचं आयुष्य भरभराटीचे जावो, त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि आतापर्यंत राणे साहेबांनी जी काही जनतेची सेवा करण्याची प्रगती केली आहे, त्यात त्यांना यश मिळावं. हेच वाटतं.
कार्यकर्त्यांना काय सांगाल?
साहेबांनी जो काही विकास केला आहे, ज्या निवडणुका येतात, त्या लोकांच्या विकासासाठीच असतात. जेव्हा पद येतात तेव्हाच काम न करता, जेव्हा पद नसतात तेव्हाही काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे. त्याचे इफेक्ट नंतर जाणवतात. पक्ष वर आला की कार्यकर्ताही पुढे येतो. पक्षाचं काम केव्हा वाया जात नाही.
आठवणीतील चांगली घटना कोणती?
राणेसाहेब मुख्यमंत्री झाले ती घटना आणि निलेशला मुलगा झाला, मला नातू झाला तो क्षण.
आयुष्यात न रुचलेला प्रसंग कोणता?
शिवसेनेतून बाहेर पडल्याचा तो प्रसंग. पण आता असंही वाटतं, की तसं झाल्यामुळे बाकीचेही व्यवस्थित झाले. पण चाळीस वर्षांनंतर तो पक्ष सुटला, चाळीस वर्ष हा काळ काही कमी नव्हता.
नवीन पिढीने विशेषत: महिलांनी राजकारणात यावं का?यावं. जरूर यावं. आजच्या महिला सुशिक्षित आहेत. सक्षमपणे, कणखरपणे त्यांनी राजकारणात यावं. जनसेवेची वृत्ती बाळगून नव्या पिढीने जरूर राजकारणात यावं, असं वाटतं.
दरवर्षी वाढदिवस कसा साजरा करता?
आता वाढदिवस हा कार्यकर्त्यांच्या उत्साहाचा विषय झाला आहे. कारण गेली दोन तीन वर्षे कोरोनाच्या अगोदर कोकणात माझा वाढदिवस साजरा केला होता. कार्यकर्ते आणि महिला यांच्याशी एक जिव्हाळयाचे नाते बनले आहे.