डॉ. सर्वेश सुहास सोमण
पुढील काळात शेअर्स खरेदी किंवा विक्री करीत असताना योग्य स्टॉपलॉसचा वापर करूनच व्यवहार करावेत. पुढील काळात निर्देशांकात होणाऱ्या घसरणीत दीर्घ मुदतीसाठी योग्य शेअर निवडून निर्देशांकांची दिशा आणि गती बघून टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
शेअर बाजारात या आठवड्यात बाऊन्स बॅक पहावयास मिळाला. आपण आपल्या मागील १६ मे २०२२ च्या लेखातच अल्पमुदतीसाठी मोठ्या करेक्शननंतर काही काळासाठी शेअर बाजाराच्या घसरणीला ब्रेक लागू शकतो आणि निर्देशांक बाऊन्स बॅक करू शकतात. ज्यामध्ये निफ्टी १६४००, तर बँकनिफ्टी ३४५०० पर्यंत उसळी घेऊ शकतात, असे सांगितलेले होते. आपण सांगितल्यानुसारच शेअर बाजाराने बाऊन्स बॅक केला. निफ्टीने या आठवड्यात १६३९९.८० हा साप्ताहिक उच्चांक नोंदविला. आता जोपर्यंत निफ्टी १५७०० आणि बँकनिफ्टी ३२५००च्या वर आहे, तोपर्यंत निर्देशांकात मोठी घसरण होणार नाही. एलआयसीच्या आयपीओच्या खरेदीला प्रचंड यश मिळाले होते. मंगळवारी १७ मे रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. मात्र या समभागाने मंगळवारी सर्व गुंतवणूकदारांची निराशा केली. या शेअरमध्ये ८ टक्क्यांची घसरण होत समभागाची सुरुवात झाली. प्रारंभिक मार्केटमध्ये ९४९ रुपये किमतीला या समभाग गुंतवणूकदारांना मिळाला होता. जशी अपेक्षा केली जात होती, त्यानुसार मात्र या आयपीओला सूचीबद्ध होताना ओपनिंग मिळाले नाही. या शेअरने ८७२ रुपये किमतीवर सुरुवात केली. त्यानंतर या शेअरने ८६० हा निच्चांक गाठला. पॉलिसीधारकांना यामुळे माफक तोटा सहन करावा लागला. पॉलिसीधारकांना आणि किरकोळ गुंतवणूकदारांना अनुक्रमे ६० रुपये आणि ४५ रुपये सूट देण्यात आलेली होती. त्यामुळे त्यांनी ८८९ आणि ९०४ रुपये किमतीने समभाग मिळविले होते.
देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने सरलेल्या वर्षात विक्रमी महसूल मिळविला. कंपनीने जाहीर केलेल्या निकालात भागधारकांना दोनास एक बक्षीस समभाग (बोनस) आणि प्रति समभाग ३.६० (बोनस – पूर्व) रुपये अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली. सध्या महागाईमुळे सर्वसामान्यांची होरपळ होत आहे. यातच घाऊक महागाई दराचे आकडे या आठवड्यात आले. त्यानुसार महागाई दराने १७ वर्षांतील उच्चांकी पातळी गाठली. खनिज तेल, अन्नधान्य, इंधन, नैसर्गिक वायू इत्यादी किमती मागील वर्षाच्या तुलनेत खूप जास्त वाढलेल्या आहेत. तसेच भारतात व्याजदरासाठी महत्त्वाचा असणारा किरकोळ महागाई निर्देशांकदेखील वाढलेला आहे. रिझर्व बँकेने महागाई आटोक्यात आणण्यासाठी याच महिन्यात रेपोदरात वाढ केलेली आहे. देश विदेशांत सुरू असणाऱ्या प्रतिकूल घटना, वाढत असलेले कच्चे तेल अमेरिकेतील बँकेकडून केलेली व्याजदर वाढ, यात सुरू असलेली विदेशी गुंतवणूकदारांची विक्री या सर्व घटकांचा परिणाम म्हणून रुपयामधील घसरण सुरूच आहे. आपण मागील लेखातच सांगितल्याप्रमाणे महागाईचा भडका आणि व्याजदरात होत असलेली वाढ यातून पुढील काळात अर्थव्यवस्था मंदावण्याची शक्यता आहे.
सध्या अल्प मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकाची गती तेजीची असून दिशा अजूनही मंदीची आहे. त्यामुळे तांत्रिक विश्लेषणानुसार (टेक्निकल अॅनालिसिस) मंदीत असणाऱ्या शेअर्समध्ये अल्पमुदतीचा विचार करता स्टॉपलॉसचा वापर करूनच मंदीचा व्यवहार करता येईल. चार्टनुसार कॉनकॉर, सुप्रीम इंडस्ट्रीज, हनीवेल, डिक्सन टेक्नोलॉजी या शेअर्सची दिशा अल्पमुदतीसाठी मंदीची आहे. आपण मागील लेखात सांगितल्याप्रमाणे शेअर बाजारात या एक महिन्यात मोठे करेक्शन झालेले आहे. याचा परिणामी अनेक दिग्गज शेअर्समध्ये देखील जवळपास २० ते ३० टक्क्यांची त्यांच्या उच्चांकापासून घसरण झालेली आहे. शेअर बाजारात झालेली मोठी घसरण ही दीर्घमुदतीसाठी चांगली संधी आहे. त्यामुळे आपण आपल्या लेखात सांगितलेल्या “एचडीएफसी एएमसी” याचा गुंतवणुकीसाठी विचार करता येईल. कच्चे तेल अजूनही तेजीत असून जोपर्यंत कच्चे तेल ८१०० या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत कच्च्या तेलात आणखी वाढ होऊ शकते. या आठवड्यात सोन्यात देखील घसरण झालेली आहे. त्यामुळे अल्पमुदतीसाठी सोने या मौल्यवान धातूची दिशा आता मंदीची झालेली असून अल्पमुदतीच्या चार्टनुसार जोपर्यंत सोने ५१५०० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत सोन्यात मोठी वाढ होणार नाही. निर्देशांकानी मोठ्या मंदीचे संकेत दिलेले असल्यामुळे पुढील काळात शेअर्स खरेदी किंवा विक्री करीत असताना योग्य स्टॉपलॉसचा वापर करूनच व्यवहार करावेत. पुढील काळात निर्देशांकात होणाऱ्या घसरणीत दीर्घमुदतीसाठी योग्य शेअर निवडून निर्देशांकांची दिशा आणि गती बघून टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे