विनायक बेटावदकर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली अडीच-तीन वर्षे लॉकडाऊनच्या बंधनांमुळे लहान मुले घरातच अडकून पडली होती. या काळात काही शाळा पूर्णवेळ बंद होत्या, तर काहींनी ऑनलाइन शाळांचा प्रयोग करून मुलांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. या वर्षी मात्र अशी कोणतीही बंधने नसल्याने एप्रिल, मे महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्र सेवा दल, कोकणातील माणगावजवळील वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, शिवाय कोल्हापूर, नाशिक, पुणे तसेच राज्याच्या अन्य भागातही मोठ्या प्रमाणात उन्हाळी शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले दिसते. त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे.
सामान्यत: पाच दिवस ते पंधरा दिवस असा हा शिबिरांचा कालावधी असतो. अशा शिबिरातून मुले कोणती असावीत, त्यांची फी किती असावी, त्यात नेमके कोणते शिक्षण असावे, यावर कोणतेही बंधन नाही. ‘व्यक्ती विकास शिबीर’ या नावाने त्यांचे आयोजन केले जाते, त्यात काही ध्येयवादी किंवा क्रीडा क्षेत्रातील मंडळींचा मार्गदर्शक म्हणून मोठा सहभाग असतो. काही शिबिरांतून मात्र पैसे कमावण्याचा एक मार्ग म्हणून पाहिले जाते. ते योग्य नाही. मुलांना आकर्षणे वाटावे म्हणून घोडेस्वारी, रॅप्लिंग, पोहोणे अशी आकर्षणे दाखवली जातात. काही संस्था, संघटना आपापल्या ध्येय धोरणाचा प्रसारही करतात. त्यात काही वावगे आहे, असेही म्हणता येणार नाही.
शिबिरातून शिकवले जाणारे विषय प्रामुख्याने मुलांचे वयोगट पाहून ठरवले जात असले तरी त्यात मैदानी खेळ, योगासने, एरोबिक्स लेझीम, समूहगीते, निसर्गाची ओळख, पर्यावरण, ओरोगामी, चित्रकला, अंधश्रद्धा निर्मूलन, आकाशदर्शन, आरोग्य याबरोबरच समाजपरिवर्तनाचे निरनिराळे प्रयोग केले जात आहेत. गरीब-श्रीमंत यांतील दरी दूर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पण मूळ प्रश्न असा आहे की, घोडेस्वारीचा या शिबिरार्थींना आयुष्यात काय उपयोग आहे? गृह सोसायट्यांमध्ये राहणारी मुले शहरात घोडेस्वारी करणार आहेत का? तेव्हा शिबिरात शिक्षण देताना मुलांना त्या शिक्षणाचा घरात, समाजात निश्चित काही उपयोग होईल का, या दृष्टीने विषयांची निवड करणे महत्त्वाचे आहे. सध्याच्या परिस्थितीत तरुण शिबिरार्थींना आपत्ती निवारण्याचे शिक्षण देणे महत्त्वाचे वाटते.
पूर्वी म्हणजे ५०-६० वर्षांपूर्वी २० दिवसांच्या शिबिराला २० ते २५ रु. फी असे. त्यात बौद्धिक मार्गदर्शनासाठी सामान्यत: राजकीय कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक असत. ते शिबिरार्थीना देशप्रेम, राजकारण समजावून देत, त्यामुळे शिबिरार्थींचे सामान्य ज्ञान वाढे, त्यांना राजकारणाचा परिचय होत असे. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. आजचे राजकारण शिबिरार्थींसाठी कितपत योग्य आहे? त्यातून शिबिरार्थी काय शिकणार? आणि त्याचा त्यांना समाजासाठी काय उपयोग होणार? हा प्रश्नच आहे.
कल्याणात राष्ट्र सेवा दल संघटनेने आयोजित केलेल्या शिबिरात ग्रामीण भागातील मुले, श्रमजीवी, वंचितांची मुले आणि शहरात राहणारी मध्यमवर्गीय मुले यांचे ग्रामीण भागातच गोवेली येथे शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरात इतर कार्यक्रमांबरोबर भारताचा थोडक्यात इतिहास, स्वातंत्र्यवीरांचे योगदान, आपले पर्यावरण, बुवाबाजी, अंधश्रद्धा, मी माझे कुटुंब-नाते संबंध, जीवनात वाचनाचे महत्त्व, मोबाइलची व्यसनमुक्ती, आपले आरोग्य, अभ्यास कसा करावा, याबरोबरच विज्ञानाचे महत्त्व असे विषयही जाणकार व्यक्तींकडून बौद्धिक रूपाने शिकवले जाणार आहेत. त्यात वंचित मुलांना सहजीवनाचे धडे हा प्रयोग जसा महत्त्वाचा मानला जात आहे, त्याचप्रमाणे सेवादलाच्या काही शिबिरात आपत्ती निवारणाचे प्राथमिक शिक्षणही दिले जाणार आहे. सुहास कोते, विशाल जाधव, करुणा कल्याणकर, भिकू बारस्कर, विनय ताटके (शिबीर प्रमुख) काळन, घोद्विंडे, सुजाता शिर्के, सबुरी पांचाळ, प्रा. मीनल सोहोनी, अनुपकुमार पांडे अशी सामाजिक क्षेत्रातली अनेक मंडळी या उपक्रमांमध्ये सहभागी झालेली दिसत आहेत.
आजच्या मुलामुलींच्या आवडी-निवडी बदलल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यात चिडचिडेपणा आला आहे. घरच्या खाद्य पदार्थांपेक्षा बाहेरील चटपटीत खाणे त्यांना अधिक आवडते. आरोग्याच्या दृष्टीने ते योग्य नाही. हे मुलांना समजावून देण्याचा महत्त्वाचा प्रयत्न येथे केला जाणार आहे. शिबिरातून सकस आहार, भोजन यांची विशेष व्यवस्था केली असल्याने नेहमींच्या रुटिन शिबिरांपेक्षा हे शिबीर अधिक महत्त्वाचे मानले जात आहे. शिबिरानंतर शिबिरार्थींचा पाठपुरावा करून त्यांना निरनिराळ्या कार्यक्रमातून संस्था, संघटनांनी आपल्या संपर्कात ठेवणे महत्त्वाचे असते. आजच्या परिस्थितीत असा संपर्क राखला जात नसल्याने मुलांना शिबिराचा उपयोग होतोच असे नाही, याचा शिबीर आयोजकांनी विचार करून शिबिराचे आयोजन करणे महत्त्वाचे आहे.