Saturday, October 5, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरकर्जतच्या वैभवात भरटाकणाऱ्या टेकड्या दृष्टीआड

कर्जतच्या वैभवात भरटाकणाऱ्या टेकड्या दृष्टीआड

  • खासगी टेकड्यांच्या जागी सिमेंट कॉंक्रीटच्या इमारती
  • शासकीय टेकड्या अस्तित्व टिकवून

ज्योती जाधव

कर्जत : शहर परिसरात टेकड्या असलेले असे हे कर्जत शहर. या टेकड्यांमध्ये काही टेकड्या शासकीय मालकीच्या तर काही खासगी. वाढत्या नागरिकरणामुळे या खासगी टेकड्यांवर मोठमोठी गृहसंकुले, टॉवर उभारणीसाठी विकासकांनी जेसीबीच्या साह्याने या टेकड्या उत्खनन करत भुईसपाट केल्या, तर काही करण्यात येत आहेत. त्यामुळे कधीकाळी हिरवाईने नटलेल्या कर्जतच्या वैभवात भर टाकणाऱ्या या टेकड्या आज दृष्टीआड झाल्या आहेत.

शहराच्या चारही बाजूस वेताळ टेकडी, खिंडीतील टेकडी, तहसीलदार टेकडी, कृषी टेकडी, फादर टेकडी अशा टेकड्या होत्या. सद्यस्थितीत खासगी जागेवरील टेकड्या नामशेष झाल्या आहेत आणि फक्त शासकीय जागेवरील थोड्याफार टेकड्या अस्तित्व टिकवून आहेत. मात्र त्यांच्याही पायथ्याची माती काढण्यासाठी अवैधरित्या खोदकाम करण्यात येत असल्याने त्यांचीही धूप होऊन त्याही पुढील काही वर्षांत आपले अस्तित्व हरवून बसतील, अशी भीती पर्यावरणप्रेमींना वाटते.

रेल्वे स्थानकालगतची तहसीलदार टेकडी ही तेथे असणाऱ्या ब्रिटिशकालीन वास्तू आणि त्यात थाटलेल्या शासकीय कार्यालय, कारागृहामुळे शाबूत आहे. याच टेकडीवर शहराला पाणीपुरवठा करणारी पाण्याची मोठी टाकी आहे.पूर्वी शहरात कोणाकडे पाहुणे आले की, त्या पाहुण्यांना फिरायला नेण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे ही तहसीलदार टेकडी. आता मॉर्निंग वॉक असो की इव्हिनिंग वॉक असो यासाठी तहसीलदार टेकडी उत्तम पर्याय. या टेकडीवरून पूर्वेकडे पाहिले, तर दूरवर पसरलेली कृषी संशोधन केंद्राची हिरवीगार शेती, त्यापुढे उल्हास नदी आणि पश्चिमेस नजर टाकली की रेल्वेमार्ग, भिसेगावच्या अंबामातेचे मंदिर, सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे दर्शन होते.

अशाच टेकड्या भिसेगाव, गुंडगे, दहिवली या भागातही होत्या. मात्र त्या खासगी मालमत्तेत आहे. गृहसंकुले उभारणीसाठी विकासकांनी जागामालकांना रग्गड पैशांचा मोबदला मोजत या टेकड्या त्यांच्याकडून खरेदी करत भुईसपाट केल्या आणि तिथे भले मोठे टॉवर उभारले जात आहे. कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाला अडथळा ठरणाऱ्या तसेच बोगदे तयार करण्यासाठी त्या परिसरातील टेकड्यांचे उत्खनन करण्यात आले आहे.

पर्यावरणाला हानी …

या टेकड्यांवरून मोठ्या प्रमाणात वाहून येणाऱ्या पाण्यामुळे तळपायथ्याशी असलेल्या परिसरातील विहिरींना बारा महिने मुबलक पाणी असायचे. मात्र आता या टेकड्याचे नामशेष होत असल्याने तेथील नैसर्गिक जैवविविधता नष्ट झालीच. त्याचबरोबर पाण्याचे स्रोतसुद्धा संपुष्टात आले.

तहसीलदार टेकडीची मोठ्या प्रमाणात धूप होत होती. याची दखल घेत मी आणि किरण ओगले यांनी या टेकडीवर वृक्षारोपण केले. त्याची नियमित देखभाल ठेवली. आमच्या या वृक्षलागवड उपक्रमात अनेक नागरिक, पर्यावरणप्रेमी सहभागी झाले असून त्या सर्वांच्या मदतीने या टेकडीवर वनराई बहरविण्यात आम्ही यशस्वी झालो. – राजू पोतदार, पर्यावरणप्रेमी, कर्जत

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -