सुवर्ण काळांचे साक्षीदार असलेल्या या चाळींच्या जागी आता टोलेजंग, उत्तुंग गगनचुंबी इमारती उभ्या राहात आहेत. त्या पार्श्वभूमीवर या चाळींच्या इतिहासाचा ठेवा जतन करणे गरजेचे आहे…
दीपक परब
सर्वांनाच म्हणजे देशातीलच नव्हे तर जगभरातील कुठल्याही नागरिकाला आकर्षण वाटावे, असे शहर म्हणजे आपल्या देशाची आर्थिक राजधानी मुंबई. या मुंबापुरीचा विविधांगी इतिहास जितका रंजक तितकाच तो सर्वांसाठी अभ्यासपूर्ण, कित्येकांसाठी मार्गदर्शक ठरावा असा असल्याने त्याबाबतची माहिती गोळा करून पुढच्या पिढीसाठी त्याची जपणूक करणे महत्त्वाचे आहे. नेमकी हीच बाब हेरून राज्याचे संवेदनशील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण राज्यमंत्री यांच्या कल्पकतेतून आणि मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाने, मोहक, अकर्षक आणि सर्वांसाठी वाचनीय आणि नावाला साजेसे ठरावे असे ‘चाळींतले टॉवर’ हे ‘कॉफी टेबल बुक’ तयार केले असून त्याचे सर्वार्थाने कौतुक होणे क्रमप्राप्त आहे. स्वातंत्र्यपूर्व काळ असो वा स्वातंत्र्योत्तर किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा काळ या सर्व सुवर्ण काळांचे साक्षीदार असलेल्या या चाळींच्या जागी आता टोलेजंग, उत्तुंग गगनचुंबी इमारती उभ्या राहात आहेत. त्या पार्श्वभूमीवर या चाळींच्या इतिहासाचा ठेवा जतन करण्यासाठी हे ‘कॉफी टेबल बुक’ एक माध्यम ठरले आहे हे निश्चित. मुंबईच्या जडणघडणीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे व ज्या आता काळानुरूप हळूहळू काळाच्या पडद्याआड जाणार आहेत, ज्यांचे अस्तित्वच आता पुसले जाणार आहे, त्या चाळींचा गौरवशाली इतिहास तसेच ज्या महनीय व्यक्तिमत्त्वांच्या वास्तव्यामुळे पुनित झालेल्या चाळींबरोबरच तेथे घडलेल्या सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा घटनांचा मागोवा कमीत कमी आणि तितक्याच परिणामकारकपणे घेण्यात आला आहे. या ‘कॉफी टेबल बुक’मधील छायाचित्रांमुळे एकूणच मांडणीला चार चांद लागले आहेत, असेच म्हणावे लागेल.
मुंबईमध्ये एकेकाळी झालेल्या विविध चळवळींमध्ये या चाळींनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विविध आंदोलनात काही चाळी आघाडीवर राहिलेल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि कालांतराने औद्योगिकीकरणानंतर महानगरी मुंबईतील वाढत्या लोकसंख्येला निवारा देण्यासाठी अनेक चाळी उभारण्यात आल्या. अगदी कुलाबा, भायखळा, लालबाग, परळ, नायगाव, दादर, गिरगाव या परिसरात या चाळींचा उदय झाला आणि याच चाळींमधून विशेषत: त्यावेळी उभ्या राहिलेल्या गिरण्या, छोटे – मोठे कारखाने यांना लागणारे कुशल, अकुशल कामगार आणि कचेऱ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पुरवठा होऊ लागला. याच लोकांमधून मुंबईला एक वेगळी संस्कृती लाभली. कुटुंबाबरोबरच सर्व समाजासाठी झटणारा एक मध्यमवर्गीय चेहरा मिळाला. अवघ्या समाजाचे आणि वेळोवेळी काळानुरूप उभ्या राहणाऱ्या चळवळींचे आभाळ आपल्या कार्यकर्तृत्वाने पेलणारी व्यक्तिमत्त्वे तर याच वास्तूंमधून जन्माला आली. या थोर व्यक्ती, समाजसुधारक, क्रांतिकारक, साहित्यिक, शाहीर, कवी, कलावंत, क्रीडापटू तसेच व्यापारी-उद्योजक यांच्या रूपाने या चाळींमधून महान झाली. या चाळींविषयीच्या ऐतिहासिक मूल्यांचा उलगडा करणाऱ्या ‘चाळींतले टॉवर’ या कॉफी टेबलच्या बुकच्या माध्यमातून करण्यात आली आहे. कॉफी टेबल बुकमधील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे त्यात अंतर्भूत करण्यात आलेली लक्ष्यवेधी छायाचित्रे. तसेच चाळींची संस्कृती छायाचित्रांतून दिसावी आणि त्याद्वारे चाळींमध्ये छायाचित्रात्मक डॉक्युमन्टेशन व्हावे या हेतूने सदर ‘कॉफी बुक’ची मांडणी करण्यात आली आहे. मुंबईच्या चाळी या खरोखरीच मुंबईचे वैभव आहेत. मुंबईच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाचा घटक असलेल्या या चाळींमध्ये अनेक थोर व्यक्ती जन्मल्या, वाढल्या, त्यांनी समाजाला दिलेल्या योगदानाचा, ऐतिहासिक घटनांचा या चाळी खऱ्या अर्थाने साक्षीदार आहेत. चाळींच्या या सामाजिक जीवनाचा वारसा शब्दबद्ध करावा, असा विचार राज्याचे संवेदनशील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मांडला आणि त्यातून ‘चाळींतले टॉवर’ या नेत्रदीपक अशा कॉफी टेबल बुकची निर्मिती करण्यात आली आहे.
तसेच म्हाडाचे विविध उपक्रम आणि प्रकल्प यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले यांची मोलाची कामगिरी आहे. ही मांडणी दोन पातळ्यांवर करण्यात आली आहे. ती म्हणजे ‘चाळी’ आणि त्यातील ‘उत्तुंग चाळकरी’. या पुस्तकामध्ये काही २५ महनीय ‘चाळकरी’ व्यक्तिमत्त्वांची माहिती, त्यांची दुर्मीळ पोट्रेट्स आणि ते ज्या चाळीत वास्तव्यास होते, अशा चाळींची छायाचित्रे समाविष्ट आहेत. त्यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार केशव ठाकरे, थोर साहित्यिक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, लोकनेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे, महाराष्ट्रभूषण पु. ल. देशपांडे, ज्येष्ठ साहित्यिक नामदेव ढसाळ, कवी मंगेश पाडगावकर, क्रिकेट विश्वातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व सुनील गावस्कर, उद्योगपती धीरुभाई अंबानी अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. या ‘कॉफी टेबल बुक’च्या निमित्ताने समाजातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वांची माहिती, त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या चाळींचा संग्रह किंवा सरकारी दस्तावेज यानिमित्ताने का होईना प्रथमच तयार झाला आहे.
देशाचा धगधगता स्वातंत्र्यपूर्व काळ असो वा उभारी घेणारा स्वातंत्र्योत्तर काळ किंवा त्यातच उभी राहिलेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, या सतत तेवत राहणाऱ्या काळात मुंबईमध्ये झालेल्या विविध चळवळींमध्ये या चाळींनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. विशेषत: विविध आंदोलनांमध्ये काही चाळी, तर आघाडीवर राहिलेल्या आहेत. अशा चाळींचा आढावा घेणारे ‘आंदोलनातील चाळी’ असे एक प्रकरणही या पुस्तकात देण्यात आले आहे. ‘बीआयटी’ आणि ‘बीडीडी’ चाळी यांना मुंबईतील कामगार विश्वात महत्त्वाचे स्थान आहे. त्या चाळींचा इतिहास हा मुंबईच्या एका कालखंडाच्या इतिहासाचाच भाग आहे. तो सर्व रंजक इतिहास सांगणारे स्वतंत्र प्रकरण या पुस्तकात आहे. त्याशिवाय पु. ल. देशपांडे, तसेच पठ्ठे बापूराव यांनी मराठी साहित्यात अजरामर केलेली बटाट्याची चाळ, मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणारी केशवजी नाईक चाळ, स्वातंत्र्याच्या तसेच सयुंक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये नेहमीच आघाडीवर राहणारी, या संघर्षाला सर्वतोपरी रसद पुरवणारी जगन्नाथ चाळ, लक्ष्मी कॉटेज चाळ यांची माहिती या पुस्तकात देण्यात आलेली आहे; तसेच गिरणगावची संस्कृती पेलून धरणारी रंगारी बदक चाळ, तेजुकाया मॅन्शन, राष्ट्रीय विचारांनी भारून गेलेली पूर्वाश्रमीची लखू इराण्याची आणि आताची केरमानी ही ‘व्ही’ आकाराची चाळ यांचा इतिहासही जागविण्याचा प्रयत्न येथे करण्यात आला आहे. तसेच या पुस्तकातील सर्व माहिती ही पूर्णतः तथ्यांवर आधारित आहे. त्याकरिता रिसर्च टीमकडून संशोधनाची प्रामुख्याने दोन साधने वापरली गेली आहेत. एक म्हणजे इतिहासाच्या पुस्तकांतून, चरित्रे वा आत्मचरित्रे यांतून, तसेच जुन्या लेखांतून संदर्भ संपादन केले आहेत.
त्याचबरोबर जुन्या – जाणत्या लोकांशी संवाद साधून व अन्य मार्गाने, मौखिक इतिहासातून आवश्यक ती माहिती घेण्यात आली आहे. त्यासाठी अभ्यासक टीमने सर्व संबंधित असलेल्या त्या-त्या चाळींना प्रत्यक्ष भेट देऊन, तेथील जुन्या लोकांकडून माहिती घेण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर चाळींविषयीच्या अभ्यासकांकडून सर्व संदर्भांची खात्री करून घेण्यात आली आहे. एकूणच सर्व माहिती ही खात्रीलायक स्रोतांवरच आधारलेली असल्याने ऐतिहासिकदृष्ट्या हा एक बहुमोल ठेवा ठरेल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यायोगे सामान्य वाचक, रसिकांप्रमाणेच मुंबईच्या अभ्यासकांनाही हे पुस्तक खूपच उपयुक्त ठरू शकेल. या सर्व गोष्टींचा विचार केल्यास हे ‘चाळींतले टॉवर’ गगनाला अन् मनालाही भिडणारे ठरले आहे.