Sunday, January 19, 2025
Homeसाप्ताहिककोलाजबहुविध सांस्कृतिक मेलबर्न

बहुविध सांस्कृतिक मेलबर्न

कोरोनाच्या दोन वर्षांच्या बंदिवासानंतर पर्यटन व्यवसाय नव्याने सुरू झाल्यानिमित्त हा पर्यटन लेख…

मृणालिनी कुलकर्णी

स्वआयोजित करून वीस दिवसांत ऑस्ट्रेलियातील पाच शहरांना भेट दिली. मेलबर्न व्हिक्टोरिया राज्याची राजधानी असून हे शहर फिलिप बे खाडीच्या किनारपट्टीवर व्यापलेले आहे. मेलबर्न हे ऑस्ट्रेलियातील श्रीमंत, सर्वात गतिमान, दोलायमान असलेले मेट्रोपॉलिटियन शहर! ऑस्ट्रेलियन शैलीतील युरोपियन शहर. राहण्यास योग्य कारण पायाभूत सुविधात दळणवळणासाठी ट्रामचे नेटवर्क उत्तम, अनेकविध रेस्टारंट, बाजारपेठा, प्रशस्त हिरवीगार उद्याने, चांगले रस्ते, बहुविध सांस्कृतिक विविधता. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडसहित फुटबॉल-टेनिससाठी शेकडो क्रीडा मैदाने, जलतरण तलाव; अनेक आर्टगॅलरी, थिएटर, संग्रहालय, कसिनो, शॉपिंग इ. ग्रेट ओशन रोड/पेंग्विन परेडसाठी येणाऱ्या पर्यटकांमुळे मेलबर्न हे आर्थिक उलाढालीचे प्रमुख केंद्र आहे. यारा नदी मेलबर्न शहराचे साऊथ बँक परिसर आणि सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट (सीबीडी) अशा दोन भागांत विभाजन करते.

केन्सवरून विमानाने पुढे टॅक्सीने तिन्हीसांजेला (३१ ऑक्टोबर २०१९) ‘६४, वेलिंग्टन स्ट्रीट येथे आरक्षित केलेल्या एअर बीएनबीच्या जागी पोहोचलो. विशेष म्हणजे आमचे वय आणि वेळ पाहून टॅक्सी ड्रॉयव्हर स्वतःहून थांबला होता. बाहेरचे गेट उघडेना. काही प्रयत्नांनी ड्रॉयव्हरने ते उघडले.

सर्व सोयींनी युक्त एक स्वच्छ रूम. आवश्यकतेपेक्षा जास्त अतिशय उच्चप्रतीच्या वस्तू, भरपूर खाणे ठेवले होते. दुसऱ्या दिवशी लवकरच नाश्ता करून जवळच्या ट्राम स्टेशनवर गेलो. ट्राम स्टेशनवर तिकीट घर किंवा मशीन काहीच दिसेना. जेथे जाल तेथे भारतीय भेटतोच. ट्राम-बससाठी असलेला (माय्की) पास ठरावीक दुकानातच मिळतात. ट्राम ड्रायव्हरच्या सहिष्णुतेमुळे पास काढण्यासाठी विनातिकीट प्रवास केला. बंगलोरची युवती सोबत असल्याने सोपे गेले.

पेंग्विन परेड आणि ग्रेट ओशन रोड या टूरच्या बुकिंगसाठी आम्ही मेलबर्न शहराच्या मध्य भागात (सीबीडी) फिल्डर्स स्ट्रीट रेल्वे स्टेशन येथे आलो. हे रेल्वे स्टेशन मेलबर्नचे टर्मिनस म्हणून ओळखले जाते. संपूर्ण ऑस्ट्रेलिया शहरातील पहिले रेल्वे स्टेशन. इमारतीचे स्थापत्य लक्ष वेधून घेते. मुख्य प्रवेशाच्या वरच्या बाजूला असलेली १३ घड्याळे, उपनगरीय ट्रेनचे प्रस्थान दाखविते. ‘मीट मी अंडर क्लॉक्स’ ही भेटण्याची खूण. फिल्डर्स स्ट्रीट रेल्वे स्टेशनचे प्रवेशद्वार बऱ्याच ब्रोशरवर पाहायला मिळते.

बुकिंग ऑफिसचा शोध घेता, तिकीट दर जास्त वाटल्याने सवलतीसाठी पुन्हा चौकशी चालू होती. ऑस्ट्रेलियन टुरिझम विभागाचे लाल ड्रेस परिधान केलेले स्वयंसेवक जागोजागी मदतीस तत्पर असतात. त्यातील एकाकडून हाफ तिकीट ऑफिसचा पत्ता मिळाला. त्यांची माहिती बरोबर होती. सवलतीचे तिकीट फक्त कॅशने मिळते, कार्ड चालत नाही. चौकशीचा वेळ सार्थकी लागला.

फिल्डर्स स्टेशनपासून ‘सिटी सर्कल ट्राम’. वातानुकूलित नसलेली ही ट्राम, पर्यटकांना विनामूल्य मेलबर्न शहराचे दर्शन घडविते. फिल्डर्स स्टेशच्या समोरच मेलबर्न शहराचा अविभाज्य भाग, एक प्रमुख मध्यवर्ती सार्वजनिक खुला चौक,’ फेडरेशन स्क्वेअर.’ अतिशय गजबजलेला तरीही चैतन्यमय परिसर. येथे नेहमीच ईव्हेंट्स, परफॉर्मिंग चालू असते. बाजूच्या मोठ्या पडद्यावर ते सारे पाहतात. याच भागात, जगभरातील मोशन पिक्चर जतन आणि प्रदर्शन करणारी ‘ऑस्ट्रेलियन सेन्टर फॉर मुव्हिंग इमेजची वास्तू, येथेच NGV चे इयान पाल सेंटर दालन, हे केवळ स्थानिक ऑस्ट्रेलियन कलाकारांसाठी उपलब्ध असते. सारी प्रदर्शने बघायला विनामूल्य.

खरेदीसाठी अतिशय प्रसिद्ध, फॅशनेबल क्षेत्र ‘कॉलिन्स स्ट्रीट.’ गल्लीबोळातून फिरताना मजा आली. आम्ही फक्त आनंद घेतला आणि ऑस्ट्रेलियन चॉकलेट खूप घेतली. याच शॉपिंग भागात तीन बस स्टॉपसाठी ट्रामला तिकीट नाही. ‘फ्री ट्राम झोन’. कितीही वेळा चढा, उतारा नि शॉपिंगसाठी दुकानात जा. उत्कृष्ट खाद्याच्या बरोबरीने ऑस्ट्रलिया, कॉफी आणि कॅफे संस्कृतीसाठी प्रसिद्ध. शिणवटा घालविण्यासाठी कॉफी घेत कितीही वेळ बसा. कॉलिन्स स्ट्रीटवरील ऐतिहासिक ‘रॉयल आणि ब्लॉक ऑर्केड लेन पाहाच. येथील दुकाने जुन्या कलाकुसर दागिन्यांसाठी प्रसिद्ध. या ऑर्केडचे फ्लोरिंग, कमानदार उंच रंगीत काचेचे छत तेही आतून प्रकाशमान आहे.

खाद्य पदार्थासाठी मेलबर्नची महत्त्वाची खूण, सर्वाधिक लोक तेथे जातातच ते “क्वीन्स व्हिक्टोरिया मार्केट.” सर्वात जुने ओपन एअर मार्केट. ताज्या खाद्यपदार्थांच्या उत्पादनाचे किरकोळ आणि घाऊक विक्री केंद्र.

भारतीय जेवण घेऊन सेंट किल्डा रोडवरील मेलबर्न आर्ट सेंटरमधील (हॅमर हॉल) थिएटर-संगीताच्या स्वागत कक्षेत प्रवेश करताच अवाक् झाले. उठावदार रेड कार्पेट, लालचुटूक रंगाचे उच्चभ्रू काटकोनी सोफे, त्याचे आरशात दिसणारे प्रतिबिंब, सोनेरी रंगाचे पिलर्स, कधी नव्हे तो स्वतःचा प्रतिमेसहित फोटो काढला.

साऊथ बँकमधील किल्डा रोडवर, जगभरातील प्रतिभावंत कलाकारांच्या कलाकृतीसाठी, सर्वात मोठे, जुने कलादालन “NGV”. मुख्य प्रवेशातून आत जाताना गोलाकार प्रवेशात काचेच्या आतून-वरून खाली येणारे पाणी आणि बाहेरील दोन्ही बाजूस आयताकृती बसण्यासाठी कठडा असलेला तलाव. भिंतीवर कलाकेंद्राचे नाव “नॅशनल गॅलरी ऑफ व्हिक्टोरिया” जे NGV नावाने प्रसिद्ध आहे. प्रवेश करताच KAWS चे काळ्या रंगाचे शिल्प. काहीच समजले नाही. वरती पेंटिंग्सचे प्रदर्शन पाहून कॉफी घेऊन प्रसन्नपणे बाहेर पडलो. गुगलवरून समजले, KAWS हे अमेरिकन ग्राफिटी कलाकार आणि डिझायनर, जे त्यांच्या खेळणी पेंटिंग्ससाठी ओळखले जातात. यारा नदीकिनारी, संध्याकाळी, सुट्टीच्या दिवशी वेळ घालविण्यासाठी त्या परिसरात, क्रूझ बोटीवर लोक फिरायला येतात. आम्ही सकाळपासून सीबीडी आणि यारा नदी परिसरात फिरलो. यारा नदीच्या समुद्रकिनारी ७ वॉकर पुलाला चाैथ्या दिवशी सकाळी धावती भेट दिली. पलीकडील साऊथ बँक परिसरात कार्यालयाच्या उंच इमारती, मॉल, लांबूनच मेलबर्नचा युरेका स्काय डेकपाहून लहान उद्योजकाच्या स्टॉलवर द्वितीसाठी गिफ्ट घेऊन भारतात येण्यासाठी माघारी फिरलो. असे हे बहुविध सांस्कृतिक मेलबर्न!!

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -