Sunday, July 14, 2024
Homeक्रीडाशेवट गोड करण्यासाठी हैदराबाद, पंजाब उत्सुक

शेवट गोड करण्यासाठी हैदराबाद, पंजाब उत्सुक

लीग टेबलमधील शेवटच्या सामन्याचा आज थरार

मुंबई (प्रतिनिधी) : वानखेडे स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज या दोन संघांमध्ये लीग टेबलमधील शेवटचा सामना होणार आहे. दोन्ही संघ यापूर्वीच प्लेऑफच्या स्पर्धेबाहेर आहेत. त्यामुळे, ते विजयासह मोसमाचा शेवट करण्याचा प्रयत्न करतील. आयपीएलमध्ये दोन्ही संघ १९ वेळा आमनेसामने आले आहेत. हैदराबादने १३ वेळा विजय मिळवला आहे. दरम्यान, पंजाबने ६ वेळा विजय मिळवला आहे. या मोसमात आधीच्या सामन्यात हैदराबादने पंजाबचा सात गडी राखून पराभव केला होता. तसेच गत सामन्यात ऑरेंज आर्मीने मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना थोडक्यात जिंकला होता. पण रविवारच्या सामन्यात आपल्या मुलाच्या जन्मासाठी न्यूझीलंडला परतलेला कर्णधार केन विल्यमसन खेळणार नाही. त्याच्या जागी ग्लेन फिलिप्स प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची शक्यता आहे. विल्यमसनच्या जागी, भुवनेश्वर कुमार किंवा यष्टीरक्षक निकोलस पूरन या सामन्यात कर्णधाराची भूमिका बजावू शकतात.

दुसरीकडे, पंजाब किंग्जचा हंगाम चढ-उताराचा होता आणि आजच्या विजयामुळे ते पॉइंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर पोहोचू शकतात. कर्णधार मयंक अग्रवाल धावांसाठी संघर्ष करत आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात जॉनी बेअरस्टो आणि शिखर धवन डावाची सुरुवात करताना दिसू शकतात तसेच भानुका राजपक्षे व अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोन हे फलंदाजीचा महत्त्वाचा भाग असून ते संघाला संतुलन प्रदान करतात. पंजाबसाठी गोलंदाजी विभागात अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा आणि राहुल चहर यांनी आयपीएल २०२२ मध्ये आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या गोलंदाजांव्यतिरिक्त संदीप शर्मा पॉवरप्लेमध्ये किफायतशीर ठरला आहे. दुसरीकडे, कागिसो रबाडा पंजाब किंग्जकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे.

हैदराबादसाठी राहुल त्रिपाठी, एडन मार्करम आणि निकोलस पूरन फलंदाजीमध्ये मुख्य आधार असून महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. हैदराबादकडे उमरान मलिकचा वेग, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन आणि मार्को जॅनसेन यांची दबावाखाली गोलंदाजी करण्याची क्षमता, असा किफायतशीर गोलंदाजी विभाग आहे. एकंदरीत पाहता दोन्ही संघ यापूर्वीच बाहेर गेले असल्याने रविवारी फक्त औपचारिकता म्हणून खेळत असले तरी विजय मिळवून आयपीएल २०२२ चा शेवट गोड करण्याचा प्रयत्न करतील.

ठिकाण : वानखेडे स्टेडियम वेळ : रात्री ७.३०

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -