Monday, July 22, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखदिशाहीन वाटचाल

दिशाहीन वाटचाल

सुकृत खांडेकर

कॉंग्रेसने आजवर आपल्याला खूप काही दिले, आता पक्षाला परतफेड करण्याची वेळ आली आहे, असे भावनिक आवाहन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांना केले आहे. भाजपचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय क्षितिजावर उदय झाल्यापासून काँग्रेसची वेगाने घसरण सुरू झाली. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि परत सोनिया गांधी यांच्याभोवतीच पक्षाचे अध्यक्षपद फिरत आहे. पुन्हा राहुल यांनाच अध्यक्ष करा म्हणून पक्षात एका गटाचा आग्रह चालूच आहे. मधूनमधून प्रियंका यांचे नाव पुढे येत आहे. एकाच परिवारात पक्षाचे सर्वोच्च पद वर्षानुवर्षे खो खो खेळत आहे. पक्षाने आपल्याला खूप काही दिले, त्याची परतफेड आता आपल्या घरापासून सुरू करू या, असे गांधी परिवाराला वाटायला पाहिजे, पण पक्षाच्या लाभार्थी नेत्यांनाच ते आवाहन करीत आहेत. राजस्थानमधील उदयपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात विश्वास संपादन करण्यासाठी थेट जनतेत जाण्याचा संकल्प करण्यात आला. भाजपचा अश्वमेध २०१४ पासून देशभर धावू लागला तेव्हापासून काँग्रेस सैरभैर झाली. एकापाठोपाठ राज्ये काँग्रेसला गमवावी लागली आणि ओसाड गावचे पाटील अशी गांधी परिवाराची अवस्था झाली.

काँग्रेस पक्षात अनेक कर्तबगार नेत्यांची उपेक्षा झाली, त्यांना योग्य वेळी योग्य तो मानसन्मान दिला गेला नाही, मात्र त्यांनी पक्ष सोडला आणि त्यांचे नशीब उजळले, अशी अनेक उदाहरणे आहेत. त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीला आठ महिने आहेत. पण भाजपने त्या राज्यात अचानक मुख्यमंत्री बदलला. पक्षात २०१६ मध्ये काँग्रेसमधून आलेल्या डॉ. माणिक साहा यांच्यावर मुख्यमंत्रीदाचा टिळा लावला. काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षाचे मुख्यमंत्री झालेले साहा हे काही एकमेव उदाहरण नाही. ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल), जगनमोहन रेड्डी (आंध्र प्रदेश), हिमंत बिस्व सरमा (आसाम), एन. वीरेन सिंह (मणिपूर), नेफ्यू रियो (नागालँड), एन. रंगास्वामी (पुडुचेरी), पेमा खंडू (अरुणाचल प्रदेश) अशी उदाहरणे सांगता येतील.

काँग्रेस पक्षात असताना या दिग्गज नेत्यांना पक्षाने बाजूला टाकले होते. त्यांना पक्षात फारसे महत्त्व दिले जात नव्हते. चार मुख्यमंत्री हे भाजपचे व दोन भाजपचे समर्थन घेऊन बनले आहेत. शरद पवार महाराष्ट्राचे पहिल्यांदा १९७८ मध्ये मुख्यमंत्री झाले. ते काही काँग्रेसचे नव्हते. ते पुलोदचे मुख्यमंत्री झाले. समाजवादी, डावे पक्ष, त्यावेळचा जनसंघ यांना बरोबर घेऊन त्यांनी पुलोदचे सरकार बनवले होते. १९९० दशकात ममता बॅनर्जी या काँग्रेसच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून त्यांची देशभर प्रतिमा होती. राजीव गांधींच्या काळात त्या युवक काँग्रेसच्या सरचिटणीस होत्या. पण हायकमांडच्या विरोधात त्या सतत बिगुल फुंकत असायच्या. पक्षाने पश्चिम बंगालमध्ये ममता यांचे अधिकार मर्यादित केले, त्याचा परिणाम १९९८ मध्ये त्यांनी काँग्रेसला अलविदा म्हटले. ममता यांनी तृणमूल काँग्रेस हा नवा पक्ष स्थापन केला. तृणमूल काँग्रेसने प. बंगालमध्ये ३४ वर्षे सत्तेवर चिकटून बसलेल्या डाव्या आघाडीच्या सरकारला २०११ मध्ये उलथवलेच, पण काँग्रेसलाही संपवले.

सन २००९ पूर्वी जगनमोहन रेड्डी यांची ओळख काँग्रेसचे ताकदवान नेता व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. राजशेखर रेड्डी यांचे पुत्र अशी होती. वडिलांच्या मृत्यूनंतर ते राजकारणात अधिक सक्रिय झाले. पक्षाने त्यांना महत्त्व दिले नाही. त्यांनी नवा पक्ष स्थापन केला. २०१४ ते २०१९ या काळात ते आंध्र प्रदेश विधानसभेत विरोधी पक्षनेते राहिले. २०१९ च्या निवडणुकीत मोठा विजय मिळवून ते मुख्यमंत्री झाले. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना सन २०१२ मध्ये जगनमोहन यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सीबीआयने अटक केली होती. आज ते काँग्रेसला पुरून उरले आहेत.आसाममध्ये तरुण गोगई यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये हिमंत बिस्वास सरमा मंत्री होते. आसाममधील ते लोकप्रिय नेते आहेत. २०१५ मध्ये ते भाजपमध्ये सामील झाले. काँग्रेस सोडताना त्यांनी म्हटले होते की, ते राहुल गांधींना भेटायला गेले तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून राहुल त्यांच्या कुत्र्याला बिस्कीट खायला घालत बसले. ते स्वत: मुख्यमंत्रीपदासाठी उत्सुक होते, पण काँग्रेसने त्यांना कधीच प्रतिसाद दिला नाही.

२०१७ च्या निवडणुकीत आसाममध्ये प्रथमच भाजपची सत्ता आली. पक्षाने सर्वानंद सोनोवाल यांना मुख्यमंत्रीपद दिले. पाच वर्षांनंतर २०२२ मध्ये भाजपने पुन्हा सत्ता काबीज केली. तेव्हा भाजपने हिमंत सरमा यांना मुख्यमंत्री केले. नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो हे पू्र्वी काँग्रेसमध्ये होते. तत्कालीन मुख्यमंत्री एस. सी. जमीर यांच्याशी त्यांचे मतभेद झाले व त्यांनी काँग्रेस सोडली. रियो नागा पीपल्स फ्रंटमध्ये सामील झाले व २००३ मध्ये मुख्यमंत्री झाले. नंतर २००८ व २०१३ ला पुन्हा मुख्यमंत्री झाले. २०१८ मध्ये ते भाजपचे समर्थन घेऊन चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले.

अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांना राजकारणाला काँग्रेसमधून सुरुवात केली. सप्टेंबर २०१६ मध्ये खंडूसह ४३ आमदार भाजपमध्ये सामील झाले. २०१९च्या निवडणुकीत खंडू यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सत्ता काबीज केली. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. वीरेन सिंह यांनी राजकारणाला काँग्रेसपासून सुरुवात केली. २०१६ मध्ये ते भाजपमध्ये आले व मुख्यमंत्री झाले. ते उत्तम फुटबॉलपटू आहेत. पेशाने डेंटिस्ट असलेले डॉ. माणिक साहा हे काँग्रेसमध्ये असताना त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. २०१६ मध्ये ते भाजपमध्ये आले. पन्ना प्रमुखापासून त्यांनी काम केले.

२०२० मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले. गेल्या महिन्यात ते राज्यसभा सदस्य झाले. ७१ वर्षांचे एन. रंगास्वामी पुडुचेरीचे मुख्यमंत्री आहेत. राजकीय कारकीर्द काँग्रेसपासून सुरू केली. २००१ ते २००८ मुख्यमंत्री होते. पुढे व्ही. नारायणस्वामींचे महत्त्व वाढले तेव्हा त्यांनी काँग्रेस सोडली व स्वत:चा पक्ष स्थापन केला. तीन वेळा ते मुख्यमंत्री झाले. २०२१ मध्ये भाजपचा पाठिंबा घेऊन ते पुडुचेरीचे चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले.

काँग्रेसच्या चिंतन शिबिरात यापुढे एक परिवार, एक तिकीट, संघटनेत युवकांना आरक्षण, देशभर पदयात्रा असे निर्णय झाले. २ ऑक्टोबरपासून भारत जोडो अभियान सुरू करण्याचे ठरवले. चिंतन शिबिरात फोकस लोकसभा २०२४ असला तरी त्यापूर्वी राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय, नागालँड, तेलंगणा अशा दहा राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत, ही काँग्रेसची मोठी कसोटी आहे.

sukritforyou@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -