सफाळे (वार्ताहर) : पालघर जिल्ह्यातून रायगड-उरणच्या जेएनपीटी ते दिल्ली या डीएफसीसी व मुंबई-बडोदा एक्स्प्रेस, मुबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन आणि विरार-डहाणू उपनगरी तीन व चार अशा जाणाऱ्या प्रकल्पासाठी लागणाऱ्या माती, मुरूम आणि दगडासाठी पालघर जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागातील जवळपास १५ ते २० डोंगर भुईसपाट करण्याचे काम सुरू आहे. मात्र महसूल विभाग त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. पर्यावरणाला मोठा फटका बसणार असल्याने पर्यावरणप्रेमींनी याबाबत विरोध दर्शवला आहे.
जिल्ह्यातील विशेषतः जंगलपट्टीतील आदिवासी पाड्याजवळ प्रकल्प उभारणाऱ्या कंपनीना मुरूम, माती, दगड पुरविण्याचे काम काही जिल्ह्याबाहेरील तर स्थानिक ठेकेदारांनी सुरू केले आहे. जिल्ह्यात आजच्या घडीला ३५० ते ४०० मोठे (हायवा) ट्रक डोंगर खोदून तेथील माती, मुरूम, दगड या प्रकल्पांसाठी दिवसंरात्र पुरवत आहेत. त्यामुळे अवघ्या चार दिवसांत अर्धा किलोमीटर लांबीचे डोंगर भुईसपाट करण्यात येत आहेत.
युएसएमएल लिमिटेड या कंपनीने सरकारची परवानगी न घेता बेकायदेशीर आरएमसी प्लान्ट आणि क्रशर मशीन सुरू केली आहे. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या प्लान्टमुळे प्रदूषण होत असून त्याचा फटका आदिवासी नागरिक, बागायती शेतीला बसतो आहे. पालघर तालुक्यातील सफाळे, गारगांव, किराट, धुकटंण, डहाणू तालुक्यातील वाणगाव आदी भागात मोठे डोंगर जमीनदोस्त होत आहेत. या कामासाठी मोजक्या ठिकाणी परवानगी घेण्यात आली असून बाकी अन्य ठिकाणी परवानगी न घेता महसूल विभागातील अधिकाऱ्यांशी हाताशी धरून काम सुरू आहे. इतकेच नव्हे तर वनखात्याचे डोंगर जेसीबी मशीनद्वारे भुईसपाट करण्याचे काम सुरू आहे. मात्र वनविभाग त्याकडे डोळेझाक करत आहे.
जेएनपीटी ते दिल्ली दरम्यान पश्चिम रेल्वेला समांतर डीएफसीसी प्रकल्पाचे काम सुरू असून यासाठी लागणारे रेडीमिक्स काँक्रिट ग्रीन झोन असलेल्या वाणगाव वाकीपाडा येथील सर्वे क्र.७४ येथील आरएमसी प्लांटमध्ये तयार केले जाते. यासाठी यूएसएमएल लिमिटेडने महसूल, प्रदूषण विभागाची आवश्यक परवानगी घेतलेली नाही.
यूएसएमएल लिमिटेड कंपनीच्या कास्टिंग यार्डमधील आरएमसी प्लांटमधून उडणारे धुळीकण हवेद्वारे आजूबाजूच्या बागायतीमधील पिकांवर बसत असल्याने पिकांची प्रत घसरल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसून त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. शेजारील आदिवासी पाड्यातील घरांवर देखील धुळीचे कण पसरून त्याचा लोकांना त्रास होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून महसूल विभाग,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची आवश्यक परवानगी न घेताच तसेच तेथे काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेची खबरदारी न घेताच हा प्लान्ट बिनबोभाटपणे सुरू असल्याने वाढत्या प्रदूषणामुळे शेतकरी आणि नागरिक त्रस्त झाले असून या प्लांटवर ताबडतोब बंदीची कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
संबंधित कंपनीची चौकशी करून जर त्यामध्ये काही अनियमितता आढळली तर कंपनीवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल. – अभिजीत देशमुख, तहसीलदार डहाणू.
युएसएमएल लिमिटेड कंपनीच्या वाणगाव येथील आरएमसी प्लांट आणि क्रशर मशीनसाठी महसूल, प्रदूषण नियंत्रणसंबंधित आवश्यक परवानग्या कंपनीकडे आहेत. तसेच शेजारील आदिवासी पाडा आणि शेतीचे नुकसान होत असेल तर त्याची माहिती घेण्यात येईल. – के.के.नायर व्यवस्थापक.
पालघर जिल्ह्यातील केंद्र सरकारचे जे प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे, त्यासाठी माती, मुरूम, दगड मिळवण्यासाठी जिल्ह्यातील डोंगर भुईसपाट करण्याचे काम सुरू आहे, यासाठी पर्यावरणीय विभागाची परवानगी घेतली नाही याचा शासनाने खुलासा करावा, तसेच कोणत्या गाव व जमिनीना परवानगी दिली आहे ते प्रसिद्ध करावे. – प्रकाश लवेकर, पर्यावरणीय कार्यकर्ते पालघर.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…