संतोष वायंगणकर
दोन वर्षांच्या कोरोनाने कराव्या लागणाऱ्या लॉकडाऊननंतर पर्यटनासाठी लोक बाहेर पडू लागले आहेत. कोकणातही पर्यटक येत आहेत. कोकणात येणारे पर्यटक हे महाराष्ट्रातील उर्वरित भागातील आहेत. तसेच गुजरात, मध्य प्रदेश आदी राज्यांतूनही पर्यटक कोकणात मोठ्या संख्येने येत आहेत. कोकणातील पर्यटन स्थळांचे सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करतात; परंतु दुर्दैवाने या सौंदर्यस्थळाकडे जाणारे रस्ते अरुंद आहेत. कोणत्याच सुविधा नाहीत. महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते आहेत. कोकणात आदित्य ठाकरे तीन-चार वेळा येऊन गेलेत. या धावत्या दौऱ्यातून आदित्य ठाकरेंनी कोकण किती पाहिलं आणि किती समजला हे समजणे अवघड आहे. महाराष्ट्राच्या अर्थकारणाला कोकणातील पर्यटन व्यवसायातून मोठी मदत होऊ शकेल; परंतु दुर्दैवाने कोकणातील या पर्यटन स्थळांकडे आणि पर्यटन व्यवसायाकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष नाही. कोकणात पर्यटन व्यवसायाला प्रचंड वाव आहे; परंतु जी व्यावसायिकता यायला हवी ती अजूनही आलेली नाही. कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून भरमसाट बिल आकारणी करायची म्हणजे पर्यटनातील व्यावसायिकता नव्हे. एकदा येणाऱ्या पर्यटकाला पुन्हा पुन्हा यावसं वाटलं पाहिजे. तसं वातावरण आपण तयार करायला हवं. पर्यटनासाठी येणारे सर्वच पर्यटक समजून घेणारेच असले पाहिजेत, अशी अपेक्षा करणे गैर आहे. येणारे पर्यटक पर्यटनासाठी आले आहेत ना, मग त्यांनी शिस्तीतच वागले, बोलले पाहिजे ही अपेक्षाच चुकीची आहे. येणारे पर्यटक मद्यप्राशन करणार, त्यात काही उन्मत्तपणे वागणार, बोलणारही… यासाठीच आपण आपला संयम वाढवला पाहिजे. येणारे पर्यटक हे कोणत्या स्वभावाचे असतील, ते बेताल वागतील की कसे वागतील, हे सांगणे आणि ठरवणे अवघड आहे. रविवार १५ रोजी दापोलीत त्याचा प्रत्ययही आला. वाद, मारहाण पर्यटकांमध्येच झाली. वाद झालेले पर्यटक हे सातारा व पुणे येथील होते. हा वाद, मारहाण ही दोन पर्यटक गटांत झाली, मात्र नाहक बदनामी कोकणातील पर्यटन स्थळांची झाली. ‘पुण्यातील पर्यटकांवर दापोलीत हल्ला’ असा बातमीचा मथळा होता; परंतु यात झालेला हल्ला, वाद हा पर्यटकांमध्येच झाला होता. कोणत्याही स्थितीत कोकणातील पर्यटनस्थळ बदनाम होता कामा नये. पर्यटनस्थळांवरील वाद हे बहुतांशवेळ गाडी पार्किंग, गाडीला साईड देणे, ओव्हरटेक करणे यामुळे होत असतात. मालवण, तारकर्ली, देवबाग आदी अनेक पर्यटनस्थळांवर पर्यटक मोठ्या संख्येने येतात; परंतु पार्किंग व्यवस्था नसते. दोन गाड्या व्यवस्थितरीत्या जातील अशी व्यवस्था कोकणातील एखाद-दुसऱ्या पर्यटनस्थळाचा अपवाद वगळला, तर कुठेही दिसत नाही. उलट पर्यटनस्थळांवर अनेक सुविधा नसल्याचेच समोर येते. कोकणातील पर्यटन व्यवसायाकडे सरकारने आणि कोकणवासीयांनी नीट नियोजन करून लक्ष दिले, तर निश्चितपणे भविष्यात कोकणात पर्यटन याच व्यवसायावर आपली आर्थिक उन्नती करता येऊ शकते.
कोकणात कृषी पर्यटनाला मोठा वाव आहे. निसर्गाने खूप काही दिले आहे. त्याचा उपयोग करून थोडीशी कल्पकता दाखवली, तर पर्यटकांना आकर्षित करता येणारी पर्यटन स्थळ निर्माण होऊ शकतात. हरकुळ बु.ता. कणकवली येथील अमित राणे या व्यावसायिकाने तलावाचा वापर करत पर्यटन स्थळ विकसित केले आहे. माडखोल ता. सावंतवाडीमध्ये प्रमोद सावंत यांनी सावंत फार्म हाऊस म्हणून माडखोलच्या तळ्याचा उपयोग केला. एक सर्वांगसुंदर पर्यटन स्थळ विकसित केले आहे. हिर्लोक ता. कुडाळला मामाचे गाव म्हणून एक विरंगुळ्याचे स्थळ विकसित झाले आहे. गणपतीपुळे येथेही बारा बलुतेदारीचे दर्शन घडताना कोकणाच चित्रसमोर उभे राहते. असे प्रयत्न अनेकजण करीत आहेत. डी. के. सावंत हे तर गेली अनेक वर्षे पर्यटन व्यवसायात काम करीत आहेत. कोकणात पर्यटन व्यवसाय वाढला पाहिजे यासाठीच प्रयत्न करीत आहेत. कोकणातील पर्यटन व्यवसाय वाढण्यासाठी अनेकजण आपल्यास्तरावर काम करीत आहेत. मात्र जर विचार-विनिमयातून यामध्ये काम होऊ लागले तर अधिक योग्य होईल.
कोणत्याही स्थितीत कोकणातील पर्यटन व्यवसाय बदनाम होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. येणाऱ्या पर्यटकांना चांगली सेवा, आदराची वागणूक आणि लुटमारीचा विचार न करता योग्य परवडणारे दर देऊन पर्यटकांची संख्या कोकणात पर्यटनासाठी येण्यासाठी कशी वाढविता येईल, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. मारहाण, वाद, भांडण, गाड्यांच्या काचा फोडणे, गाडी आडवी घालणे हे प्रकार आपल्याकडे होऊ देता कामा नयेत. आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात आपल्या कोकणातील पर्यटन स्थळांची बदनामी व्हायला देता कामा नये हे जपलं पाहिजे. कोकणातील पर्यटनस्थळ आणि पर्यटन व्यवसाय आपल्यालाच जपावा लागेल. व्यावसायिकतेचा विचार नजरेसमोर ठेवला, तर सर्व काही ठीक होईल. कोकणात पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून कोकणातील घरा-घरांत आर्थिक उन्नती व्हावी. कोकणातील आर्थिक समृद्धीचा राजमार्ग हा पर्यटन व्यवसायातूनच जातो. हेच सतत नजरेसमोर ठेवावे लागेल.