‘एमआयडीसी’मध्ये पायाभूत सुविधांचा अभाव

Share

अतुल जाधव

सध्या मेक इन इंडियाचा डंका वाजत आहे. उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी शासनस्तरावर सोयी आणि सवलतींचा वर्षाव होत असताना ठाणे शहरातील उद्योग नगरी समजला जाणारा वागळे इस्टेट परिसरातील एमआयडीसी परिसर या ठिकाणी असलेल्या असुविधांमुळे त्रस्त झाला आहे. या ठिकाणी पायाभूत सुविधांची देखील बोंब असून इतर शासकीय यंत्रणेप्रमाणे ठाणे महापालिकेने देखील एमआयडीसीला वाऱ्यावर सोडले असल्याची भावना येथील उद्योजकांची झाली आहे. रस्ते, पार्किंग, ड्रेनेज आणि रस्त्यांवरील दिवे या सगळ्यांचाच या ठिकाणी अभाव आहे. महापालिकेला या क्षेत्रातून कररूपाने सर्वाधिक महसूल मिळत असतानाही पायाभूत सुविधेसाठी उद्योजकांना पालिकेत खेटे मारावे लागत असल्याने उद्योजक या ठिकाणावरून काढता पाय घेण्याच्या तयारीत आहेत.

एमआयडीसी क्षेत्रात प्रमुख समस्या ही रस्त्यांची आहे. उद्योजकांना दळण-वळणाच्या दृष्टीने उत्तम दर्जाच्या रस्त्यांची आवश्यकता असते; परंतु ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या एमआयडीसी परिसरातील रस्त्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून रुंदीकरण झालेले नाही. एमआयडीसी पट्ट्यात आजच्या तारखेला काही प्रमाणात उद्योग वाढले असून विशेषकरून आयटी क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. त्यामुळे या पट्ट्यात रहदारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या तुलनेत रस्ते मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’ आहेत. अरुंद रस्त्यांची ही कोंडी फुटावी यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव दिला असला रुंदीकरणाच्या कामांसाठी एमआयडीसीकडून अद्याप जागा उपलब्ध करून न दिल्याने हा प्रस्ताव २०१९ पासून अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे.

तत्कालीन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात रस्ता रुंदीकरणाची मोहीम राबवण्यात आली. यामध्ये शहरातील अनेक मोठ्या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. आजच्या तारखेला एकीकडे रस्ते विकासासाठी कोट्यवधींचे प्रस्ताव तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असताना दुसरीकडे वागळे इस्टेट परिसरातील एमआयडीसी पट्ट्यातील रस्त्यांचे रुंदीकरण मात्र गेल्या अनेक वर्षांपासून झालेले नाही. वागळे एमआयडीसीचा परिसर हा एकेकाळी ठाण्याची उद्योग नगरी होती. त्या काळात या ठिकाणी आयटी क्षेत्राचा फारसा विकास झाला नव्हता.

त्यामुळे त्यावेळची परिस्थिती बघून १९६५ साली रस्त्यांचा ले-आऊट तयार करण्यात आला होता. यामध्ये एवढी वर्ष होऊनही अद्याप कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. ठाणे महापालिकेच्या वतीने एमआयडीसीला २०१९ साली रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव देण्यात आला होता. यामध्ये ठाणे महापालिकेच्या वतीने एमआयडीसीमधील सर्व रस्त्यांचे रुंदीकरण केले जाणार होते. या ठिकाणी अंमलबजावणी प्राधिकरण हे एमआयडीसी असल्याने रस्ता रुंदीकरण करताना येणारे अडथळे तसेच रुंदीकरणासाठी जागा उपलब्ध करून देणे हे काम एमआयडीसीकडून होणे अपेक्षित होते, ते अद्याप झालेले नसल्याने गेल्या २०१९ पासून हा प्रस्ताव अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे.

एमआयडीसी क्षेत्रात एकूण ३४ किमीचे रस्ते आहेत. यामध्ये वागळे मुख्य रस्ता हा रोड नं. १२ आणि ३३ हे ३०.५ मीटरचे आहेत. तर रोड नं. १८.५ मीटरचा आहे, तर इतर रस्ते हे ९ आणि १२ मीटरचे आहेत. ठाणे महापालिकेने एमआयडीसीला २०१९ साली रुंदीकरणाचा प्रस्ताव दिला. यामध्ये ९ आणि १२ मीटरचे रस्ते हे १८ मीटरपर्यंत रुंद करण्याचा प्रस्ताव होता. १८ मीटरचे रस्ते हे २४ मीटरचे करण्याचे नियोजन होते, तर ३०.५ मीटरचा रस्ता ४० मीटरपर्यंत रुंद करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावानंतर एमआयडीसीकडून संपूर्ण क्षेत्राचा सर्व्हे देखील करण्यात आला. अंमलबजावणी प्राधिकरण एमआयडीसी असल्याने रुंदीकरणासाठी एमआयडीसीनी अद्याप जागा उपलब्ध करून न दिल्याने हा प्रस्ताव मार्गी लागलेला नाही.

या संदर्भात एमआयडीसीचे अधिकारी महापालिकेला दोष देत असून एमआयडीसी क्षेत्रातील सर्व रस्ते हे ठाणे महापालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले असल्याचे सांगत आहेत, त्याचप्रमाणे रस्ता रुंदीकरणाच्या संदर्भातील बऱ्यापैकी समस्या निकाली काढण्यात आल्या आहेत. यामध्ये काही उद्योग संघटनांच्या काही समस्या आहेत, तर काही अतिक्रमणे हटवण्याच्या संदर्भात प्रश्न असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. रस्ता प्रकरणी राज्याचे नगरविकास मंत्री सकारात्मक असले तरी राज्याच्या उद्योग खात्याचे या प्रस्तावाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे, तर महापालिका आयुक्त स्तरावर बैठक घेऊन देखील त्याचा पुढे काहीच फायदा झाला नसल्याने आज देखील रस्त्यांची स्थिती ‘जैसे थे’ आहे.

ठाणे शहर स्मार्ट करताना येथील उद्योजकांना दुय्यम दर्जाच्या सोयी-सुविधा देऊन शहर स्मार्ट होणार नाही, याची जाणीव स्थानिक प्रशासनाला नाही. राज्यात शिवसेनेचे सरकार तसेच पालिकेत शिवसेनेचे प्राबल्य असताना उद्योग नगरीतील उद्योगांबद्दलची अनास्था उद्योगांना देशोधडीला लावणारी आहे.

Recent Posts

कामगार कायद्यांमध्ये सुधारणा; महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार

मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…

18 minutes ago

Rafrigerator Care: फ्रिज भिंतीपासून किती अंतरावर असावा?

Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…

26 minutes ago

Gond Katira: दगडासारखी दिसणारी ही गोष्ट उन्हाळ्यात आहे अतिशय फायदेशीर

मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…

1 hour ago

Kolhapur News : कोल्हापुरात ट्रक आणि एसटी बसची जोरदार धडक!

कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…

2 hours ago

Lalit Machanda Suicide: ‘तारक मेहता….’ फेम अभिनेते ललित मनचंदा यांनी ‘या’ कारणांमुळे केली आत्महत्या

मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…

3 hours ago