डॉ. श्रीराम गीत
सिने-नाट्य-मालिका सृष्टीचे वेड एकदा मेंदूमध्ये भिनले की, मग पालकांची फरपट सुरू होते. मुला-मुलींना आपल्या चमत्कारिक वागण्याचे भानही राहत नाही. या हट्टापायी चांगला अभ्यास असला तरीसुद्धा मार्कांची उतरंड सुरू होते.
सिनेसृष्टीमध्ये दर दहा वर्षांनी एक एक पिढी बदलत असते. जुने निर्माते-दिग्दर्शक मागे पडतात व नव्यांना वाव मिळायला सुरुवात होते. सन २०१८ पासून दिग्पाल लांजेकर यांनी सिने-नाट्य सृष्टी गाजवायला सुरुवात केली व २०२२ मध्ये ते आज सर्वार्थाने त्यात तळपत आहेत.
चिन्मय मांडलेकर यांचे जोडीने स्वतःची निर्मिती संस्था सुरू करताना त्यांनी मराठीचे अस्सल रूप धारण करणारे ‘मुळाक्षरे’ हे नाव संस्थेला दिले.
‘मुक्ताई’ या स्वलिखित एकल नाट्याचा प्रयोग २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय थिएटर ऑलिम्पिक्समध्ये भारतातर्फे सादर करण्याचा मान त्यांना प्राप्त झाला आहे. त्याच सालात चार यशस्वी नाटके सादर करणारा युवा नाटककार हे सुद्धा मानाचे मोरपीस त्यांच्या शिरपेचात खोवले गेले आहे. नाट्यकर्मी म्हणून यशस्वी झाल्यानंतर विविध चॅनलवर त्यांनी २००० हून अधिक भागांच्या लेखनाचा एक टप्पा पार केला आहे. सध्या सर्वांच्या मनात बसलेली ज्ञानेश्वर माऊली ही मालिका सोनी मराठीवर गाजते आहे.
या साऱ्या व्यापात अडकलेले असताना त्यांनी श्री शिवराज अष्टक असा एक संकल्प सोडला. श्री शिवछत्रपती व त्यांचे सहकारी याच्या जीवनावर आधारित आठ भव्य सिनेमांची निर्मिती करण्याचा हा संकल्प आज चार सिनेमांचे लोकार्पण करून निम्म्यावर आला आहे. सलगपणे प्रत्येक सिनेमा हा प्रेक्षकांच्या, मराठी मनाच्या पुरेपूर पसंतीस उतरलेला आहे. मराठी पावले पुन्हा थिएटरकडे ओढून आणण्यात दिग्पाल लांजेकर हे पुरेपूर यशस्वी झाले आहेत. अनेकांचा खराखुरा आयडॉल बनलेले दिग्पाल यांची वाट कशी पकडायची, सुरू कशी करायची यावरच आजचा माझा करिअरचा लेख आहे.
मनोरंजन सृष्टीमध्ये करिअर करायचे हे स्वप्न अनेकांचे असते. त्यातही हिरो किंवा हिरोईन बनणे हे मुख्य उद्दिष्ट असते. सुरुवात मॉडेलिंगपासून करायची हा हट्ट अचानक सुरू होतो. कारण एकच असते १५-१६व्या वर्षी नकळत्या वयात ‘तो किती मस्त दिसतो, अमुक हिरोसारखा दिसतो किंवा तिला पाहिले की, या हिरोईनची आठवण होते, असे काही तरी कानावर पडलेले असते.’
काहींना संगीताचा किडा चावतो. गिटार किंवा सिंथेसायझर ही त्याची सुरुवात असते. अगदी मोजक्यांना लेखनाचा नाद लागतो. याची सुरुवात कवितांपासून होते. मी लिहिलेली कथा सुंदर सिनेमाचे बीज होऊ शकते, असाही साक्षात्कार काहींना झालेला असतो. फोटोग्राफी करता करता सिनेमॅटोग्राफर होण्याची काहीजण स्वप्न बघू लागतात. मात्र खरे जाणकार एडिटिंग किंवा डायरेक्शन याचा विचार मनात करायला सुरुवात करतात. असे हे सिने-नाट्य-मालिका सृष्टीचे वेड एकदा मेंदूमध्ये भिनले की, मग पालकांची फरपट सुरू होते. पालकांची हा शब्द मी एवढ्या करता वापरत आहे की, मुला-मुलींना आपण काहीतरी चमत्कारिक वागत असतो याचे भानही राहत नाही. दहावीची परीक्षा संपल्यानंतर हा हट्ट प्रकर्षाने पुढे येतो. या हट्टापायी चांगला अभ्यास असला तरीसुद्धा मार्कांची उतरंड सुरू झालेली असते. पण लक्षात कोण घेतो? यावर मार्ग कोणता?
पालकांनी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची असते की, या वेळेला कुठलाही विरोधी सूर काढला तर फक्त भांडणे किंवा अबोला याशिवाय त्यांच्या पदरी काहीच पडत नाही. या ऐवजी विविध उदाहरणे देत जर त्यांच्याशी बोलले तर समझोता होऊ शकतो. त्यासाठीचा अभ्यास खरंतर पालकांनाच करायचा असतो. जुना काय सोडून द्या, पण सध्या चाळिशीत असलेले विविध यशस्वी कलाकार काय शिकले आहेत, त्यांनी सुरुवात कशी केली, त्यांना काय करायचे होते म्हणून ते सिनेसृष्टीत आले व सध्या काय करत आहेत, याची माहिती गोळा करून मुलांशी सहजगत्या संवाद साधता येऊ शकतो. ही माहिती देत असताना मुलांच्या असे लक्षात येते की, इथे पाय रोवून, उभे राहून नाव कमवायचे असेल, तर कष्ट करण्यासाठी पर्याय नाही. त्याचप्रमाणे हात शिरण्यासाठीचे विविध मार्ग रितसर शिक्षण घेण्यासाठीसुद्धा उपलब्ध आहेत. कोणच्याही शाखेतील इयत्ता बारावीनंतर हे सगळे सुरू होतात.
- अॅक्टिंगसाठी ललित कला केंद्रातील बीएची पदवी सर्व विद्यापीठांत सर्व शहरातून उपलब्ध आहे.
- सिने-नाट्य-मनोरंजन क्षेत्रात प्रवेश करून विविध स्वरूपाची कामे शिकण्यासाठी बारावीनंतर बॅचलर्सची मास कम्युनिकेशनची पदवी उपलब्ध आहे. हीच पदवी कोणत्याही पदवीनंतर मास्टर्सची म्हणूनसुद्धा घेता येते.
- सिनेमॅटोग्राफी किंवा साऊंड इंजिनीअरिंग याचेही कोर्सेस बारावीनंतर किंवा पदवीनंतर उपलब्ध आहेत.
- लेखन, कथा संवाद, पटकथा इत्यादींसाठी आपण वरील गोष्टी शिकताना किंवा शिकल्यानंतर प्रयत्न करू शकतो.
- महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे एका क्षेत्रात समजा यश नाही मिळाले, तर दुसऱ्या क्षेत्रात सहजगत्या आपल्याला पर्याय उपलब्ध होत जातो. या पद्धतीत यशस्वी झालेली असंख्य उदाहरणे तुम्हाला आसपास मराठी हिंदी, तेलुगू, तमीळ चित्रसृष्टीत सापडतील.