Friday, March 21, 2025
Homeसाप्ताहिककोलाजराधा दामोदर

राधा दामोदर

डॉ. विजया वाड

दामोदर राधाला बघायला आला तेव्हा मामा-मामींनी चांगले स्वागत केले. राधाची मामी चांगली ऊठबस करी. आला गेला पै पाहुणा यांचे स्वागत करी. राधाने करून ठेवलेले पोहे-सांजा काही बाही, डिशने पाहुणे सुखावत. भलाका मामीची! पण राधा काही बोलत नसे. मामीने म्हटले ‘पोहे’ मी केले, तर बिघडले कुठे नि कसे? तिनेच तर नवव्या वर्षांपासून वाढविले. मामाने खाऊ-पिऊ घातले. दामोदर ४९वा होता. राधा सर्वथैव उजवी होती. निमगोरी, नाकेली, हरिणाक्षी. पण ४८ मुले झाली हे मात्र खरे.

का नकार येतो? का?

शेजारच्या बबलूला खरे कारण माहिती होते. दामोदर बबलूचा मामेभाऊ होता. दामोदरचे स्थळ बबलूनेच आणले होते.

“आता तू चार दिवसांत, त्यानंतर आपणास एक पोस्ट कार्ड येईल, त्यात तुझा मृत्यूयोग येईल मग. राधेशी लग्न होताच तडफडून मृत्यू!”

“क्काय?” दामोदरला ऐकून झटकाच बसला.

“अक्षर मामींचे असेल. धुणी, भांडी, खरकटी, चुलीवरला स्वयंपाक, सर्व करणारी, फुकटची कामवाली मामीला गमवायची नाही, असंच आई म्हणते माझी.”

“पण माझा यावर विश्वास नाही.” दामोदर सदरा झटकत म्हणाला.
“पण प्रत्येकाला आपला जीव प्याराय ना!”

बबलूने म्हटले नि दामोदरचा विश्वास नव्हता तरी बसला.
दामूने बघण्याचा कार्यक्रम केलाच. ठरल्याप्रमाणे. तो कार्डाची वाट पाहू लागला. चार दिवस झाले. कार्ड आले. ‘तडफडून मृत्यू!’ लग्न होताच नकार द्यावा म्हणून ही विनंती करणारे कार्ड. पण त्याला धक्का बसला नाही. त्याने ठरवून न घाबरता होकार कळवला.

“खूप आनंद झाला.” मामीने संवाद साधला.
“राधा चांगली मुलगी आहे.” दामू म्हणाला
“ते मृत्यूयोगाचं काय नशिबात आहे, समजत नाही.” मामीने डोळ्याला पदर लावला.
“काय नि कसला मृत्यूयोग?” दामूने वेड पांघरले.
“अहो, वैधव्ययोग लागलीच राधाच्या पत्रिकेत.” मामीने हुंदका देत म्हटले. “२८ची झाली राधा. घोडनवरीच म्हणायची.”
“मामी, माझा पत्रिकेवर विश्वास नाही.” दामू ठासून म्हणाला.
“मरायला तयार? घोडनवरीसाठी?” मामीने विचारले.
“हो. तयार.”
“इतके काय आहे नवल विशेष तिच्यात?” मामीने म्हटले.
“पत्रिका ढळढळीत वैधव्य योग दाखविते आहे.” मामीने रेटा दिला.
“जर मी मरायचा असेन, तर लग्न करून मरतो. विमा भरभक्कम आहे. राधाला पेन्शन मस्त मिळेल. मी स्वर्गातून सुखेनैव बघेन.”
मामीचा अगदी नाइलाज झाला.

स्थळाने होकार दिला. मामा खूश! फुकटची मोलकरीण गेली म्हणून मामी दु:खी नि नाखूश! कष्टावली, आत रडली. पण दामोदरने राधाशीच लग्न केले.

२८ची नवरी नि ३२चा नवरा. घोडनवरी नि घोडनवरा!
“खूप कष्टाने सुरू झाला एक नवा व्यवहार. आपले आशीष असावेत, राधा-दामोदरचा संसार. आयुष्यमान व्हावी जोडी, द्यावा असा आशीष! जोडीने नमस्कार करते, मनभरून द्या आशीष, आयुष्यमान कोशिष!”

उखाणे झाले. दामोदर खरोखर चौथ्या दिवशी आजारी पडला. घरदार हादरले. मामी घाबरली. राधा बावरली. मामा चिंतित झाला. “एवढ्या कष्टाने वाढविली.” दामोदरला मामा म्हणाला.

“मी काही मरत नाही.” दामोदर म्हणाला.
“मामा, चिंता नका करू.” त्याने रट लावली.
“मी काय म्हणते? इस्पितळातच ठेवू. ह्यांना वाटेल आराम.”
“असं म्हणतेस?” मामाने ऐकले. मामीला पुसते कोण? शिवाय

धुणी भांडी, स्वंयपाक… कामे कमी का होती? स्वत:वर पडली होती आराम हराम झाला होता.

दामोदर खाटेवर पडून होता.
“काय होईल गं राधा?” दामोदरने राधाला चिंतातूर होऊन विचारले. “काहीही होणार नाही अन् मी भरभक्कम सरकारी नोकरीत आहे. काही झाले तरी मी खचणार नाही.” राधा म्हणाली.
“पण ते भविष्य?” तो चिंतातूर.

“राधा भविष्य घडविते.” राधाने समज दिली. धीर बांधून.
दामोदर बरा झाला. मरणाच्या दारातून वाचला म्हणा! मामीने गुटी दिली होती. राधा ती आवर्जून टाकून देई.
काय ठाऊक? कसली गुटी? कुठली गुटी?
रसिक हो, मामी-मामापासून दूर राधाने गोव्याला बदली घेतली. जादूच झाली जशी!

दामोदर आणि राधा सुखाने संसार करीत आहेत. आपण शुभेच्छा देऊ.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -