Wednesday, July 24, 2024
Homeमहत्वाची बातमीतरुणाईला व्यसनांचा विळखा

तरुणाईला व्यसनांचा विळखा

अनघा निकम-मगदूम

दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी पोलिसांनी डीएम या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या म्होरक्याला केरळ येथून अटक केली. याचे दोन साथीदार १ मार्चला रत्नागिरी शहरातील काँग्रेस भवन या मध्यवर्ती परिसरातील एका लॉजमध्ये डीएम या अमली पदार्थ्यांच्या साठ्यांसह पोलिसांच्या जाळ्यात अडकले होते, तिथून पुढे याची साखळी म्होरक्यापर्यंत केरळला पोहोचली आणि त्याला पकडण्यात यश मिळाले. पण, गेल्या काही वर्षातून हा अमली पदार्थांचा विळखा कोकणात घट्ट होऊ लागलाय हे प्रकर्षाने नमूद करावेसे वाटते.

मात्र साधारण २० वर्षांपूर्वीपर्यंत रत्नागिरीत अशी स्थिती नव्हती. मात्र त्यानंतर या काही वर्षांत अमली पदार्थांचे जाळे हळूहळू सगळीकडे पसरले असून आता अगदी शहरातील काही भागामध्ये अफू, गांजा, चरस हे पदार्थ सहज उपलब्ध होऊ लागले आहेत आणि इथला तरी वर्ग त्याच्या आहारी जाऊ लागला आहे.

पण या सगळ्याला अनेक सामाजिक कारणे आहेत. कोकण आणि मुंबई यांचे घट्ट नाते आहे. इथे शिकेलेला तरुण मुंबईला नोकरी शोधायला जायचा ही रूढ जुनी पद्धत. अजूनही इथला तरुण नोकरीसाठी पहिला पर्याय म्हणून मुंबई किंवा पुण्यकडेच बघतो. मात्र तिथे काही पर्याय नसेल, तर गावीही त्याला अन्य पर्याय इतक्या वर्षांत उपलब्ध झालेला नाहीय. उलट रत्नागिरीत आलेले अनेक प्रकल्प विरोध आणि संघर्ष समिती या दोन शब्दांमुळे इथे कधीच रुजले नाहीत. त्यामुळे येणाऱ्या अनेक संधी विरोध केल्याने आल्या पावली माघारी गेल्या आहेत. या विरोधाच्या आंदोलनात जोशाने घोषणा देणारे अनेक तरुण असतात. पण आंदोलने झाली की पुन्हा ही तरुणाई बेरोजगार होते. ही बेरोजगारी या मुलांना व्यसनाच्या दुष्टचक्रात अडकवत आहे. नैराश्याला व्यसन हे आता उत्तर होऊ लागले आहे.

एकीकडे ही बेरोजगारी तर दुसरीकडे हातात सहज पैसे उपलब्ध होत असल्याने पालकांकडून ते सहज मिळत असल्याने अशा वाईट मार्गाकडे जाणरी दुसरी पिढी आहे. आज रत्नागिरीत अनेक महागड्या गाड्या रस्त्यावरून फिरवणारे तरुण दिसतात. मोठ्या-मोठ्या पार्ट्या करून त्याचे फोटो सोशल मीडियावर स्टेटस म्हणून ठेवणाऱ्यांची संख्या वाढलीय. अशा या तरुणाईच्या वर्गासाठी आता महानगराप्रमाणेच असे अमली पदार्थ सेवन करणे ही स्टेटसची गोष्ट वाटू लागली आहे.

समाजात विषमता आहे. तरुणाईचा एक वर्ग नोकरी-धंद्यासाठी संधीची वाट बघत निराश होतोय, तर तरुणाईचा एक वर्ग हातात सहज आणि भरपूर पैसा मिळत असल्याने चैन करून जगाने याला महत्त्व देत आहे. या दोन्ही वर्गांवर अमली पदार्थांचा अंमल हळूहळू चढताना दिसत आहे.

यात महत्त्वचा मुद्दा असा आहे की, हे अमली पदार्थ आता सगळीकडे सहज उपलब्ध होत आहेत. यावर कोणाचाही कंट्रोल राहिलेला नाही. एखादा बिस्कीटपुडा घ्यावा तशा सोप्या पद्धतीने गांजाची पुडी मिळू लागलीय आणि यातूनच इथला खूप मोठा तरुण वर्ग याच्या गर्तेत हळूहळू अडकू लागला आहे.

पण, यावर पोलिसी कारवाई करणे, आरोपींना पकडणे इतकेच उत्तर आहे का? याने हे थांबेल का? नक्कीच नाही. रत्नागिरीच्या शहर पोलिसांनी ज्या संशयिताला केरळ येथून पकडले त्याची साखळी केवळ केरळपर्यंत नव्हतीच. त्याला ज्याने हा एमडी पदार्थ उपलब्ध करून दिला तो दुसरा माणूस शोधेल, पण आपला व्यवसाय बंद करणार नाही. ही साखळी तोंडाने किंवा त्याचे कुठलेही टोक शोधणे तसेही कठीणच. त्यामुळे विक्रेत्यावर कारवाई करून थांबण्यापेक्षा ग्राहक असलेल्या तरुणांनाच यापासून प्रवृत्त करणे जास्त महत्त्वाचे आहे.

अर्थात मग यावरून अशा मुलांच्या आई-वडिलांकडे समाजाचे बोट जाते. ‘यांनीच नीट शिस्त लावली नाही’, हे पाठडीतले वाक्य अनेकदा ऐकायला मिळते. याही पलीकडे जाऊन या तरुण मुलांच्याही मानाचा, त्यांच्या परिस्थितीचा विचार होणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या या युगात टिकणे यासाठी त्यानाही धडपडावे लागतेच.

नुसता रत्नागिरीचा विचार केला, तर ट्रेन शैक्षणिक आणि औद्योगिकदृष्ट्या हा जिल्हा मागासलेला आहे. त्यामुळे पुणे, मुंबईत जर संधी नाही मिळाली, तर पुढे काय करायचे, हा प्रश्न अशा मुलांसमोर उभा राहतोच. विशेषतः ग्रामीण भागातील गरीब, मध्यमवर्गीय मुलांकडे पर्याय नसतात, मग ते निराश होतात आणि अशा वाईट व्यसनांकडे वळतात.

यांच्यासाठी मुळातच मुलांमध्ये हे नैराश्य दूर करण्यासाठी इथल्या तरुणांना संधी उपलब्ध करून देणे अवशयक आहे. उत्तम शिक्षण आणि त्यानंतर उद्योग-व्यवसायाची संधी देणे हे आवश्यक आहे. प्रत्येकाला आपले भविषय चांगलेच हवे असते. पण त्यासाठी वर्तमानात तो भक्कमपणे उभा राहिला पाहिजे. अशा वेळी व्यसनी मुलाचा प्रश्न सोडवताना त्याच्या आई-वडील किंवा मित्रांकडे दोषी म्हणून न पाहता ही सामाजिक समस्या म्हणून पाहून त्याचे उत्तरही तसेच शोधले पाहिजे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -