Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीमुंबईत नौदलाच्या दोन युद्धनौका ‘सूरत’ आणि ‘उदयगिरी’चे १७ मे ला जलावतरण

मुंबईत नौदलाच्या दोन युद्धनौका ‘सूरत’ आणि ‘उदयगिरी’चे १७ मे ला जलावतरण

मुंबई : भारतीय नौदलात ठराविक कालावधीनंतर विविध प्रकारच्या युद्धनौका या निवृत्त होत असताना, त्यांची जागा नवीन युद्धनौका घेत असते. काळानुसार, बदलत्या तंत्रज्ञानानुसार, बदलत्या युद्धरणनितीनुसार अनेक बदल करत नव्या युद्धनौकांची उभारणी केली जाते. याचाच एक भाग म्हणून देशातील विविध गोदींमध्ये विविध क्षमतेच्या युद्धनौकांची बांधणी युद्धपातळीवर सुरु आहे. मुंबईतील माझगाव गोदीमध्ये सध्या दोन महत्त्वाच्या युद्धनौकांची बांधणी सुरु आहे. यापैकी विनाशिका आणि फ्रिगेट प्रकारातील प्रत्येकी एक अशा एकुण दोन युद्धनौकांचे जलावतरण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत १७ मे ला होणार आहे.

विनाशिकेचे नाव सूरत (INS Surat -D69) आहे तर उदयगिरी (Udaygiri) असे फ्रिगेटचे नाव आहे. अर्थात या युद्धनौका प्रत्यक्ष नौदलाच्या सेवेत दाखल होतील तेव्हा त्यांना ही संबंधित नावे देण्यात येतील. सध्या सूरतला Yard No – 12707 या नावाने ओळखले जाते. तर उदयगिरीला Yard No – 12653 या नावाने ओळखले जाते. माझगाव गोदीने आत्तापर्यंत अनेक युद्धनौकांची बांधणी केली आहे. असे असले तरी दोन युद्धनौकांच्या जलावतरणाचा एकत्रित सोहळा हा पहिल्यांदाच होत आहे. दोन्ही युद्धनौका या काही मिनिटांच्या अंतराने गोदीतून विशिष्ट पद्धतीने पहिल्यांदाच पाण्यात उतरवल्या जातील, युद्धनौका पहिल्यांदाच पाण्याला स्पर्श करतील.

‘सुरत’…

नौदलाच्या Project 15B Destroyers या कार्यक्रमाअंतर्गत युद्धनौकांची बांधणी माझगावच्या गोदीत सुरु आहे. या वर्गातील युद्धनौकांना विशाखापट्टणम वर्गातील युद्धनौका म्हणून ओळखले जाते. यापैकी पहिली युद्धनौका विशाखापट्टणम येथे गेल्या वर्षी नौदलात दाखल झाली असून इतर दोन युद्धनौका INS Mormugao आणि INS Imphal यांच्या समुद्रातील चाचण्या सुरु आहेत. तर या वर्गातील शेवटची आणि चौथी युद्धनौका ‘सूरत’चे आता जलावरण होत आहे. जलावतरण झाल्यावर सुरतवर विविध उपकरणे, युद्धसामुग्री बसवली जाणार आहे. त्यानंतर सूरतच्या सखोल समुद्रात विविध चाचण्या घेतल्या जातील आणि २०२५ पर्यंत नौदलात दाखल केली जाईल अशी अपेक्षा आहे. त्यावेळी सुमारे सात हजार ४०० टन वजनाची, ब्रह्मोस सारख्या क्षेपणास्त्रांनी सज्ज सूरत युद्धनौका ही जगातील एक अत्याधुनिक आणि एक शक्तिशाली युद्धनौका म्हणून ओळखली जाईल.

‘उदयगिरी’…

आंध्र प्रदेशीमधील डोंगररांगेवरुन ‘उदगिरी’ असे नामकरण युद्धनौकेचे करण्यात आले आहे. ही युद्धनौका नौदलाच्या Project 17A Frigates या प्रकल्पाअंतर्गत बांधली जात आहे. पाणबुडी विरोधी कारवाईची मुख्य जबाबदारी या वर्गातील युद्धनौकांवर असणार आहे. या वर्गात एकूण सात युद्धनौका बांधल्या जात आहेत. यापैकी चार माझगाव गोदीत तर तीन कोलकाता इथल्या Garden Reach Shipbuilders & Engineers या गोदीत बांधल्या जात आहेत. जलावतरण झाल्यावर उदगिरीवर विविध उपकरणे बसवली जातील आणि त्यानंतर समुद्रात उदयगिरीची कार्यक्षमता तपासली जाईल. त्यानंतर २०२४ च्या सुरुवातीला नौदलात दाखल होईल अशी अपेक्षा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -