यूएई : संयुक्त अरब अमिराती म्हणजे यूएईचे अध्यक्ष शेख खलिफा बिन झाएद अल नाहयान यांचे काल निधन झाले. त्यांच्या निधनानंतर यूएईचे अध्यक्ष कोण होणार याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागून होते. शेख खलिफा बिन झाएद अल नाहयान यांच्यानंतर आता यूएईचे अध्यक्षपद प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याकडे देण्यात आले आहे. शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे यूएईचे तिसरे अध्यक्ष आणि अबुधाबीचे 17 वे शासक म्हणून काम पाहणार आहेत.
शेख खलिफांच्या निधनानंतर यूएईमध्ये चार दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. अशात आज यूएईचे नवे अध्यक्ष घोषित करण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून शेख खलिफा हे आजारी होते. त्यांचा सरकारी कार्यक्रमात किंवा इतर ठिकाणी वावर हा खूपच दुर्मिळ झाला होता. त्यांचे यासंबंधी फोटोही प्रसिद्ध करण्यात आले नाहीत. 2004 साली शेख खलिफा यांचे वडील आणि यूएईचे संस्थापक शेख झाएद यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर यूएईच्या अध्यक्षपदी शेख खलिफा यांची निवड झाली होती. काही वर्षांपूर्वी त्यांना स्ट्रोकचा गंभीर आजार जडला आणि ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिले. शेख खलिफा हे यूएईचे दुसरे अध्यक्ष आणि अबुधाबीचे 16 वे शासक होते. ते शेख झाएद यांचे सर्वात मोठे अपत्य होते. जगातला सर्वात उंच टॉवर असलेल्या दुबईतील बूर्ज खलिफाचे नाव हे शेख खलिफा यांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे.