
सोनू शिंदे
उल्हासनगर : मी उल्हासनगरमध्ये येणार आहे, असे ट्वीट केल्यानंतर मला उल्हासनगरमध्ये येऊन दाखव, अशी धमकी देण्यात आली होती, धमकी देणाऱ्याला उल्हासनगर पोलिसांनी २४ तासांत अटक करावी नाहीतर मी माझ्या परीने उत्तर देईन, असे आव्हान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलिसांना दिले आहे. उल्हासनगरमधील धोकादायक इमारतींमधून विस्थापित झालेल्या राहिवाशांचे पुनर्वसन करा, या मागणीसाठी आमदार कुमार आयलानी यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी भाजपचे मनपा मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात किरीट सोमय्या सामील झाले होते. यावेळी त्यांनी पोलिसांना हे आव्हान केले.
पोलीस हे मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर चालतात का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. उल्हासनगरमध्ये अनेक इमारती कोसळून कित्येक जणांना जीव गमवावा लागला, तसेच धोकादायक इमारतींमुळे विस्थापित झालेल्या हजारो नागरिकांचे त्वरित पुनर्वसन मनपा प्रशासन आणि राज्य सरकारच्या माध्यमातून करावे, केवळ घरांच्या नावावर भ्रष्टाचार राज्य सरकारने करू नये, उल्हासनगरमध्ये कोव्हिड रुग्णालयाच्या नावाखाली ४ करोड रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला, मुंबईत देखील कोव्हिड रुग्णालयाचे कंत्राट हे सेनेच्या नेत्यांच्या नातेवाइकांना देण्यात आले आहे.
या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही सोमय्या यांनी केली. शहरातील आतापर्यंत १५ पेक्षा जास्त इमारती कोसळून २० जणांना प्राण गमवावे लागले आहेत, मृतांच्या नातेवाइकांना मनपाकडून व राज्य सरकारकडून ५ लाखांची आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभेत केली होती. अनेक वर्षांपासून भाजप सत्तेत होता त्यावेळी भाजप नेत्यांनी व नगरसेवकांनी का प्रयत्न केला नाही, असा सवाल पत्रकारांनी सोमय्या यांना विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
या आंदोलनात भाजप आमदार कुमार आयलानी, शहर अध्यक्ष जमनू पुरुसवानी, माजी नगरसेवक प्रदीप रामचंदानी, राजेश वधारिया, लाल पंजाबी, मनोहर खेमचंदानी, अमित वाधवा, मनोज साधनानी, प्रकाश तलरेजा, माजी महापौर मीना आयलानी, मंगला चांडा आदी उपस्थित होते.