Saturday, May 10, 2025

ठाणे

सुवर्ण वर्षानिमित्त तंत्रज्ञानाचा प्रसार - प्रचार करण्याचा उद्देश

सुवर्ण वर्षानिमित्त तंत्रज्ञानाचा प्रसार - प्रचार करण्याचा उद्देश

ठाणे (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली हे महाराष्ट्रातील तसेच देशातील नामांकित कृषि विद्यापीठ आहे. सन २०२२ हे वर्ष विद्यापीठाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने गेल्या ५० वर्षात विद्यापीठाकडून करण्यात आलेल्या संशोधन, अभ्यासक्रम, विस्तार तसेच विविध यशस्वी उपक्रमाची माहिती राज्यातील शेतकऱ्यांना व्हावी यासाठी एक भव्य असे राज्य स्तरीय कृषि प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.


या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा प्रसार - प्रचार व्हावा या उद्देशाने १३ ते १७ मे २०२२ या कालावधीत हे राज्यस्तरीय सुवर्णपालवी कृषि महोत्सव होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ रवींद्र मर्दाने यांनी दिली. यावेळी पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर पुजारी उपस्थित होते. या महोत्सवाची माहिती देण्यासाठी बुधवारी ठाण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या प्रदर्शनाला पितांबरी समहू मुख्य प्रायोजक असणार आहे.


डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठकडून दापोली येथे आयोजित या कृषि प्रदर्शनात राज्यातील सर्व कृषि विद्यापीठाचे प्रतिनिधि, विद्यार्थी आणि संशोधक हजर राहणार आहे. शेती संदर्भातील जवळपास ५०० हून अधिक स्टॉल्स याठिकाणी लावण्यात येणार आहे. शेती विषयांवर विविध मान्यवरांचे चर्चासत्र, परिसंवाद, पुष्प, पशु - पक्षी प्रदर्शन लागणार आहे, १५० ऐकरांची शिवार फेरी याठिकाणी असणार आहे. शासकीय विभागांची दालने, खास ई व्हेईकल दालन, नामवंत आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा यावेळी सहभागी होणार असल्याची माहिती पितांबरी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यावेळी म्हणाले. या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषि मंत्री, कोकणातील केंद्रीय मंत्री, महाराष्ट्रातील मंत्री उपस्थित राहणार आहे.


या राज्यस्तरीय कृषि प्रदर्शनात शेती करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नवीन पद्धती कश्या वापरव्यात, नवीन अवजारे, नवीन औषध, खत, पशुपालन आणि शेतकऱ्यांना समृद्ध करणारी विविध संशोधनाची माहिती या प्रदर्शनात मिळणार असल्याची माहिती यावेळी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ रविंद्र मर्दाने यांनी दिली.

Comments
Add Comment